मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८३

८३.  माननीय साहेब – नलिनीबाई शिंदे

तसं पाहिलं तर मा. साहेबांची ओळख खूप जुनी, ते मुख्यमंत्री होते त्याचे आधीची. पण मी एक कार्यकर्ती म्हणून त्यांचे डोळ्यासमोर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीची बरीच वर्षे महिला संघटक मी होते. या नाही त्या कारणाने, सत्कार वगैरे व्हायचे, मीटिंग्ज असायच्या, त्या वेळी महिला संघटनेतर्फे सत्कार करण्याचा मान मला मिळायचा. त्यांचा हसतमुख चेहरा पाहिला की, मनाची भीड चेपायची, ‘हं, कसं काय?’ साहेबांनी विचारावं, मी ‘ठीक’ म्हणून बाजूला वळावं. मनात यायचं, ‘‘येवढा मोठ्ठा माणूस आवर्जून चौकशी करतो,’’ सामान्य कार्यकर्त्यांत मिळूनमिसळून वागण्याची पद्धत ही त्यांची हातोटी. एकदा काँग्रेसभवनवरती त्यांचं कार्यकत्र्यांच्यासमोर भाषण झालं. त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले भाषण अजूनही आठवणीत आहे. ते म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यानी शब्दांचे प्रहार झेलत अनंत विरोधाला न जुमानता सद्सद्विवेकबुध्दीने प्रामाणिकपणे, जनतेच्या समोर जाऊन आपले विचार पटवून दिले पाहिजेत, जशी युध्दाच्या आघाडीवर असणा-या सैनिकांनी, जखमांची तयारी ठेवावी लागते. युध्द काही आपल्याला रणांगणावरच जाऊन लढावं लागत नाही तर जनतेसमोर जाऊन त्यांचेशी एकरूप होऊन त्यांच्या अडीअडचणींचा, त्यांच्या दारिद्र्याचा सूक्ष्मपणे अभ्यास करूनच लढाई जिंकावी लागते. विरोधकांचे प्रहार झेलण्यातच खरी कसोटी आहे.’’ ते अगदी प्रभावीपणे बोलत होते. त्यांचे शब्द अंत:करणाला भिडत होते. काँग्रेसभवनाचा हॉल गच्च भरला होता. बाहेर पटांगणात अतिशय गर्दी होती.

संयुक्त महाराष्ट्राचे वेळी शिवाजीनगर मतदारसंघातून मला तिकीट मिळालं. अशीच सभेच्या ठिकाणी गाठ पडली. मला म्हणाले, ‘‘तिकीट मिळालं खरं, पण अवघड आहे. वारं आहे संयुक्त महाराष्ट्राचं एका महिलेला तिकीट देऊन काँग्रेस कमिटीने आपलं कर्तव्य केलंय, तुमच्या पाठीशी मामासाहेब देवगिरीकर, बाबासाहेब घोरपडे या बड्या मातब्बर मंडळींचा पाठिंबा आहे,’’ अन् घटकाभर थांबून पुन्हा म्हणाले, ‘‘नलिनीबाई तुमचं माहेर कुठलं?’’ अगदी आपलेपणाने केलेल्या चौकशीने मी मोहरून गेले. मी म्हणाले, ‘‘अंकलखोप,’’ त्यासरशी ते म्हणाले, व्वा, कृष्णाकाठची जिद्द तुमच्यात आहे. म्हणूनच तुम्ही होकार दिलेला दिसतोय. ‘‘प्रयत्न आपल्या हाती आहेत.’’ हे त्यांचं बोलणं अजूनही आठवणीत आहे. त्या वेळचं वारंच वेगळं होतं. ज्या वेळी आपण प्रचंड विरोधाची तयारी करतो त्या वेळी विरोधाला तोंड देण्याची मनाची तयारी करावी लागते. निकाल संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने लागला, नागपूरला मीटिंगच्या ठिकाणी त्यांची भेट झाली, म्हणाले, ‘‘नलिनीबाई अभिनंदन!’’ मला काही कळेना. मी पडले नि साहेब अभिनंदन करतात?

‘‘अहो, बहुतेकांची डिपॉझिट जप्त झालीत पण तुमचे नाही, नाराज होऊ नका पण तुमच्यावर अन्याय झालाय हे मात्र कबूल करायला हवंय. कार्यकर्त्यानी नाराज न होता दुप्पट कामाला लागलं पाहिजे,’’ मी मनात म्हणाले,

‘‘बस्स ! आयुष्य माणसाला नेहमी चकवीत असतं हेच खरं.’’

आमच्या काँग्रेस महिला संघटनेची सहल एकदा कोयना, पोफळी, चिपळूणला गेली होती. ४५ भगिनी होत्या. वाटेत कृष्णा—कोयना संगम पाहिला, नंतर आम्ही ठरवलं मा. साहेबांच्या आर्इंना शुभेच्छा भेट द्यायची. आमची बस त्यांच्या दारात थांबली. अचानकच गेल्यामुळे भोवती शेजारच्या बायकामुलांचा गराडा, त्या वेळी त्यांच्या आई झोपूनच होत्या. घरात त्यांच्या पुतण्याची बायको असावी. आम्ही आर्इंना सांगितलं, ‘‘आम्ही पुण्याच्या, काँग्रेसच्या भगिनी आपणास भेटू इच्छितात.’’ त्यांच्या चेह-यावर समाधान दिसलं. त्यांना फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन जायला निघालो, पण त्या माऊलीने आम्हांला तसंच सोडलं नाही. ‘‘चहा घेतल्याबिगर मी जाऊ देणार नाही.’’ असं म्हणाल्या. आम्ही सांगितलं ४५ भगिनी आहोत. एवढ्यांचा चहा, अन् भलत्या वेळी आलोय? नको. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी तशी सोडणार नाही. सरबत तरी घ्यायला पाहिजेच.’’ त्यांनी घरात मोठं पातेलं द्यायला सांगितलं. सरबताची बाटली दिली. अन् म्हणतात कशा, ‘‘आता तुम्हीच करून घ्या बायांनो,’’ आम्ही सरबत करून घेतलं तेंव्हा त्या माऊलीला किती आनंद झाला, आम्हांलाही समाधान वाटलं. त्यांचा निरोप घेतला.

ही गोष्ट एकदा मी साहेबांच्या कानावर घातली. नेहमीचंच हसू त्यांच्या चेह-यावर उमटलं, हसत हसत म्हणाले, ‘‘माझी आई म्हणजे खरी देवता आहे.’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org