मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८५

८५. आधी दाढी कर – डॉ. सतीश देसाई

इंदिरा गांधींची हत्या झाली. त्याच्या दुस-या दिवशी मी दिल्लीत गेलो. त्या वेळी मी यशवंतरावांना जाऊन भेटलो. इंदिरा गांधींच्या हत्येने तें फार अस्वस्थ झाले होते. अक्षरश: ते रडले. ‘‘सत्तेचे प्रचंड वलय असताना इंदिरा गांधींना प्रचंड मानसिक अशांती होती.’’ असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

मी काही त्यांच्या फारसा जवळचा कार्यकर्ता नव्हतो. फारशा भेटी-गाठी देखील झालेल्या नव्हत्या. तरीही त्यांनी त्या अवस्थेत देखील कुठे उतरलात, जेवायची व्यवस्था झाली की नाही याची विचारपूस केली. माझी सर्व व्यवस्था आहे याची खात्री करून घेतली. मी परत जायला निघालो त्या वेळी ते म्हणाले, ‘‘अरे तू दाढी वाढविलेली आहेस. सध्या दिल्लीत जमाव अनावर झालेला आहे. काहीही घडू शकते, दाढी असताना तू बाहेर पडू नकोस. इथेच दाढी कर आणि मग जा.’’ त्यांनी लगेच एका माणसाला मला दाढीचे सामान आणून देण्याच्या सूचना दिल्या. मी तिथेच दाढी उरकली आणि गुळगुळीत चेह-याने त्यांच्यापुढे उभा राहिलो तेव्हा ते म्हणाले, ‘‘आता जायला हरकत नाही. आता तुला बाहेर पडलास तरी धास्ती नाही.’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org