मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ३१

३१. एक आदर्श व्यक्तिमत्त्व – ना. शरद पवार

यशवंतरावांशी माझा पहिला संबंध १९५८ सालच्या आसपास आला. संयुक्त महाराष्ट्रासाठी आग्रह धरणारी जी तरूण पिढी होती त्यांतील एक घटक म्हणून मी त्यांच्या जवळपास त्या वेळी कोठेतरी असायचो. मात्र संयुक्त महाराष्ट्रवाद्यांना यशवंतरावांची विचारसरणी खटकत होती. कारण राजीनामा देऊन आपण महाराष्ट्राला मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून बाजूला नेऊ नये अशी त्यांची भूमिका होती. मात्र राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा प्रश्न सोडविण्यात यशवंतरावांचे राजकीय शहाणपण उपयोगी पडेल असे वाटत होते. एवढेच नव्हे तर पुण्याचे माझ्याबरोबर शिकणारे काही विद्यार्थीही त्यांच्याकडे आकृष्ट झाले. काँग्रेसच्या युवक विभागात काम करण्याची जबाबदारी त्यानंतर यशवंतरावांनी आमच्यावर सोपवली व त्यातूनच त्यांचे व माझे जवळिकीचे नाते निर्माण होत गेले. १९६४ मध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रातील युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकण्यात आली व त्यातून आमचे दोघांचे नाते अधिक दृढमूल झाले. त्यावेळी माझ्यावर त्यांचा जो प्रभाव पडला तो वर्णन करणे शब्दातीत आहे.

तथापि माझ्या सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात आजवर जे काही मी मिळवले आहे त्याचे श्रेय यशवंतरावांनाच द्यावे लागेल.

युवक चळवळीपासून ते विरोधी पक्षनेत्यापर्यंत माझी जी वाटचाल झाली त्यात त्यांचेच फक्त मार्गदर्शन झाले. माझ्यावर पक्षाची जबाबदारी टाकणे, विधीमंडळात मला आणणे, महाराष्ट्र पातळीवर काँग्रेस संघटनेची जबाबदारी सोपविणे, मंत्रिमंडळात घेणे वगैरेबाबत त्यांचाच मोठा वाटा आहे हे मान्य करण्यात मला मोठा अभिमान वाटतो.

हे राज्य एकसंघ व एकजिनसी व्हावे असे त्यांना वाटत होते. त्यांनी जी दिशा दाखविली होती त्या दिशेने महाराष्ट्राने वाटचाल केली असती तर आज कळत नकळत या विभागात जी काही कटुता पाहावयास मिळते ती यत्त्किंचितही पाहावयास मिळाली नसती. त्या दृष्टीनेच त्यांनी नागपूर करार केला व नागपूरला दुय्यम राजधानीचे स्थान देण्यात पुढाकार घेतला. तसेच औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ काढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन मागसलेल्या मराठवाड्याला विकासाची दारे खोलून दिली. शैक्षणिक प्रगतीशिवाय कोणताही परिसर समृद्ध होत नाही. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात, मुंबईच्या विभिन्न भाषिकांत त्यांनी असेच विश्वासाचे वातावरण निर्माण केले.

ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी व अन्य वर्ग म्हणजेच बहुजनसमाज यांचे व दलितांचे संबंध सातत्याने सामंजस्याचे राहावे म्हणून दादासाहेब गायकवाड यांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर नेहमी मैत्रीचे संबंध ठेवण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला. सामाजिक मन एकसंध झाले पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोण होता. हल्लीच्या राज्यकर्त्यानीही हाच दृष्टिकोण ठेवून प्रभावीपणे काम केले पाहिजे.

कृषी औद्योगिक समाजसेवेची कल्पना मांडून त्यांनी खेड्यांमध्ये राहणा-या महाराष्ट्रातील ७९ टक्के लोकांना व शेती व्यावसायिकांना महत्त्व प्राप्त करून दिले. पद्मश्री विखे पाटील व डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी सहकारी कारखानदारी उभी करून शेतक-यांना वाजवी किमंत देण्यासाठी जी उपाययोजना केली तिला यशवंतरावजींनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज महाराष्ट्रात शंभरावर सहकारी साखर कारखाने उभे आहेत. तसेच ग्रामीण महाराष्ट्रात कायापालट होऊन खेड्यातील तरूण पिढीमध्ये उद्योजक होण्याची आकांक्षा वाढीस लागली आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा पिंडच मुळी कट्टर लोकशाहीवादी होता. सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय सामान्य माणसाला प्रशासनात सहभागी असल्यासंबंधीची जाण होत नाही. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांची जाणीव झाल्याखेरीज त्यांना आपले प्रश्न सोडविण्याची कल्पनाही लक्षात येत नाही. म्हणून सत्तेच्या विव्रेंâदीकरणाचे सूत्र कृतीमध्ये आणण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदांच्या संदर्भात त्यांनी ही भूमिका मांडली. त्यावेळचे महसूल मंत्री ना.वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्यामध्ये दोन दृष्टिकोण होते, एक तर सत्तेचे विकेन्द्रीकरण आणि ग्रामीण भागातील नेतृत्व प्रशासनाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन ते अधिक सुजाण झाले पाहिजे ही भावना म्हणून नेतृत्व तयार करण्याची ती एक शाळा झाली. तो एक महत्त्वाचा टप्पा झाला असे जर म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org