मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७२

७२. यशवंतरावांचा संस्थेबद्दलचा जिव्हाळा – सुमतीबाई शहा

नव्या महाराष्ट्राच्या निर्मिर्तीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे महान नेते होते. यशवंतरावांनी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य मिळविण्यापासून ते सुराज्य निर्मितीपर्यंत आपले आयुष्य देशाच्या उन्नतीसाठी चंदनासारखे झिजविले. यशवंतरावांच्या जीवनाचे पैलू पाहात असताना एक वैशिष्ट्य मनात भरते की, असामान्य व्यक्तिमत्त्व असलेला हा नेता सामान्यांच्या मनाशी सुसंवाद साधून काळाच्या आव्हानावर मात करून सामाजिक व राष्ट्रीय प्रगती घडवून आणणारा होता. राजकीय क्षेत्रात काम करता करता त्यांनी समतोलता राखली. शेतक-यांच्या हातात देशाच्या प्रगतीचे चक्र सहजपणे येईल असा कायापालटही त्यांनी केला. महाराष्ट्र घडविला तो ‘‘दोन वसंतांनी व एका यशवंतानी’’ हे वाक्य यथार्थ आहे.

अशा या महान नेत्याच्या अंत:करणात शैक्षणिक क्षेत्राबद्दल आदर होता, जिव्हाळा होता व शैक्षणिक संस्थाच देशाचे भवितव्य घडवतील हा दूरदृष्टिपणाही होता. म्हणूनच माझ्या या आश्रमावर त्यांनी जिवापाड प्रेम केले. महिलाकार्येच देशाला घडवू शकतील ही जाणीव त्यांनी सदोदित आपल्या अंत:करणात ठेवून आमच्या आश्रमाबद्दल बोलताना ते म्हणत, ‘‘तुमचा आश्रम शिक्षणासोबत सुसंस्कार देत आहे आणि संस्कृतीचा वसा भावी पिढीला देत आहे. असा आश्रम, ही शैक्षणिक संस्था भारतात एकमेव आहे.’’ यशवंतरावांनी या आश्रमाच्या कार्यातून बंधुभाव जतन केला व भाऊबीज म्हणून आर्थिक मदतीपेक्षा महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना संस्थेला भेट देण्याचा आदेश दिला.

प. पू. आचार्य श्री. एलाचार्य महाराजांच्या प्रवचनाला ते उपस्थित असतानाचा दिल्लीतील एक प्रसंग. तेव्हा ते संरक्षणमंत्री होते. प्रवचनानंतर आम्ही त्यांच्याच मोटारीतून त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तेथे वसंतराव नाईक व वसंतरावदादा पाटील हे उपस्थित होते. यशवंतरावांनी त्यांना विचारले, ‘‘सुमतीबार्इंचे संस्कार तुम्ही पहिले का? ते अवश्य पाहा.’’ ही आज्ञा मिळताच वसंतराव नाईक यांनी ते मुख्यमंत्री असताना सोलापूर भेटीत आमच्या संस्थेला स्वत:हून खास भेट दिली. आणि हे कार्य पाहून मुख्यमंत्री निधीतून रू. ११,०००/- (अकरा हजार) ची भाऊबीज ओवाळणी दिली. यशवंतरावांची कार्य करण्याची ही पद्धती अजोड होती. दूरदृष्टीपणा ठेवून अशा विधायक कार्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हातभार लावणे हा त्यांच्या थोर मनाचा एक महान गुणधर्म होता. सौ. वेणूतार्इं यांचाही आमच्याशी स्नेहसंबंध जवळचा होता. त्यांनी महाराष्ट्रावर पुत्रवत प्रेम केले. यशवंतरावांच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहेच. एका थोर नेत्याची सहचारिणी म्हणून त्यांनी खचितच आपली भूमिका पार पाडलेली आहे.

कृष्णाकाठच्या मातीत वाढलेला एक शेतकरी कुटुंबातील बळवंतांचा हा यशवंत आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्ती मिळवू शकला तो अंगी असलेल्या नि:स्वार्थी, नि:स्पृह व जाज्वल्य देशप्रेमातून, त्यांची लढाऊ वृत्ती अन्यायावर मात करून प्रगतीचे नवे दालन निर्माण करणा-या महान क्रांतिकारकांची होती. ही वृत्ती पाहून देशाचे महान पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे हात बळकट करण्यासाठी त्यांची सेवा केंद्रीय मंत्रिमंडळात रूजू करण्याचे सांगितले आणि यशवंतरावांनी ‘‘सह्याद्री’’ प्रमाणे ताठ राहून हिमालयाच्या हाकेला साद घालीत संरक्षणमंर्ताची भूमिका आपल्या अलौकिक कामगिरीतून यशस्वीपणे राबवून परकीयांचे आक्रमण परतवून लावले. अशा या महान भारतपुत्राला माझी श्रध्दांजली!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org