मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ४३

४३.  माझे जिवलग मित्र, श्री.यशवंतराव चव्हाण - रा.ना.उर्फ बन्याबापू गोडबोले

दक्षिण सदर्न मराठा रेल्वे. आमचा प्रवास चालला होता. गाडीचा वेग यथातथाच. वेगापेक्षा गाडीच्या धुराचा अन् कोळशाच्या बारीक कणांचाच जास्त त्रास. एकोणीसशे चाळीसचा सुमार. तिस-या वर्गाच्या डब्यातून प्रवास चाललेला. आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते किर्लोस्करवाडी येथे भरणा-या काँग्रेस कार्यकर्ताच्या बैठकीस निघालो होतो. प्रवासाचा शीण सर्वांनाच जाणवत होता. आमच्यातील एक तरूण सर्वांचे लक्ष वेधून राहिलेला. सर्वांशीच तो हसतमुखाने चर्चा करीत होता. ते होते यशवंतरावजी.

चर्चेचा ओघ संपला. ते माझ्याजवळ आले. ‘‘बन्याबापू, भूक लागली आहे. जेवायला पाहिजे बुवा.’’ मी एका फडक्यात दोन-चार भाकरी आणि कोरडी उसळ आणली होती. बाकड्यावरच फडके अंथरले. दोघांमध्ये ती भाकरी ठेवली. अन् गप्पाटप्पा करत भाकरीचा फन्ना उडवला. पुढच्या स्टेशनवर उतरून नळाचे पाणी प्यायलो. तृष्णा अन् क्षुधा शमली. गर्दीतच बाकड्याच्या एका कोप-यात बसून वाडी येईपर्यंत यशवंतरावांनी थोडी डुलकी पण घेतली. याच फडक्यातील भाकरीने जवळिक साधलेले स्नेहसंबंध चव्वेचाळीस वर्षे अखंड राहिले. सुखदु:खाच्या भरतीओहोटीत अधिकच दृढ झाले.
खिंडीतील गणपती डिसेंबर १९८४ महिना. सगळीकडे धामधूम चाललेली. गुलाबी थंडीचे वातावरणात उत्साह शिगेस पोहोचलेला. लोकसभेच्या निवडणुकीस सारा देश तयार झालेला. कार्यकर्त्याचा उसळता उत्साह. यशवंतरावजी सातारा मतदारसंघातून उभे राहणार हे जाहीर झालेले. एक-दोन दिवसांत ते उमेदवारीचा अर्ज भरण्यास ते दिल्लीहून येणार हे ठरलेले. आमची सर्वांची गडबड उडालेली. निवडणुकीस मोर्चे बांधणी करावयाची तर कंबर कसली पाहिजे. आम्ही सर्वजण तयारीत अन् वाट पाहात बसलेलो.

