मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३२

३२.  उदार मनाचा मार्गदर्शक, प्रेमळ मित्र – डी. सी. शहा

नामदार यशवंतराव चव्हाण यांचा परिचय, स्नेह इ.स.१९५० नंतरच वाढत गेला. निपाणी मुंबई राज्यात असताना १९५२ ते १९५६ या काळात मी मुंबई राज्याच्या विधान परिषदेवर नगरपरिषदांचा प्रतिनिधी म्हणून काम करीत होतो. त्या काळात चव्हाणसाहेबांचा नि माझा दाट स्नेह वृद्धिंगत होत गेला. त्यांच्या प्रेमळ, लोभस, व्यक्तिमत्त्वाचा खोल ठसा माझ्या मनावर उमटला आहे. त्यांच्या इतका सुसंस्कृत, सहृदयी, समतोलवृत्तीचा, अजातशत्रू आणि आम जनतेशी एकरूप झालेला, इतका थोर नेता आधुनिक महाराष्ट्रात मला तरी दुसरा कोणी दिसत नाही.

१९५६ नंतर मी कर्नाटक राज्यात विधान परिषदेवर बरीच वर्षे असताना माझा व्यवसाय सांभाळून, समाजकारणात व राजकारणात भाग घेत आलो. स्वराज्यप्राप्तीनंतरच्या प्रारंभीच्या काळात, मुंबई राज्यात डॉ.जिवराज मेहता व माननीय माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या खालोखाल श्री.भाऊसाहेब हिरे यांचे स्थान होते. राजकारणी मुत्सद्दी लोक मला हिरे गटातील मानीत होते. परंतु माझा अनुभव असा होता की, महाराष्ट्राच्या अभ्युदयासाठी झटणा-या या दोन्ही नेत्यांनी केव्हाही गटबाजीचे राजकारण केले नाही. दोघांची मनोवृत्ती भिन्न असल्यामुळे वेगवेगळे मार्ग हाताळले गेले इतकेच. दोघांचेही ध्येय महाराष्ट्राचा अभ्युदय आणि महाराष्ट्राच्या त्यागी संस्कृतीची जपणूक व वाढ व्हावी हेच होते.

यशवंतरावांचा व माझा दाट परिचय १९५० पासूनचा. त्यापूर्वीपासून माझी व भाऊसाहेब हिरे यांची मैत्री होती, १९४० पासून मी नगरपरिषदेत काम करीत असताना नेहमीच हिरे यांचे मार्गदर्शन व मदत घेत असे. पुढे १९५० नंतर माझा व यशवंतरावजींचा परिचय जसजसा वाढत गेला, तसतशी त्यांच्या लोकसेवेच्या तळमळीची आणि उदार मतवादाची छाप माझ्या मनावर कायमची ठसली. मुंबई राज्याच्या शासनात त्याना वरचे स्थान मिळावे असे मला वाटू लागले. भाऊसाहेब हिरे यांचेकडे मी माझ्यासाठी काहीही मागितले नाही, पण एकदा त्यांच्याशी जगीत गप्पा मारीत असताना मी भाऊसाहेबांना म्हणालो की, पक्षाने यशवंतरावांचा उपयोग करून घेतला पाहिजे, ते मंत्रिमंडळात आले पाहिजेत. भाऊसाहेब हसले. त्यांनीही आपले विचार सांगितले. पुढे माझ्या मनातील अपेक्षा लवकरच पूर्ण झाल्या. यशवंतरावांची पुढील यशस्वी
कारकीर्द सर्वांना माहीत आहेच.  
 
सन १९४० पासून १९६२ पर्यंत मी निपाणी नगरपरिषदेत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून काम केले. दरम्यान १९५५ मध्ये निपाणी नगरपरिषदेला शंभर वर्षे पूर्ण होत होती. तेव्हा निपाणी नगरपरिषदेच्या शतसांवत्सरिक समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही यशवंतरावजींना बोलावले. ते माझ्या घरीच उतरले होते. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न समोर दिसत होते.

