मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९२

९२. अशाच काही आठवणी – श्रीधर प्रधान

श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलची माझी पहिली आठवण संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात असताना त्यांनी फलटणहून संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेविरूद्ध पत्रक काढले होते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते.

याच सुमारास पुणे महानगरपालिकेने यशवंतरावांना बालगंधर्व नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यासाठी बोलाविले होते. श्री.ए.एस.नाईक हे महानगरपालिकेचे आयुक्त होते. नाईकसाहेबांना हा समारंभ कसा काय पार पडतो याची चिंता लागली होती. त्यावेळी मी पुण्यास सहायक पोलिस महानिरीक्षकाचे काम करीत होतो. नाईकसाहेबांनी मला या समारंभाचे निमंत्रण दिले.

मला यशवंतरावांबद्दल आदरमिश्रित कुतूहल होते. पत्री सरकारचा प्रमुख कार्यकर्ता, मुंबई मंत्रिमंडळातील एक मंत्री व संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारा एक पुढारी असलेल्या यशवंतरावांच्या कार्यक्रमाला या कुतूहलापोटी मी पत्नीसमवेत हजर राहिलो.

नाट्यगृहाबाहेर संयुक्त महाराष्ट्र समितीची निदर्शने चालू होती. आतल्या व्यासपीठावर इतर पाहुण्यांबरोबर यशवंतराव बसले होते. निमंत्रितांत महानगरपालिकेचे सभासद व माझ्यासारखे थोडे निमंत्रित हजर होते. कमिशनर नाईक यांनी उद्घाटनाचे भाषण करून प्रमुख पाहुण्यांना नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याची विनंती केली.

यशवंतराव उठून उभे राहिले. त्यांनी बोलण्यास सुरुवात केली, तोच प्रेक्षकगृहामध्ये आरडाओरड सुरू झाली. महानगरपालिकेच्या एक सदस्या श्रीमती भीमाबाई दांगट धावत स्टेजवर गेल्या. यशवंतरावांना बांगड्या देऊ करून त्या ओरडल्या, ‘‘सूर्याजी पिसाळ, चालता हो!’’ सभेच्या जागी एकच गोंधळ उडाला. सभागृहाबाहेर पोलिस संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्वयंसेवकांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. आत हा गोंधळ चालला होता. कोणीतरी डी.एस.पींना बोलावून आणले. त्यांनी भीमाबाई व त्यांच्या सहका-यांना बाहेर नेले व सभागृहात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली. यशवंतराव उद्घाटनाचे भाषण करण्यास उभे राहिले. हसत हसत पहिलेच वाक्य उच्चारून त्यांनी सर्वांची मने जिंकली. ते म्हणाले. ‘‘इतक्या नाट्यपूर्ण पाश्र्वभूमीवर जगातल्या कोणत्याही नाट्यगृहाचे उद्घाटन झाले नसेल.’’

यथावकाश समारंभ संपला, पण यशवंतरावांच्या धीरगंभीर वृत्तीने, समयसूचकतेने व वक्तृत्वकुशलतेने मी अगदी भारावून गेलो. यानंतर माझा त्यांच्याबरोबर संबंध आला तो, यशवंतराव औरंगाबादला द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आले त्या वेळेस. तेव्हा मी औरंगाबादला उपमहानिरीक्षक होतो. कोणत्याही प्रश्नाच्या मूळ कारणाकडे जाण्याची त्यांची वृत्ती, तसेच हाताखालील अधिका-यांवर विश्वास टाकून त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे त्या प्रकारे काम करून घेण्याची त्यांची हातोटी मी अनुभवली.

मराठवाड्यातील पुढारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी औरंगाबादला आले. त्यांनी मराठवाड्यातील पोलिसांविरुद्ध तक्रारी केल्या. दिवसभर स्थानिक पुढा-यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर संध्याकाळी मला यशवंतरावांनी सुभेदारी गेस्ट हाऊसवर बोलाविले. लोकांच्या पोलिसांविरूद्ध फार तक्रारी आहेत असे सांगितले.

‘‘लोकांच्या तक्रारी ख-या असून मराठवाडा पोलिसांची कार्यक्षमता फार खालच्या दर्जाची आहे,‘‘ असे मी म्हणालो. सर्वसाधारणपणे ‘‘हे तुम्ही सुधारले पाहिजे’’ , असे काहीतरी मुख्यमंत्री म्हणतील असा माझा अंदाज होता. पण तसे न म्हणता कोठल्या तरी पोलिस ठाण्याला भेट देण्याची इच्छा यशवंतरावांनी व्यक्त केली. यावर ‘‘उद्या सकाळी आपणास वाटेल त्या पोलीस ठाण्याला आपण जाऊ व कोठे जावयाचे, ते उद्याच ठरवू,’’ असे मी म्हणालो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org