यशवंतरावजींना सातारा येथील खिंडीतील गणपतीचे विलक्षण आकर्षण अन् ओढ. श्रद्धा अन् भक्ती या दोन्हींचा समसमासंयोग त्या गजाननाच्या ठायी झालेला. निवडणूक अर्ज रण्याअगोदर एकदा त्या एकदंताची आळवणी करावयाची, आशीर्वाद मागावयाचे ही यशवंतरावजींची प्रथा. सहज उत्सुकता म्हणून अस्मादिकांनी एकदा पृच्छा केली, ‘‘यशवंतराव, या गजाननाच्या भेटीचा एवढा अट्टाहास का?’’ स्मितवदनाने आपल्या अंतरीचे भाव त्यांनी शब्दरूप केले, ‘‘मला काही मागायचे नाही. जनताजनार्दनाचे असीम प्रेम मला लाभले. या प्रेमाला अन् आदराला असेच कायम राहण्याचे भाग्य मला लाभावे. तेवढी साधनसुचिता शेवटपर्यंत राहावी, हीच त्या वरदाला प्रार्थना करणेची आहे.’’ पण या निवडणुकीच्या अगोदर ही भेट झालीच नाही. अर्ज दाखल करण्यास यशवंतराव आलेच नाहीत. त्यांच्या स्वर्गवासाची बातमी मात्र ऐकावयास मिळाली. खिंडीतील गजाननाची भेट अपुरी राहिली.
सौ. वेणूताई
यशवंतरावजींचा अन् माझा स्नेह जमला. यात कौटुंबिक स्नेहाचे बंध दृढ केव्हा झाले, हे कळुनसुद्धा आले नाही. भारताच्या उपपंतप्रधानपदापर्यंत ज्यांनी अनेक पदे भूषविली त्या यशवंतरावांच्या पत्नी म्हणजे एका निगर्वी गृहिणीचे मूर्तिमंत रूप, सभेच्या स्थानी व्यासपीठावर बसावे, मिरवावे, लोकांकडून कौतुक करवून घ्यावे, ही इच्छाच नाही. विचारले तर आपल्या समाधानी अन् शांत तृप्त नजरेत तिकडच्याबद्दलची अपूर्वाई दडवीत त्या उद्गारत, ‘‘माझी बसण्याची जागा ही इथेच बरी दिसते. ते वर व्यासपीठावर अन् मी खाली प्रेक्षकवर्गात, फार फार आनंद होतोय मला. यासारखा दुसरा आनंद नाही.’’

आमच्या घरी जेवण्यास आलेल्या. आम्हीच भांबावून गेलेलो. आदरातिथ्य करावयाचे कसे, थोरामोठ्या माणसाची पत्नी. शिष्टाचारात काही कमी पडले तर, थोडी धाकधूक वाटत होती. ‘‘मी इथेच स्वयंपाकगृहात पाटावर बसूनच जेवणार’’ हे त्यांचे शब्द ऐकले अन् एकदम शिरावरचा भाग कमी झाला अन् एका आगळ्या अन् वेगळ्या स्त्रीच्या दर्शनाने मन स्तंभित झाले.

दिल्लीला स्टेशनवरून फोन केला. फोनवरून वेणूतार्इंचा आवाज ऐकला. ‘‘साहेब घरी नाहीत. दौ-यावर आहेत. अन् हे पहा, ते नसले म्हणून आमच्या घरी यावयाचे नाही असे नाही हं?’’

गाढ पत्नीप्रेम
सौ. वेणूतार्इंचे आकस्मिक निधन झाले. संसारामधील अनेक दु:खे सहन केलेले यशवंतरावजी या वर्मी बसलेल्या घावाने हळवे बनले. संसाररूपी रथाचे एक चक्र निखळले. मुंबईस रिव्हेरा या त्यांच्या निवासस्थानी बैठक जमली होती. आम्ही फक्त दोघेच होतो. बोलण्याचा ओघ वेणूतार्इंच्यावरच होता. यशवंतरावांचा चेहरा कधी नव्हे एवढा शोकाकुल झाला होता. मलाही अवघडल्यासारखे वाटत होते. भावनेने रूद्ध झालेल्या त्यांच्या कंठातून शब्द कसेबसे बाहेर पडत होते. बन्याबापू, माझ्या जीवनातील ही पोकळी मला सर्वांगाने वेढून टाकत आहे. उभ्या आयुष्यात कशाचीच मागणी न करणारी माझी पत्नी मला सोडून गेली. मी पोरका झालो आहे. आयुष्याच्या चढउतारावर तिने माझी फक्त सेवाच केली. सावलीप्रमाणे माझ्या समवेत ती नेहमी राहिली. माझे आयुष्य तिनेच घडवले. आपत्काली मला तिने सावरून धरले तिच्याविना माझी ही जीवननौका भरकटू लागलीय. लवकरच ती काळाच्या भोव-यात सापडणार अन् संपणार.’’

असा हा माझा स्नेही, माणूसवेडा, एखाद्यावर भरभरून स्नेह करणारा. त्याला त्या वर्षावात चिंब भिजवणारा. हवाहवासा वाटणारा. नुसत्या आठवणीने गहिवर आणणारा.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org