मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६५

६४.  महाराष्ट्राचा वेणूनाद  - सूर्यकांत ग. देशपांडे

यशवंतराव चव्हाण इतिहासाचे एक पान काळाच्या आड दडले गेले. कलावंताच्या कलेचा रसिकतेने आस्वाद घेणारे यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व लोभस होते. जीवनाच्या प्रारंभापासूनच संघर्ष करीत करीत ते घडत गेले, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच ‘‘यशवंतराव चव्हाण’’ हे स्वत:चे असे व्यक्तिमत्त्व साकार करून घेतले. कृष्णेकाठच्या मनोहारी जीवनाचा सोनहारी स्पर्श लेवून, सागरतीरावरील विशाल जीवनाची खोली घेऊन, यमुनेच्या शांत मुग्धतेत रममाण झालेला यशवंतराव हा महाराष्ट्राचा एक ‘‘वेणूनाद’’ होता.

मराठी मनाला मोहविणारे यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व हे कवी अनिलांनी रचलेल्या आणि वसंतरावजी देशपांडे यांनी गायिलेल्या ‘‘वाटेवरी काटे वेचीत चाललो । वाटले जसा फुलांफुलांत चालतो.’’ या भावगीतातील भावनांचे मूर्तिमंत रूप होते. यशवंतराव फार मोठे रसिक होते. त्याच रसिकतेतून त्यांच्या जीवनाचे हे काव्यात्मक निरीक्षण कुणालाही खुलविणारेच ठरेल.

वास्तविक कवी अनिलांनी फार पूर्वी लिहिलेले हे भावगीत ब-याच कालावधीपासून वसंतरावजींच्या पहाडी आवाजात मराठी रसिक ऐकत आले आहेत. परंतु त्याचा भावनात्मक आविष्कार यशवंतरावांच्या जीवनात झालेला दिसून येणारा आहे. सदैव माणसांच्या मेळ्यात रमणारे यशवंतराव—

‘‘आदीचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ, वाजवीत चाललो’’

अशी वाट चालत राहिले. ऐतिहासिक परंपरेचा वारसा घेऊन मोठमोठी पदे ते भूषवित राहिले. नवविचारांचा कानोसा घेत घेत देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करीत राहिले. त्या नादात त्यांची चाल ज्या वेळी चुकली त्या वेळी—

‘‘चुकली नादात चाल, लागला जिवास बोल
ढळलेला तोल सावरित चाललो’’

असे गुणगुणत यशवंतराव स्वगृही परतले नसतील कशावरून, राजकारणात यशवंतराव विरोधकांशी लढतच राहिले. परंतु आपले म्हणणा-या त्यांच्या माणसांनीही ज्या ज्या वेळी त्यांचे विरूद्ध पवित्रा घेतला तो विरोधही पत्करून ते आपल्या मार्गावरून चालत राहिले. ग.दि.मां.चा तो डौलदार गजराज धीमेपणाने चालत राहिला. त्या वाटेवरील काटे तुडवितांनाही वैचारिक पुष्पाचा सुगंध उधळविण्याची त्यांची रसज्ञ वृत्तीही दिसून यायची.

निखळ राजकारण करीत करीत जीवनाचे सर्वथैव व्यापताना त्यांच्या व्यक्तित्वात एक आगळाच आत्मा आविष्कारलेला दिसून यायचा तो आत्मा आता अमरत्वात विलीन झाला. त्या वेळी एकाकी यशवंतरावजींच्या त्या मृदूलतर मनाने ‘‘सुखदु:खाने भारावलेले खांद्यावरील ते ओझे फेकून देऊनी आता परत चाललो,’’ असे कदाचित म्हटले नसेल का?

‘‘सह्याद्रीचे वारे’’ वहावेत तसे त्यांचे जीवन झंझावाती होते आणि झुळझुळतेही ‘सगळ्यात असूनही नसणारे’, यशवंतराव आज खरोखरच नाहीत. ही कल्पना खटकणारी आणि दु:ख देणारी आहे. चंद्रभागेच्या घाटावरून मोठेपणी आईशिवाय चालताना यशवंतरावांना ज्याप्रमाणे त्यांचे बोट सुटे सुटे वाटायचे आणि आईच्या आठवणीने नजर ओलावयाची तीच नजर आज महाराष्ट्राच्या लोचनी पाणावली आहे. कारण त्याच्या द-याखो-यातील एक ‘‘वेणूनाद’’ लुप्त झाला आहे. सहकाराचा हात, कलावंताच्या पाठीवरील थाप, मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व, प्रोत्साहित करणारे नेतृत्व, हे सगळे काही विरून गेले. फक्त राहिले त्या वेणुनादाचे स्मृती कवडसे आणि ते कवटाळणारे रसिक.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org