मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९१

९१. यशवंतराव, एक मुरब्बी व निर्णयकुशल प्रशासक – डी. डी. साठे

गेली तब्बल ३६ वर्षे मला श्री. यशवंतरावजींचा माझे स्नेही, मार्गदर्शक, तत्त्वज्ञानी आणि प्रेरक म्हणून सहवास लाभला. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. बाळासाहेब खेर यांनी मला त्या वेळी मद्रासहून मुंबईत आणले. मद्रासमध्ये मी अवघ्या एका वर्षात संपूर्ण नागरी परिवहनाचे राष्ट्रीयीकरण केले. राज्य परिवहन अधिकारी आणि मोटार वाहतूक नियंत्रक या नात्याने मी विभागीय परिवहन कार्यालयाचा प्रमुख होतो. पेट्रोल व सुट्या भागांचे वितरण इत्यादीवर माझे नियंत्रण होते. त्याशिवाय, मी प्रवासी रस्ते, परिवहन आणि बेस्ट (बी.ई.एस.टी.) यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचीही योजना आखली. १ जून १९४८ रोजी ही योजना कार्यान्वित करण्यात आली व १९५३ च्या सुमारास संपूर्ण प्रवासी परिवहनाचे राष्ट्रीयीकरण झाले.

या काळात, यशवंतरावजी मुख्यमंत्र्याचे संसदीय सचिव होते. या योजनेला ब-याचजणांकडून विरोध झाला. बस मालकांकडून तसेच राजकीय पुढा-यांकडून विरोध होऊ लागला. त्यामुळे मला श्री. मोरारजी देसाई आणि श्री. बाळासाहेब खेर यांच्याकडून अनेक बाबींसंबंधी सल्ला घ्यावा लागला. या काळात संबंधित बाबींवर मी श्री. यशवंतरावजींशी चर्चा करीत असे. त्या वेळी मी ३० वर्षांचा होतो. सामाजिक तत्त्वज्ञानावरील समान विचारसरणीमुळे आम्ही दोघे एकत्र आलो होतो. त्यांचा उद्देश व्यावहारिक असे. माझ्या राष्ट्रीयीकरणाच्या पद्धतीचे त्या वेळी ते समर्थन करीत.

काही ऑपरेटर्स आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या संमतीने काही ठरावीक मार्ग घेऊ नयेत किंवा ते लांबणीवर टाकावेत अशा प्रकारचे अर्ज घेऊन श्री. बाळासाहेब खेरांना भेटले. त्या वेळी मी ते मार्ग का निवडले त्याचे स्पष्टीकरण त्यांना दिले. त्या वेळी यशवंतरावजींनी आपल्या विनोदी शैलीत मला पाठिंबा देऊन सांगितले की, आपण दुसरे मार्ग निवडले असते तरीही ऑपरेटर्सनी विरोधच केला असता. कारण विरोधाला अंत नसतो.

१९५४ मध्ये माझी धारवाडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. १९५६ मध्ये द्विभाषिक राज्याची स्थापना झाली व यशवंतरावजी त्या विशाल राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी माझी विभागीय अधिकारी आणि अहमदाबाद विभागाचे आयुक्त म्हणून नेमणूक केली. ३० नोव्हेंबरला धारवाडहून निघताना मी त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्या वेळी महागुजराथ चळवळ जोरात होती. मी त्यांना १९५४ साली माझी राज्य परिवहनमध्ये बदली झाली तेव्हा तेथील महाराष्ट्रीयन लोकांनी मी अती महाराष्ट्रीयनवादी असल्याबद्दल तक्रारी केल्या होत्या या घटनेचे स्मरण करून दिले. असे असतानाही मला अहमदाबादला का नेमले? अशी पृच्छा केली. तेव्हा यशवंतरावजींनी आपले नेहमीचे स्मित हास्य करून मला सर्व समजावून सांगितले. या कठीण परिस्थितीत माझी खास नेमणूक मुद्दामच केल्याचे विशद केले आणि माझ्या प्रत्येक निर्णयाला आपला पाठिंबा दिला. नंतर आम्हा दोघांनाही हे जाणवले की, महिन्याची ८ तारीख हुतात्मादिन म्हणून मानण्यात येत असे. सतत होणारा गोळीबार व हत्या यामुळे हुतात्म्यांची संख्या वाढत होती. त्या वेळी गोळीबार करण्यास माझा विरोध असल्याचे मी माझ्या स्वत:च्या वैयक्तिक जबाबदारीवर कळविले. मला आठवते की, ज्या वेळी परिस्थिती तंग होती तेव्हा यशवंतरावजी दगडफेकीची पर्वा न करता गाडी घेऊन मला न्यायला आले. आणि परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर म्हणाले की, ‘‘जोखीम पत्करल्याविना कुठलीही चांगली गोष्ट होऊ शकत नाही.’’ ते कुठल्याही संकटाला नेहमी हसतमुखाने व सामंजस्याने सामोरे जात. यावरूनच ते फक्त राजकारणीच नव्हते तर मुरब्बी प्रशासकही होते, हेच सिद्ध होते.

साखर कारखान्याची स्थापना :

साखर कारखान्यांची उभारणी हा यशवंतरावजींचा दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय. केंद्र शासनाने अधिक (लायसेन्स) परवाने देण्याचे आपले धोरण जाहीर केले होते. त्या वेळी मुंबई राज्यात फार थोडे सहकारी साखर कारखाने होते. मुख्यमंत्र्यांच्या समवेत चर्चा केल्यानंतर, केंद्र शासनाने खाजगी व्यक्तींना नवीन कारखान्यासाठी वा अस्तित्वात असलेल्या कारखान्यांचा विस्तार करण्यासाठी परवाने देऊ नयेत असे केंद्र शासनाला सुचविण्याचे ठरले. परवाने किती द्यायचे हे केंद्र शासन ठरवू शकते. राज्य सरकार उसाची उपलब्धता व इतर बाबींचा विचार करून परवाने कोणाला द्यायचे हे ठरविते. त्यामुळे काही विशिष्ट हितसंबंधीयांकडून विरोध होऊ लागला. ह्या हिंतसंबंधीयांचा त्यांच्या क्षेत्रात तसेच राजकारणातही प्रभाव होता. यशवंतरावजींनी अतिशय शांतपणे व गोड भाषेत आपल्या सहका-यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली व नव्या धोरणामुळे ग्रामीण जनतेचा कसा अधिक लाभ होईल हे त्यांना पटवून दिले. गुजरातसह मुंबई राज्याने फक्त या धोरणाचा अवलंब केला. केंद्र शासनालाही हे फारसे पसंत पडले नाही. परंतु यशवंतरावजींनी या धोरणाचा पाठपुरावा करून ते संमत करून घेतले आणि त्यामुळे अनेक खेड्यांना संपन्नता लाभली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org