मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७३

७३. यशवंतराव चव्हाण  यांच्या स्मृतीस वंदन – श्रीमती अनुताई वाघ

श्री. यशवंतरावजी म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार. भारतामध्ये महाराष्ट्राची शान उंचावण्यामध्ये त्यांचाच सिंहाचा वाटा आहे. अनेक कार्यकर्त्याना त्यांनी पुढे आणले. अनेक योजनांना चालना दिली. महाराष्ट्राची यशोदुदुंभी अटकेपार गरजली.

१९४५ पासून मी बोर्डी येथे काही सामाजिक कामास सुरूवात केली. प्रसंगाप्रसंगाने त्यांच्या व आमच्या भेटीगाठी होत असत. या जरी थोडक्या असल्या तरी कायम स्मृतिपटलावर राहिल्या आहेत. पत्रव्यवहाराने पुष्कळच भेटी झाल्या आहेत. विचारविनिमय झाला आहे. कारण आमच्या संस्थेच्या या प्रयोगाचा शुभारंभ होता त्या वेळी श्री.यशवंतरावजींसारख्या समर्थ व अधिकारी व्यक्तीचा पाठिंबा अवश्य होता. त्यांनी आमच्या कामाला भरपूर पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिले. मार्ग दाखविले त्यासाठी आमची ग्राम—बाल—शिक्षा—केंद्र ही संस्था, पू. ताराबाई मोडकांसह सर्व सहकारी, मी स्वत: साहेबांचे आजन्म ऋणी आहोत.

काही विशेष व्यक्तिगत आठवणीr सांगाव्याशा वाटतात त्या अशा—

पुणे येथील शासकीय मुलीच्या ट्रेनिंग कॉलेजची मी विद्यर्थिनी. संस्थेच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त काही माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. सन मला नक्की आठवत नाही. मी एक सत्कारार्थी होते.

समारंभ पुण्यालाच झाला. साहेबांनी माझ्या पाठीवर शाल घातली. मला खूप आनंद झाला.

सध्या मला वारंवार शाली मिळत आहेत. पण माझ्या नित्य उपयोगात साहेबांच्या हातून मला सर्वप्रथम मिळालेली शाल आहे. ती आता जुनी झाली आहे. मंडळी सांगतात, ‘‘इतक्या नव्या शाली आहेत. आता ही बाजूला ठेव ना? ’’ मी स्पष्ट नकार देते. ही शाल म्हणजे प्रथम मिळालेला मान. साहेबांची स्मृती.

१९६२ साली पू. तार्इंना पद्मभूषण किताब मिळाला. त्यांना ७१ वे वर्ष चालू होते. सर्वांनी मिळून त्यांच्या कामाला आर्थिक चणचण पडू नये यासाठी एक लाख रूपये गोळा केले होते. ती थैली अर्पण करण्याचा समारंभ मुंबई येथे चर्नीरोड चौपाटीवर आयोजित केला होता. साहेबांच्या हस्ते तार्इंना श्रीफळ, शाल व थैली अर्पण करण्यात आली.

सभेसाठी प्रचंड लोकसमुदाय उपस्थित होता. वेळ संध्याकाळची, हळूहळू अंधार पडत जाणारच होता. व्यासपीठावर साहेब, पू.ताराबाई मोडक, श्रीमती सरलादेवी साराभाई व अन्य मान्यवर व्यक्ती होत्या. ईशस्तवन, स्वागतानंतर, सर्व प्रशिक्षणार्थी बंधुभगिनींनी साहेबांना मानवंदना दिली. पू. तार्इंचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांच्या भाषणानंतर साहेबांचे ओघवते मार्गदर्शक व परखड भाषेतील सुमारे पाऊन तास व्याख्यान झाले. सभा स्तब्ध आणि मुग्ध होऊन ऐकत होती. खालच्या थरापर्यंत शिक्षण पोचविणे आवश्यक आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे, या दोन गोष्टींवर त्यांच्या व्याख्यानाचा भर होता. सर्व शिक्षकशिक्षिकांचे त्यांनी मन:पूर्वक कौतुक केले.

ही अपूर्व सभा आज ३७ वर्षानंतरही जशीच्या तशीच डोळ्यासमोर येत आहे.

बोर्डीला सागराच्या स्वच्छ आणि शांत मैदानावर अशीच एक प्रचंड सभा भरली होती. सर्वोदय संमेलन होते. सन मला आठवत नाही, ही एक मोठीच उणीव आहे. सभेचे आयोजन पूज्य श्री. भिसे गुरुजींनी केले होते, तेव्हा तेथील टापटीप, सुशोभन व व्यवस्था काही बोलायलाच नको. मुख्य वक्ते साहेबच होते. स्वातंत्र्यानंतर तेवढ्याच जिद्दीने, नि:स्वार्थी वृत्तीने स्वतंत्र करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. ही गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली. जोमदार भाषेच्या प्रभावाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. ही सभाही सायंकाळीच झाली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org