मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ६३

६३. यशवंतराव यांच्या सहवासात – डॉ. प्र. चिं. शेजवलकर

ना. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे सर्वांत लोकप्रिय नेते होऊ शकले ह्याचे कारण ते अगदी सर्वसामान्य माणसांशी देखील खरोखरीच आपुलकीने बोलत. त्यांची स्मरणशक्ती जास्तच तीव्र असली पाहिजे, कारण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाने त्यांच्या सहवासाचा एखादा जुना प्रसंग पुन: त्यांना भेटल्यानंतर डोळ्यापुढे उभा केल्यास त्या जुन्या प्रसंगातील काही तपशील ते आपणहून सांगू शकत ! त्यांच्या ह्या लोकसंग्रही स्वभावाचे खरे रहस्य हेच की, त्यांना आपल्या अनभिषिक्त लोकप्रियतेचा आणि मिळालेल्या औपचारिक सत्तेचा कधीही अहंकार झाला नाही. आपल्याला मिळालेले मोठेपण लोकांच्या पाठिंब्यावरच आहे ह्याची त्यांना जाण होती. आणि म्हणून त्यांच्या घरी येणा-या प्रत्येकाचे ते आणि सौ. वेणूताई मनापासून आदरातिथ्य करीत.

यशवंतराव दिल्ली येथे १९६२ नंतरच्या लगेचच्या काळात संरक्षणमंत्री म्हणून कृष्ण मेनन ह्यांच्या जागी गेल्यानंतरचा काळ त्यांच्या बाबतीत माझ्या विशेष लक्षात आहे. अध्यापनाच्या काही कामानिमित्ताने १९६३ मध्ये मी महिना दीड महिना दिल्ली येथे मुक्कामास होतो. महाराष्ट्राच्या आपल्या लाडक्या नेत्यास एकदा खरोखरच भेटावयास जाऊन बघावे असे साहजिकच वाटले. त्यांचे त्या काळचे सचिव, तितकेच लोकप्रिय, श्री.डोंगरे ह्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यावर सायंकाळची त्यांच्या घरी भेटण्याची वेळ मिळाली. कचेरीत येण्याऐवजी घरीच जरूर या असे साहेब म्हणाल्याचे श्री.डोंगरे यांनी सांगितले. त्यांच्या घरी जवळजवळ दीड ते दोन तास वेळ केवळ मला एकट्याला त्यांच्याशी बोलता आले! वेणूतार्इंनी आदरातिथ्य केले. दिल्लीतील राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी चर्चा केली. परंतु माझ्या कुतूहलापोटी आलेल्या अनेक प्रश्नांबाबतही त्यांनी फार सुंदर विवेचन केले. महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी त्यांनी केलेली चिकित्सा अतिशय तर्कशुद्ध आणि यथार्थदर्शन असलेली होती. मी त्या आधी दोन-तीन वेळा आमच्या महाविद्यालयाच्या व्याख्यानासाठी निमंत्रण करण्याकरिता म्हणून पुण्यातील सर्किट हाऊसवर बोलवावयास गेलो होतो. त्या वेळी मी विचारलेल्या काही प्रश्नांबाबत आणि त्या वेळी त्यांनी दिलेल्या उत्तरांबाबत त्यांनी आठवण सांगितली. ह्या गोष्टीचे मला कमालीचे आश्चर्य वाटले.

त्यानंतरच्या माझ्या दिल्लीच्या मुक्कामात दोन-तीन वेळा विशेष आगाऊ मुलाखतीची वेळ न ठरवता मी जाण्याचे धाडस केले. त्या वेळचा त्यांचा संरक्षणमंत्री म्हणून असलेला दर्जा आणि घाईगर्दीचा काळ ह्यासारख्या गोष्टी डोळ्यापुढे येऊनही ते आलेल्या प्रत्येकाशी जणू काही तो आलेला फार जुना मित्र आहे अशा आपुलकीने बोलू शकत व त्यासाठी वेळ देत. हा त्यांचा मोठेपणाचा ठसा माझ्या मनावर कायमचा उमटला. यशवंतरावांच्याकडे गोरगरीब आणि सर्वसामान्य लोक तर जातच परंतु सर्वांकडून आतिशय बुद्धिवान आणि म्हणून अहंकारी समजले जाणारे लोकही यशवंतरावांचा नम्र, आर्जवी, स्वभाव पाहून स्तिमित होत. यशवंतरावांच्या निधनाच्या आधीच्या चार-पाच वर्षांच्या काळात ते ज्या ज्या वेळी काही सभासमारंभाच्या निमित्ताने पुण्यात अनेक वेळा येत, त्या त्या सर्व वेळी एरवी एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कीर्तिमान नेत्यांच्या वागण्यात दिसून येणारा अलिप्तपणा मला यशवंतरावांच्या चेह-यावर कधीही दिसला नाही. असा व इतका लोकप्रिय नेता, सर्वांना हवाहवासा वाटणारा, विरोधकांच्या मनातही आपुलकी निर्माण करणारा यशवंतरावांनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील सोडल्यास दुसरा कोणीही अद्याप झाला नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org