मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण ३-२

त्यानंतरचा प्रसंग भाषावार प्रान्तरचनेचा. काँग्रेसने स्वीकारलेल्या तत्त्वानुसार अलग अलग राज्यात विखुरलेल्या सर्व मराठी भाषिकांचे एकत्रित व स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची मागणी जोरात सुरू होती. सारे प्रयत्न करूनही मराठी भाषिकांचे एक राज्य मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार विशाल मुंबई राज्य निर्मिती करण्याचा केंद्र शासनाचा विचार जवळजवळ पक्का झालेला दिसत होता, म्हणून महाराष्ट्रात सर्वपक्षीय समिती स्थापन करून तिच्या मार्फत आंदोलन सुरू करायचे असा विचार जोराने पुढे आला होता. महाराष्ट्रातील काँग्रेस जनांची परिस्थिती मोठी विचित्र झाली होती. सर्वपक्ष समितीमध्ये सामील होऊन आंदोलन करावयाचे तर पक्षाच्या तत्कालीन धोरणाविरुद्ध व नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यासारखे होईल व न सामील झाल्यास मराठी भाषिकांचे राज्य मिळणे अशक्यच दिसत होते. श्री. यशवंतरावजी मराठी भाषिकांच्या एकत्रित राज्याचे समर्थक होते. परंतु या विचित्र परिस्थितीचा सखोल विचार करून त्यांनी फलटणच्या सभेत ‘‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे (म्हणजे देश मोठा) आम्ही नेहरूजींच्या नेतृत्वाखाली राहू.’’ अशी आपली भूमिका जाहीर केली. सा-या महाराष्ट्रभर एकच गदारोळ माजला. त्यांच्यावर महाराष्ट्र द्रोहाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. परंतु यशवंतरावजी घेतलेल्या भूमिकेवर ठामपणे उभे राहिले व महाराष्ट्रभर दौरा काढून आपला विचार कार्यकर्त्यासमोर मांडू लागले. त्यावेळी ते जळगाव जिल्ह्याच्या (त्यावेळच्या पूर्व खानदेश जिल्ह्याच्या) दौ-यावर आले होते. त्यांनी आमचे आमदार भाऊसाहेब बोंडे व मला मुद्दाम बोलावून घेतले. कार्यकर्त्याची सभा झाली. रात्री आम्हा दोघाचौघा कार्यकर्त्याजवळ मोठ्या विश्वासाने बोलत होते. त्या वेळी मी कुठल्याच पक्षात नव्हतो. घरातील वातावरण खिरोद्याच्या राष्ट्रीय शाळेतील व राष्ट्र सेवादलातील संस्कार, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग यामुळे काँग्रेसकडे कल होता. परंतु काँग्रेस श्रेष्ठींनी मराठी भाषिकांचे एकत्रित राज्य निर्माण करण्याच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे माझ्या मनात काँग्रेसच्या ह्या दुटप्पी राजकारणाबद्दल चीडच होती. ती संभाषणात व्यक्त होत होती. परंतु आपल्या वाक्चातुर्याने, हळूवार परंतु मुद्देसूद विवेचनाने यशवंतरावजींनी अशी काही आपली भूमिका मांडली की त्यामुळे आमचा अर्धा विरोध कमी झाला. त्यांचे एक वाक्य अजून स्पष्टपणे आठवते. ते म्हणाले होते, ‘‘गैरसमज असो अथवा अविश्वासामुळे असो आपले म्हणणे जर आपले राष्ट्रीय नेते मान्य करीत नसतील तर त्यांच्यावर न रागवता, किंवा त्यांच्या विरोधात न जाता, त्यांचा आपल्याबद्दलचा गैरसमज व अविश्वास आपल्या कृतीने दूर करूनच आपण आपले मन वळविले पाहिजे, त्यांना जिंकले पाहिजे. आणि मला विश्वास वाटतो की ह्याच पद्धतीने मराठी भाषिकांचे राज्य आपण मिळवू शकू. म्हणून माझ्या भूमिकेत महाराष्ट्र द्रोह नाहीच.’’ पुढील काळात घडलेल्या घटनांवरून त्यांचे त्या वेळचे निदान व कृती किती अचूक होती हे स्पष्टच झाले. विशाल द्विभाषिकाची निर्मिती झाली. यशवंतरावजी १९५६ च्या नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री झाले व लगेच १९५७ च्या विधानसभेच्या निवडणुकी जाहीर झाल्या. महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेसच्या व यशवंतरावजींच्या विरोधात खूपच तापलेले होते. मला काँग्रेस श्रेष्ठींनी निवडणूक लढण्याचा आदेश दिला. त्या झंझावाती वातावरणात मी निवडून आलो. काँग्रेसलाही बहुमत मिळाले. पक्षनेता निवडीसाठी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची सभा घेण्यात आली होती. तिला हजर रहावयास गेलो. यशवंतरावजींची एकमताने पक्षनेतेपदी पुन्हा निवड झाली व त्यांची ओझरती भेट घेऊन आम्ही परतलो.

