मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६४

६४.  गुणग्राहक आणि रसिक माणूस – भालचंद्र फडके

१६ जून १९६२ ची गोष्ट. त्या दिवशी ना. यशवंतराव चव्हाण अकोल्याला आले होते. कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होते. मला या महाविद्यालयात दोन वर्षांपुरते शासनाने मराठीचा प्राध्यापक म्हणून पाठवले होते. मराठीचे अध्यापन आठवड्यातून तीन तास करावे लागे व बाकीच्या अभ्यासेतर उपक्रमांच्या जबाबदा-या उचलाव्या लागत. या वास्तव्यात कृषिविषयक माहिती पुस्तिका सोप्या मराठी भाषेत मी तयार केल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांचे स्वागत थाटामाटाने व्हायचे होते म्हणून माझ्याकडे स्वागतपर पद्य रचण्याची जबाबदारी आली. माझे श्वशुर डॉ.कदम कृषिखात्याचे सहसंचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक. यशवंतरावांना त्यांच्याबद्दल विलक्षण अभिमान व आदर. यशवंतराव आले. सुरूवातीच्या परिचयात माझी ‘कदमसाहेबांचे जावई’ अशी ओळख करून देण्यात आली. ते म्हणाले, ‘‘म्हणजे आमचेच जावई.’’

स्वागतपद्य सुरू झाले. त्याच्या काही ओळी आज आठवतात. त्या अशा

नमने वाहुन, स्तवने उधळू गाऊ मंगल नाम
महाराष्ट्राच्या प्रेमळ नेत्या तुजला लक्ष प्रणाम
या सोन्याच्या दिनी भेटली मोर्णेला कृष्णा
या ज्ञानाच्या मंदिरी करतो स्वागत यशवंता
सह्याद्रीच्या द-यात घुमती तुझे किर्ति-घोष
व-हाडच्या मातीत जागतो तुझाच आवेश
घराघरातुन आज वाहतो हर्षाचा गंध
तुझिया स्पर्शे तेवत राहिल इथे ज्ञानज्योत
लोक सुखी तर देश सुखी हा अमुचा मंत्र
एकमुखाने गर्जत राहू अमुचा महाराष्ट्र

या पद्यातील ‘लोक सुखी तर देश सुखी’ ही ओळ उद्धृत करून त्यांनी तासभर भाषण केले. समारंभानंतर मी व माझ्या पत्नीची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. लग्न होऊन नुकतेच पंधरा दिवस झाले होते. त्यांनी सहज विचारलं, ‘‘कुठं राहता?’’ मी म्हटलं,‘‘घर मिळालं नाही. सध्या कुठल्या तरी अडगळीच्या खोलीत मुक्काम आहे.’’ शेजारी अकोल्याचे कलेक्टर शिंदे साहेब बसले होते. यशवंतराव म्हणाले, ‘‘काय हो शिंदे आमच्या जावयाला घर द्यायला पाहिजेल.’’ शिंद्यांनी चटकन उत्तर दिले, ‘‘मुलगी दिली कदमसाहेबांनी, आम्ही घर देऊ.’’ आणि दुसरेच दिवशी अकोल्यात चांगला ब्लॉक मिळाला.

एकदा श्री. यशवंतराव मिलिन्द महाविद्यालयात आले होते. डॉ. आंबेडकरांच्या संबंधी त्यांच्या मनात खूप आदर होता. त्यांच्या भाषणातले एक वाक्य आठवते. ते म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांड पंडित होते, त्यांच्याजवळ महात्मा बुद्धांची प्रज्ञा आणि करूणा होती.’’

श्री. यशवंतराव रसिक वाचक होते. सामाजिक चळवळीसंबंधी कुणी काही लिहिले की ते मुक्तकंठाने कौतुक करीत. माझ्या धाकट्या बंधूंची ‘शोध बालगोपाळांचा’, ‘केशवराव जेधे’, ‘शोध सावरकरांचा’ इत्यादी पुस्तके त्यांनी रसिक व चिकित्सक वृत्तीने वाचली होती.

यशवंतराव दिल्लीच्या विमानतळावर एकदा भेटले. सभोवताली अधिकारपदावर नसल्यामुळे माणसांचा गराडा नव्हता, एकटेच बसले होते. काहीतरी वाचीत होते. वाङ्मयातील नव्या प्रवाहांचे ते स्वागत करीत. त्यांच्या वाचनात माझी ‘दलित साहित्या’ वरील पुस्तके आली होती. दलित साहित्याच्या सामर्थ्याबद्दल ते मते मांडीत होते. त्यांची गुणग्राहकता विलक्षण होती व आपल्या म्हणून मानलेल्या माणसांबद्दलचा जिव्हाळा अपूर्व होता. कराडचे साहित्यसम्मेलन अत्यंत तणावयुक्त वातावरणात भरलेले. आदल्या दिवशी सम्मेलनाची व्यवस्था पाहात ते हिंडत होते. पण काम करणा-या प्रत्येक माणसाची आस्थेनं चौकशी करीत होते. भोजनव्यवस्थेत एकजणाला त्यांनी म्हटले, ‘‘अहो, तुमचा मुलगा अमेरिकेत भेटला. चांगल चाललंय.’’ कृतज्ञतेने त्याचे डोळे पाण्याने भरून आले.

यशवंतरावांच्या स्वरातच एक प्रकारचे आर्जव आणि मार्दव असते. त्यामुळे त्यांच्या प्रोत्साहनपर, जिव्हाळ्याच्या शब्दाने कार्यकर्त्याचा शीण नाहीसा होई. त्यांना वाटे की, आपलं म्हणावं असं कुणीतरी आहे. सत्तेवर असणारी माणसे आपल्याच कार्यकर्त्याशी तुसडेपणाने वागताना मी पाहिली आहेत. यशवंतराव सत्तेवर होते तेव्हा आणि सत्तेवरून उतरल्यानंतरही त्यांच्या वागण्यात तोच जिव्हाळा, तीच गुणग्राहकता होती. पुणे विद्यापीठाने त्यांच्या कर्तृत्वाचा ते सत्तेवर नसताना सन्माननीय ‘डी.लिट्.’ पदवी देऊन गौरव केला हे मला विशेष वाटले. कर्तृत्ववान माणसासंबंधी त्यांनी किती विनम्र भाषेत विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘‘कुठल्याही समाजातील कर्तृत्ववान माणूस हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत नाही. नवनीत म्हणजे आपण ज्याला लोणी म्हणतो ते दुधातून येते. दूध नसेल तर लोणी नाही, समाजजीवन जेव्हा खळखळलेले असते, तेव्हा त्यामध्ये काहीतरी साचत असते. नवनीत निर्मिणा-या दुधाप्रमाणे त्यात एक शक्ती असते. नवनीताला स्वतंत्र अस्तित्व असते ही खोटी गोष्ट आहे. तीच गोष्ट कुठल्याही कर्तृत्ववान माणसाच्या जीवनासंबंधीही खरी आहे.’’ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांचे जीवन हा मराठी जनतेच्या जीवनाचा प्रसाद कण आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org