मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८९

८९.  आठवणीतील यशवंतराव – मधुसूदन कोल्हटकर

कराडमध्ये अनेक नि:स्वार्थी समाजसेवक निर्माण झाले. त्यांपैकी काही १९२० सालात एकत्र आले आणि त्यांनी लोकमान्य टिळकांच्या नावाने विद्यालय काढले. यशवंतरावजी याच शाळेचे विद्यार्थी आणि मीही याच शाळेतला. ‘‘सर्वहि तपस्या साध्यम् ’’ हे मनूचे वचन आमच्या या शाळेचे ध्येयवाक्य होते. तपस्येने प्रत्येक गोष्ट साध्य होते, असा याचा अर्थ त्या काळच्या तरुण पिढीत आणि त्यांच्या मार्गदर्शकांत आजच्या तरूणांतील सर्व काही तुच्छ लेखण्याच्या प्रवृत्तीचा प्रादुर्भाव झाला नव्हता. कराडच्या या टिळक हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षक, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि साधनं यांच्याबाबतीत, पुण्याचे नूतन मराठी विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल किंवा मुंबईचे बालमोहन विद्यामंदिर आणि चिकित्सक समूह हायस्कूलच्या तोडीचे नव्हते. पण तो काळ अगदी गतिशील होता, आदर्शवादाचं ते युग त्या काळात, या शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, त्यामुळे या शाळेचे काही विद्यार्थी तरी माध्यमिक शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊ शकले. त्या वेळच्या मुंबई राज्याचे मंत्री, श्री.यशवंतरावजी चव्हाण व ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते कुस्तीगीर श्री. खाशाबा जाधव हे या शाळेचा अभिमान विषय बनले होते. एस.एस.सी. परीक्षेत पहिलं येणं ही गोष्ट महाराष्ट्रात अगदी अलौकिक नसेल पण काहीशी अपूर्व स्वरूपाचीच मानली जात असे. काहीही असो, पण कराडच्या टिळक हायस्कूलचा विद्यार्थी म्हणून मला जून १९३५ मध्ये शालान्त परीक्षेत पहिला येण्याचा बहुमान मिळाला होता. माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या दृष्टीनेच नव्हे तर संपूर्ण कराड नगरीच्या दृष्टीनेही माझं यश हे अभूतपूर्व असंच होतं. अभिनंदनाच्या संदेशांचा अक्षरश: ओघ वाहिला. या सर्व संदेशात, मला अत्यंत अमूल्य संदेश वाटला तो यशवंतरावजींचा. स्वत: मंत्रिपदाच्या जबाबदारीत अत्यंत व्यग्र असूनही त्यांनी मला अभिनंदनाची तार
केली होती.

पुण्यात एम. ए. चा अभ्यास करीत असताना मी केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या आय.ए.एस.च्या परीक्षेला बसलो. १९६० मध्ये मी जेव्हा आय.ए.एस. झालो त्या वेळी माझ्या वडलांनी (त्यांचे आणि यशवंतरावांचे निकटचे संबंध होते) मसुरी येथील राष्ट्रीय प्रशासन अकादमीत प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी मी यशवंतरावजींची भेट घ्यावी असा आग्रह केला. १९६० सालच्या मे महिन्यातील तो पहिला पंधरवडा होता आणि दिनांक १ मे १९६० रोजी नव्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे यशवंतरावजी यशाच्या शिखरावर होते. साहजिकच ते कामात अत्यंत व्यग्र असत त्यामुळे अगदी अल्प सूचनेने त्यांची भेट घेणे मला कठिणच वाटले. पण जेंव्हा त्यांना कळले की, मला फार प्रतीक्षा करावी लागत आहे, तेव्हा त्यांनी त्वरित आपले सचिव श्री. राम प्रधान (जे आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव होते) यांना मला भेटायला पाठविण्याची सूचना दिली व वडिलांसमवेत मी यशवंतरावजींकडे गेलो. माझ्या यशामुळे यशवंतरावजींना खूपच आनंद झाला होता. त्यांनी माझे शुभचिंतन केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org