देशाचे राजकारण, भाषावार प्रांतरचना, औद्योगिक विकास हे विषय बोलण्यात येत असत. पण या सर्वांपेक्षा यशवंतरावांच्या मनात, महाराष्ट्राच्या विकासासाठी काही मूलभूत प्रश्न भेडसावत होते. आमच्या गप्पांच्या ओघात मी त्यांना म्हटले,‘‘साहेब मी व्यवसाय चांगला केला, पैसा व नावही कमावले, नगरपरिषदेत व विधानसभेवर काम करून समाजकारण व राजकारणही करीत आहे. मी आणखी काय करू शकतो?’’ साहेब म्हणाले, ‘‘देवचंदभाई, या भागात शिक्षणाचा प्रसार करा, विस्तार करा, महाराष्ट्र संस्कृतीच्या वाढीसाठी शाळा-कॉलेजे काढा, लोकांना शहाणे करा, देशाच्या प्रगतीचा तो खरा मार्ग आहे. जनता शहाणी व सुसंस्कृत झाली तर देश आपोआपच प्रगत होईल. तेव्हा तुमच्या कार्याला या भागात खूपच वाव आहे.’’ यावरून यशवंतरावजींची लोकहिताची तळमळ व कोणाकडून कोणते काम करवून घ्यावे याची समज, या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात.

पुढे १९६१ मध्ये आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचे प्रेरणेने निपाणी येथे कॉलेज काढण्याचे ठरविले. त्यासाठी कर्नाटक विद्यापीठाकडे चौकशी केली. त्यांच्या जाचक अटी पाहून आम्ही अर्जुननगर येथे कॉलेज काढण्याचा निर्णय घेतला. पुणे विद्यापीठाने आम्हास परवानगी दिली, संलग्न करून घेतले. या कॉलेजचे उद्घाटन यशवंतरावजींचे हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी सीमाभागातील जनतेने आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी हे कॉलेज स्थापन केले आहे. याचा अधिकारवाणीने उल्लेख केला. त्याचाच परिणाम म्हणजे सीमाभागाचा लुप्त झालेला प्रश्न पुन्हा जिवंत झाला, धसास लागला. पुढे १९६३ मध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. आम्हाला आनंद झाला. गेल्या पंचवीस वर्षात निपाणी भागातील एक पिढी या महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडली. आमच्या कॉलेजचे शेकडो माजी विद्यार्थी आज नामवंत डॉक्टर, तंत्रज्ञ, शेतीतज्ज्ञ, प्राध्यापक, प्रशासक, उद्योजक व व्यापारी या नात्याने देशात व परदेशातही उज्ज्वल यश व नाव कमवीत आहेत.

नव्या विद्यापीठाशी आमच्या कॉलेजचे संलग्नीकरण करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्या. वास्तविक सर्व व्यवहार स्वच्छ होते. नामवंत प्राध्यापक वर्ग होता. जिद्दीने सर्व आवश्यक  धनसामग्री व इमारतींची पूर्तता केली होती. त्या वेळी योगायोगाने क-हाडला मी यशवंतरावजींना भेटलो नि सहज विषय काढला. बोलण्याच्या ओघात, सीमाभाग अद्याप संयुक्त महाराष्ट्रात नाही याची खंत यशवंतरावांना फार आहे हे जाणवले. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. पुढे शासकीय चक्रे कशी हलली याची मला आजही कल्पना नाही. पण कॉलेजच्या संलग्नीकरणातील अडचणी तर दूर झाल्याच पण पुढे यशवंतरावजी केंद्रसरकारात गेल्यानंतरही नामदार बाळासाहेब देसाई व नामदार वसंतरावजी नाईक यांच्याकडूनही आमच्या कॉलेजला खास सवलती मिळत गेल्या. त्या अद्यापही चालू आहेत. यशवंतरावांचा वरदहस्त लाभलेले आमचे कॉलेजही अद्याप न सुटलेल्या सीमाप्रश्नाचे प्रतीक आणि या भागातील अस्मितेचे आणि मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक परंपरेचे केंद्र बनले आहे. या कॉलेजचा यंदा रौप्य महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत. पण या मागील स्फूर्ती असलेले यशवंतरावजी आज आमच्यात नसल्याने त्यांच्या आठवणीने डोळे पाणावतात. हृदय भरून येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org