मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६९

६९. प्रेमळ माणूस - पोपटलाल शहा

महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भारताच्या स्वातंर्ताच्या चळवळीमध्ये व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या नवराष्ट्रनिर्मितीच्या कार्यात गेल्या साठ वर्षांचा काळ अनेक दृष्टींनी संस्मरणीय असा आहे. या काळात महाराष्ट्राचे व भारताचे नेतृत्व करणारे श्रेष्ठ नेते म्हणून श्री. यशवंतराव चव्हाण हे अग्रगण्य ठरतील. मी १९१४ सालापासून राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेणारा काँग्रेस कार्यकर्ता असल्यामुळे यशवंतरावांचा आणि माझा घनिष्ठ संबंध होता. त्यामुळे त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात येतात. १९४६ ते १९५६ ह्या काळात मी मुंबई विधानसभेतील काँग्रेसपक्षीय सभासद असल्यामुळे तर त्यांचा व माझा फारच जवळचा संबंध आला.

अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात ग्रामीण भागात जन्मलेले यशवंतराव अगदी लहानपणीच पोरके झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांची परिस्थिती किती बिकट झाली असेल ह्याची कल्पनाच करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सोळा-सतरा वर्षांच्या अल्प वयातच त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली व आयुष्यभर राष्ट्रकार्य करून यशस्वी नेता म्हणून देशाच्या प्रगतीसाठी बहुमोल कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थिती योग्य रीतीने हाताळून त्यांनी मार्गक्रमण केले. आपला निर्णय झाल्यावर ते आपली भूमिका व आपला विचार यशस्वी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत. समाजातील विविध घटकांशी व कार्यकर्त्याशी लोकसंग्रहाच्या भूमिकेने दृढ संबंध ते ठेवीत व लोकांचा पाठिंबा मिळवीत.

१९५६ साली विशाल द्विभाषिक मुंबई राज्यांची निर्मिती झाली आणि या राज्याचे मुख्यमंत्रिपद कोणाकडे सोपवावयाचे हा प्रश्न विधिमंडळ काँग्रेसपक्षापुढे आला. त्या वेळी यशवंतराव हे बहुमताने नेते म्हणून निवडले गेले. मराठी भाषेच्या संपूर्ण प्रदेशाचे मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे यासाठी मोठी चळवळ चालू होती. त्या परिस्थितीमध्ये साधक-बाधक विचार करून त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या निर्णयानुसार द्विभाषिक राज्याची योजना राबविण्याचा स्वत:चा विचार पक्का केला व नेतृत्वाची निवडणूक लढविण्याचे ठरविले. ते काम त्या वेळी अतिशय अवघड होते. पण ते त्यांनी स्वीकारले. निवडणुकीमध्ये बहुमताने यशस्वी झाल्यानंतर ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, ‘‘आता आपणाला फार काम करावे लागणार आहे.’’ हे म्हणत असताना त्यांच्या चेह-यावर जे भाव उमटले होते ते इतक्या वर्षानंतरही आज मला स्पष्टपणे आठवतात. त्या अवघड परिस्थितीमध्ये काँग्रेसपक्षाच्या निर्णयानुसार जबाबदारी घेण्याची धीरगंभीर वृत्ती आणि माझ्यासारख्या सहका-याकडून त्यासाठी हक्काने व विश्वासाने कामाचे सहकार्य मागण्याची वृत्ती त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसली.

मुंबई राज्यात पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्री याप्रमाणे यशवंतराव दीर्घकाळ सत्ताधारी होते. पण राजकारण व सत्ता यांच्याव्यतिरिक्त समाजजीवनांतील इतर घडामोडींमध्येही ते आपुलकीने लक्ष घालीत असत. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या एका समारंभासाठी आले असता, ‘‘काय पोपटलाल, काय म्हणतंय तुमचं इतिहास संशोधक मंडळ?’’ असा प्रश्न विचारून त्यांनी मंडळाच्या कार्याबद्दल आस्थेवाईकपणे विचारपूस केली. मंडळाबद्दलची आपुलकी त्यांच्या बोलण्यातून सर्वांना प्रतीत झाली.

कराड तालुक्यातील चरेगाव-उंब्रज येथील समाजप्रेमी डॉक्टर श्री. माणेकलाल गुलाबचंद शाह यांच्या एकसष्टीपूर्तीनिमित्त १९८३ सालाच्या सुरुवातीला त्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी गेलो होतो. कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर मला त्यांनी पाहिले आणि जवळ येऊन क्षणार्धात त्यांनी मला कडकडून मिठी मारली. १९५६ साली विशाल द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव निवडले गेले त्यावेळची परिस्थिती व १९८३ साली डॉक्टर माणेकलाल शाह यांच्या गौरव समारंभाच्या वेळची परिस्थिती यांत मोठा बदल झाला होता. आता यशवंतराव मंत्री नव्हते. पण माझ्यासारख्या दीर्घकाल राष्ट्रकार्य करणा-या काँग्रेस कार्यकर्ताबद्दल १९५६ साली किंवा त्यापूर्वीही त्यांनी जे प्रेम बाळगले तेच प्रेम १९८३ साली कडकडून मारलेल्या त्या मिठीमध्येही होतेच. यशवंतरावांच्या चाहत्यांनी ते दृश्य डोळे भरून पाहिले. त्यांची व माझी ही शेवटचीच भेट. आता उरल्या आहेत फक्त पस्तीस-चाळीस वर्षांतील विविध आठवणी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org