मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण १३-१

अगदी भूमिगत चळवळीचे मार्गदर्शन करतानाही यशवंतरावांचा हाच दृष्टिकोण होता. त्यामुळेच आपल्या अत्याधुनिक विचाराला, वैदिक पांडित्याला, अद्ययावत संदर्भ देणारा तत्त्वचिंतक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना आपले स्नेहीसोबती केले आणि समन्वयी जीवननिष्ठांचा आदर्श म्हणून महाराष्ट्रात स्वत: आदराला पात्र झाले. या दिशेने जाताना आपली सत्तासंपत्तीची बिरुदावली झटकून, यशवंतराव केव्हाच सामान्यजनांशी समरस होत. क-हाडच्या साहित्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून काम करताना यशवंतरावांची ही भूमिका सर्वांच्या परिचयाची झाली आहे. यशवंतरावांच्या अंगचा हा विनय परिचितांना त्यांच्या लहानपणापासूनच प्रत्ययास आला होता. शाळेत शिक्षकाने ‘‘तुम्ही होणार कोण?’’ असा प्रश्न केला असता यशवंतरावांनी ‘‘मी यशवंतराव चव्हाण होणार’’ हे जे उत्तर दिले होते ते एकलव्याच्या स्वतंत्र वृत्तीचे, स्वावलंबनाचे आणि स्वाभिमानाचे जसे होते तसेच त्यांच्या विनयाचे द्योतकही होते. तो प्रत्यय, त्यांनी १९४६ मध्ये पार्लमेंटरी सेक्रेटरी झाल्यानंतर, त्या वेळचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना जी विनंती केली होती, तिच्यामध्ये सुद्धा आला होता.
 
भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव महाराष्ट्राच्या व भारताच्या शासनव्यवस्थेत चढत्या-वाढत्या पदवीने वावरले. प्रथम स्थानिक स्वराज्य व पुरवठा मंत्री म्हणून काम पाहात असता महाराष्ट्रात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांनी उमटविला. त्यावर गुजरात महाराष्ट्र राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाल्यावर दोन्ही प्रदेशांतील जनतेला एकदिलाने सांभाळून सरकारी कारभारात कारभारात असा वचक बसविला की, महात्मा गांधींच्या इच्छेप्रमाणे स्वराज्य हे शेतकरी-कामकरीसुद्धा सर्वांचे असे जनतेला पटले. त्याचबरोबर भारतात येणा-या परदेशी भेटभाऊंला ‘‘यशवंतरावांचे पाणी काही निराळेच आहे’’ हेही पटले. या सर्व कारभारकुशलतेचा परिणाम म्हणून जवाहरलालांनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत बोलावले. त्या कारकीर्दीत कुशल प्रशासनामुळे चीन व पाकिस्तान बरोबरच्या लढाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा नक्षाच उतरविला! त्यामुळे भारतीय जनमानसात यशवंतरावांना त्यांच्या लोकसंपर्काधिष्ठित धोरणामुळे पुढे पुढे गृह, अर्थ, परराष्ट्र या खात्यांची मंत्रिपदे भूषित करण्याचा योग प्राप्त झाला. त्यायोगे त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व असे विकसले गेले की, किंचित काळ इंदिरा गांधींशी मतभेद होऊनसुद्धा, यशवंतराव फिरून ‘‘स्वगृही’’ आल्यावर इंदिराजींनी आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्षपद यशवंतरावजींकडे सोपविले.

अशा चढत्या वाढत्या पदवीने यशवंतराव ‘‘कीर्ती करून’’ राहिले असता, ते महाराष्ट्राला व क-हाडला विसरले नाहीत. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी मोलाची कामगिरी करून राष्ट्रीय एकात्मभावाचा विकासच केला. इतकेच काय यशवंतरावांनी ग्रामीण नेतृत्वास पुढे आणले व कृषिऔद्योगिक, सहकार्य लोकजीवन समृद्ध व्हावे, यासाठी जागृतीने श्रम केले, कारण त्यांनी राष्ट्रीय एकात्मता परिषदेत सांगितल्याप्रमाणे ‘‘सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केल्याखेरीज राष्ट्रीय एकात्मता साध्य होऊ शकणार नाही’’ याची खात्री ते बाळगून होते. महाराष्ट्राचे लोकजीवन समतेच्या तत्त्वाने पुढे जावे व न्यावे असे यशवंतरावांना वाटत असे.

साहित्य-संस्कृती संवर्धनासाठी यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्यात एक मंडळ कारभारकुशलतेचा एक भाग म्हणून निर्माण केले. त्याने नवनवीन लेखकांना उत्तेजन दिले आहे. गीतेचे अथवा ज्ञानेश्वरीचे तात्पर्य यशवंतरावांच्या मातेने त्यांना असे सांगितले होते की, मनुष्याने मीपण सोडून आपले विवेकी कर्तव्य करावे. त्याप्रमाणे यशवंतरावांनी त्यांच्या मातेचा उपदेश पाळला. स्वत:चा संसार करूनही आप्तेष्टांचा संसार चालविला व महाराष्ट्रीय गोरगरिबांना मार्गाला लावून धन्यवाद मिळविले.

‘‘कीर्ति करून नाही गेले ते उगाच जन्मले आणि मेले’’ असे समर्थांनी म्हटले आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन यशवंतरावांना एकाहत्तराव्या वर्षी मृत्यूने गाठले असता, ते ‘‘कीर्तिरूपे उरले आहेत.’’ भारताच्या स्वातंर्तासाठी वेळेला शिक्षणाला फाटा देऊन व कारावास भोगून स्वातंत्र्य सेनानी, संघटनाकुशल म्हणून काँग्रेस संस्था महाराष्ट्रात बलवान करणारे नेते म्हणून आणि शासनातील सत्तापदे भूषवितानासुद्धा त्या सत्तापदांचा व स्वत:च्या मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग समाजातील गरिबांच्या कल्याणासाठी प्रामुख्याने झाला पाहिजे, हे ध्येय ठेवून आपले प्रगल्भ व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या अस्मितेसह भारताच्या सेवेस समर्पणबुद्धीने लावणारे यशवंतराव, अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे आधारस्तंभ होते. ते काही मानाला हपापल्यासारखे नव्हते, तर इतिहासाच्या पानापानावर आपल्या सेवासमर्पणाचा ठसा उमटवून पुढीलांना धडा वा पाऊलवाट दाखविण्यासाठी होते. म्हणूनच ते लोकप्रिय होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org