पुढच्या दोनतीन दिवसानंतरचा प्रसंग लिहिताना संकोच वाटतो कारण त्यात एखाद्याला आत्मप्रौढीचा वास येईल. परंतु यशवंतरावजींच्या कार्यपद्धतीवर व मोठेपणावर काही प्रकाश त्या प्रसंगाने पडतो म्हणूनच लिहीत आहे. एका रात्री दोन-अडीच वाजता मला जागे करण्यात आले. समोर त्या वेळचे आमच्या जिल्हा लोकलबोर्डाचे अध्यक्ष श्री. राजाराम पाटील उभे होते. मी काही विचारण्या आधीच ते म्हणाले, ‘‘कपडे घाला. तुम्हाला मुंबईला घेऊन येण्यासाठी यशवंतरावजींनी पाठविले आहे.’’ ध्यानिमनी काही नसतांना घडत असलेला प्रसंग तो होता. त्यामुळे मी भांबावून विचारले ‘‘का बोलाविले?’’ त्यांनी स्मित हास्य केले व म्हणाले, ‘‘ते मुंबईला गेल्यानंतर कळेल.’’ आम्ही तसेच निघालो. मुंबईला पोहोचलो व लगेच यशवंतरावजींना भेटण्यास ‘सह्याद्री’ बंगल्यावर गेलो. बाहेरच्या दिवाणखान्यात ते व सौ. वेणूताई दोघेच चहा घेत बसले होते. धुवट खादीच्या मळलेल्या वेषातच त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो व म्हणालो, ‘‘आपण बोलाविल्याचा निरोप आला म्हणून भेटायला आलो.’’ ते हसत उभे राहिले व मला प्रेमाने जवळ घेऊन म्हणाले, ‘‘बोलाविले नाही. तुम्हाला एस.ओ.एस. पाठविला होता. माझ्या मंत्रिमंडळात येणार का?’’ व लगेच वेणूताईकडे वळून म्हणाले, ‘‘वेणूताई, हा युवक लहान असला व वेष बावळा दिसत असला तरी ह्याने माझ्याशी भांडण केले आहे एकदा व म्हणूनच मला हा आवडला व मी त्याची सहकारी म्हणून निवड केली आहे.’’ एका लहानशा कार्यकर्ताच्या उद्धटपणाचे कोण हे कौतुक! मी संकोचून उभा राहिलो. सौजन्यशील मांगल्यमूर्ती वेणूताई कौतुक भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात होत्या. त्यामुळे मी अधिकच भांबावलो.

ह्या प्रसंगाने यशवंतरावजींनी मला जिंकले, आपलेसे केले. आपल्या कुटुंबातील एक बनवले. खूप प्रेम विश्वास दिला. असं त्यांनी अनेक कार्यकर्त्याना घडविलं. त्यांना वैचारिक व भावनिक जीवन दिले. पुढे काही बाबतीत मतभेद झाले पण त्यांचा जिव्हाळा काही कमी झाला नाही. वैयक्तिक संबंधात दुरावा कधी त्यांनी येऊ दिला नाही. हीच त्यांची थोरवी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org