मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९४

९४. एक आगळे सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तिमत्त्व  - कृ.पां. मेढेकर

मी यशवंतरावांना १९५० साली प्रथम पाहिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला अतिशय प्रसन्न वाटले. त्यांच्या रेखीव तरूण चेह-यावर सदैव स्मिताची अस्पुष्ट रेखा असावयाची. त्या दिवसापासून त्यांच्या पाणीदार व्यक्तिमत्त्वाची, कुशाग्र बुद्धीची, प्रेमळ व आपलेसे करून घेणा-या संवेदनशील स्वभावाची माझ्या मनावर बरीच छाप पडली. १९५६ साली ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी बृहन्मुंबईमध्ये डेप्युटी पोलिस कमिशनर होतो. थोड्याच महिन्यात भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्यूरोमध्ये डेप्युटेशनवर माझी बदली झाली. दिल्लीस रवाना होण्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेलो. तेव्हा ते म्हणाले, (त्यांचा शब्दन् शब्द मला अजून आठवतो) ‘‘मेढेकर, तुम्ही दिल्लीस जाण्यास तयार झालात हे बरेच झाले. महाराष्ट्रातले फारच थोडे अधिकारी मध्यवर्ती सरकारात आहेत, नाही का ? गुड लक् टू यू. वेळ मिळेल तेव्हा जरूर भेटत जा.’’ त्यानंतर पुष्कळ वेळा त्यांना आणि त्यांच्या सौभाग्यवतींना वेणूतार्इंना मी मुंबईला अगर पुढे त्यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी भेटत असे. त्यांचे खाजगी सचिव श्री. डोंगरे पुढे येऊन माझे स्वागत करीत.

१९६२ साली यशवंतराव भारताचे संरक्षणमंत्री झाले. काळ कठीण होता, देशावर आलेल्या एका मोठ्या संकटवेळी व सैन्याचे धैर्य खचलेले असताना फारच मोठी जबाबदारी त्यांनी शिरावर घेण्याचे कबूल केले आणि मोठ्या यशस्वीरित्या ती पार पाडली. ते संरक्षणमंत्री असतानाच्या आठवणी सांगताना महाराष्ट्राचे राज्यपाल एअर चीफ मार्शल श्री.लतीफ परवा म्हणाले, ‘‘चव्हाण तज्ज्ञांच्या सल्ल्यास फार महत्त्व देत, मान देत.’’ श्री.लतीफ इंग्लंडमध्ये भारताच्या उच्च आयुक्ताच्या कचेरीत एअर अॅटॅची असताना यशवंतराव ब्रिटिश सरकारशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन लंडनला आले होते. अमुक एक ब्रिटिश मेकचे लढाऊ विमान घ्यावे असा त्या परदेशी सरकारचा व काही भारतीय प्रतिष्ठित मंडळींचा जोरदार आग्रह होता. पण भारताच्या संरक्षण खात्याच्या अधिका-यांना व तज्ज्ञांना ते लढाऊ विमान तेवढेसे पसंत नव्हते. विवंचनेत पडलेल्या सल्लागारांना यशवंतरावांनी सांगितले, ‘‘तुमचा पूर्ण सल्ला घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. तुम्हाला ते विमान वापरावयाचे आहे, मला नाही.’’ त्यांच्या हाताखाली काम करणा-यांना मनमोकळेपणाने विचार करता येई व सरकार दरबारी आपले विचार निर्भयपणे स्पष्ट मांडता येत. एवढा आत्मविश्वास ते आपल्या सहका-यांत निर्माण करू शकत असत.

आम्हा सरकारी नोकरांना त्यांचे मार्गदर्शन व विचार फारच उद्बोधक व पोषक ठरले. आजच्या महाराष्ट्रातल्या उत्तम व शिस्तबद्ध शासनाचा पाया ख-याखु-या अर्थाने यशवंतरावांनीच घातला. सर्वश्री वसंत नगरकर, राम प्रधान, रूसी कांगा, शरद केळकर, श्रीधर प्रधान, एम.जी.वाघ, एम.जी. मुगवे इत्यादी मुलकी व पोलिस अधिकारी त्यांच्या अनेक आठवणी सांगतात. शासनाच्या सर्व अंगात त्यांना रस होता. कोणत्याही कठीण समस्येबद्दल बोलताना लोकांचे हित कोठे व कशात आहे व शासनातल्या अधिका-याची भूमिका कोणती असावी व ती तशी का असावी ह्यांचे विवरण ते नेहमीच फारच सुंदररीत्या करीत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासंबंधी यशवंतरावांचे विचार निर्भय व खंबीर होते. लोकहिताची, भाषणस्वातंत्राची चाड त्यांना असूनसुद्धा पोलिसांना त्यांचे अवघड व लोकांना अप्रिय पण अपरिहार्य असे कार्य करताना संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी पुष्कळ वेळा आपल्याला न पटणारे राजकीय सुद्धा निर्णय घेतले व निर्भय धोरण पत्करले. राज्याच्या व लोकसभेच्या लोकप्रतिनिधींपुढे विधानगृहात अगर लोकसभेत बोलताना त्यांनी पोलिसांची बाजू तितक्याच धिटाईने व समर्पक रीतीने मांडली. पोलिसांचे नीतिधैर्य खचू दिले नाही. कधीही घाईघाईने अगर प्रखर टीकेच्या आहारी जाऊन फुकाची आश्वासने देऊन ते मोकळे झाले नाहीत. आम्हाला त्यांचा केवढा आधार वाटायचा, परंतु वेळ पडल्यास उच्च पोलिस अगर मुलकी अधिका-यास सुद्धा ते खाजगीरित्या चांगलीच तंबी देत व त्यांचे कुठे चुकते आहे ते दाखवून देत. पण त्यांनी कोठली गोष्ट आकसाने केल्याचे आठवत नाही. पोलिसांच्या प्रशिक्षणात त्यांनी मन घातले व अनेक उत्तम सूचना केल्या. ते भारत सरकारचे गृहमंत्री असताना मी केंद्रीय गुप्तहेर विभागात सी.आय.बी.मध्ये होतो. गृहखात्यातील उच्च अधिका-यांस ते नियमाने सकाळी भेटत व त्यांचे म्हणणे ऐकून घेत, फार उद्बोधक असे प्रश्न विचारीत व सल्ला देत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org