मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८०

८०.  मोठ्या दिलाचा माणूस – कमलाबाई काळे

मी १९५० साली कोल्हापुरास राहात होते. मला सर्व गोष्टींची आवड असल्यामुळे त्या वेळी स्थापन झालेल्या रेशनिंग सल्लागार समितीवर माझी महिला मंडळातून निवड झाली. आमच्या कमिटीचे काम चांगले झाल्यामुळे आमच्या कमिटीस कलेक्टरनी जादा अधिकार दिले होते. दर आठवड्याला आम्ही रेशनिंगची दुकाने पाहावयास जात होतो. एके दिवशी आम्हाला एक आजव्याच्या जिरग्या तांदळाचे पोते एका व्यक्तीकडे गेले आहे असे समजले. आम्ही त्याच्या सर्व दिवसभर छडा लावला व पोते शोधून काढले ! त्या वेळी ना. यशवंतराव चव्हाण पुरवठामंत्री होते. गावात सगळीकडे आरडा ओरडा झाला. नंतर स्वत: मिनिस्टर रात्री कोल्हापुरास आले. सर्व आमदार, कार्यकर्ते यांची मीटिंग बोलावली. मला बोलावण्यासाठी गाडी घरी आली. मी त्या दिवशी प्रथम काँग्रेस कमिटी पाहिली !

मी आल्यानंतर त्यांनी माझे नाव विचारले व मला म्हणाले, ‘‘तुम्ही फारच छान काम करता असे माझ्या कानावर आले आहे. त्याबद्दल मी तुम्हाला शाब्दिक शाबासकी देतो व सर्व खासदार व आमदार यांच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो.’’ तेवढे बोलून चतुराईने विषय बदलत ते रत्नाप्पा आण्णांना म्हणाले, ‘‘काय आण्णा, एवढ्या, हुशार बाई तुमच्या कोल्हापुरात असताना त्यांना तुम्ही अजून काँग्रेसचे सभासद करून घेतले नाही का?’’ एवढे बोलून त्यांनी आपल्या कोटाच्या खिशातून चार आण्याचे नाणे काढले व पुन्हा म्हणाले, ‘‘ही घ्या ह्यांची सभासद वर्गणी ! कमलाबार्इंना सभासद करून घ्या?’’ त्यांच्या चार आण्यांनी मी काँग्रेसची सभासद झाले.

१९५६ साली मी मुंबईला जाऊन कापडी बाहुल्यांचा कोर्स पूर्ण करून आले. तोपर्यंत ना. यशवंतराव मुख्यमंत्री झाले होते. म्हणून त्यांची उघड्या गाडीतून पुण्यात मिरवणूक काढली. मी खडकवासल्यास जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होते. इतक्या गर्दीतून त्यांनी मला ओळखले व हात हालवला. तो पाहून मला इतका आनंद झाला की, मी दुस-या दिवशी त्यांना भेटण्यासाठी पुण्याच्या सर्कीट हाऊसवर गेले. आत चिठ्ठी पाठवली, ‘‘दहा मिनिटांनी बोलावतो, बसा’’ असा निरोप आला. तेथे आलेल्या अनेक स्त्री-पुरूष कार्यकर्त्यानी मला सांगितले की, ‘‘मुख्यमंत्री अशी सर्वांची भेट घेत नाहीत. तुमचे काम काय आहे सांगा?’’ ते लोक फक्त मला पोट भरण्यासाठी आलेली खडकवासल्याची बाहुल्यांची शिक्षिका म्हणून ओळखत होते. साहेबांनी मला आत बोलावले व म्हणाले, ‘‘तुम्ही इथे कशा?’’ परवा मी तुम्हांला बस स्टॉपवर पहिले.’’ मी म्हटले, ‘‘साहेब, आपण एवढे मोठे झाल्यावरसुध्दा माझ्यासारख्या एका क्षुल्लक महिलेची ओळख ठेवता याचा मला खूप आनंद झाला. आणि केवळ तो व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. आम्ही खडकवासल्याला ग्रामीण महिलांसाठी बाहुल्यांचे शिक्षण केंद्र काढले आहे. त्याला आपला आशीर्वाद हवा आहे. उद्या पानशेतहून येताना खडकवासल्याला भेट द्यावी एवढीच इच्छा आहे. ते म्हणाले, ‘‘म्हणजे ? राजकारण सोडून बाहुल्या खेळायला लागलात का? मी जरूर येतो.’’

दुसरे दिवशी ते आले. खूप जनसमुदाय जमला होता. तिथल्या कार्यकर्त्यानी माझी स्तुती करून सांगितले, ‘‘तुमच्या नशिबाने चुकून राजकारणातील बाई तुमच्या गावाला आल्या आहेत. त्या आपल्याच आहेत. त्यांचा नीट फायदा करून घ्या. व त्यांना खेड्यात संरक्षण द्या.’’ दोनच शब्द पण किती समर्पक! त्या दिवसापासून त्या भागाचे लोक मला आपले मानू लागले. दिलाचा मोठा माणूस हाच खरा मोठ्ठा माणूस!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org