मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५९

५९. सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व – म. द. हातकणंगलेकर

यशवंतराव चव्हाण हे गेल्या अर्ध्या शतकात प्रकाशमान झालेले महाराष्ट्रातील अत्यंत लक्षणीय असे राजकीय आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व होय. आमच्या पिढीच्या अगोदरच्या कालखंडात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्वाची जडणघडण झाली. त्यामुळे समवयस्क म्हणून त्यांचा संबंध येणे शक्यच नव्हते. ते माझ्या मामांचे समकालिन आणि परिचित असल्याने आमच्या घरी त्यांचे नाव अनेक वेळा कानावर पडत असे. सांगलीला ते आमच्या घरी, म्हणजे मामांच्या घरी येऊन गेल्याचेही मला अंधुकपणे आठवते. त्यांनतर त्यांची राजकीय कारकीर्द अधिक ठळक आणि तेजस्वी बनत गेली. ते महाराष्ट्राचे आणि भारताचे नेते झाले. पूर्वीच्या सर्वसाधारण परिचितापासून त्यांचे अंतर साहजिकपणे वाढत गेले. तरीदेखील दौ-यावर असताना त्यांच्या घरगुती गाठीभेटी होत असतच! त्यांच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा त्यांचे साहित्यातील आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भारदस्त अस्तित्व हा माझ्या दृष्टीने अत्यंत कुतूहलाचा आणि समाधानाचा विषय होता. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट होईल असे मात्र मला कधी वाटले नव्हते. तो योग अकल्पितपणे आला.

यशवंतरावांच्या साहित्यप्रेमामुळे त्यांच्या जन्मभूमीत कराडला साहित्यसंमेलन अतिशय नाजूक राजकीय परिस्थितीत पार पडले. त्या संमेलनासाठी जो निधी जमा झाला त्यातील शिल्लक राहिलेल्या पैशातून कराड साहित्य पुरस्काराची योजना तयार झाली. मराठीतील होतकरू, तरूण लेखकाला पुढच्या लेखनासाठी उमेद वाटेल असा रोख रकमेचा भरीव पुरस्कार देण्याची ही योजना होती. दिल्लीच्या साहित्य अकादमीच्या पारितोषिकाच्या रकमेइतकीच या पारितोषिकाची रक्कम ठेवण्यात आली. या पुरस्काराला अकादमी पुरस्काराची प्रतिष्ठा लाभावी अशी कल्पना होती. पुरस्कारासाठी वाङ्मयप्रकारानुसार दरवर्षी एका लेखकाची निवड करण्यासाठी एक परीक्षक समिती नेमण्यात आली. या समितीवर काम करण्याची संधी मला मिळाली.

१९८१ सालचा कराड पुरस्कार ललित गद्य या वाङ्मय प्रकारासाठी डॉ. अनिल अवचट यांच्या ‘माणसं’ या पुस्तकाला दिला गेला. हा पुरस्कार मार्च महिन्यात एका समारंभात डॉ.अवचट यांना देण्यात  आला. या समारंभासाठी यशवंतराव स्वत: उपस्थित होते. ते समारंभाचे अध्यक्षच होते. परीक्षकांच्यावतीने ‘माणसं’ या पुस्तकावर मी थोडा वेळ बोललो. लालित्याचे स्वरूप आज केवळ भाषिक राहिलेले नाही. जीवनाच्या विविध अंगाबद्दलची जिवंत आस्था ही लालित्याचे नवे रूप दाखवू शकते असा माझा मुद्दा होता. तो त्यांना आवडला होता. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी त्याचा संयतपणे उल्लेख केला. यशवंतरावांच्या वागण्यात, अनुकूल अगर प्रतिकूल असे एक दुर्मिळ प्रकारचे सौजन्य आणि दर्जा होता. त्यामुळे त्यांचे अबोल अगर मितभाषी कौतुक देखील लोकांना अपूर्वाईचे वाटत असे. याचसाठी त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा मला खोलवर आनंद वाटला. दुस-या दिवशी मला लौकर निघायचे होते म्हणून मी पहाटे उठून तयारी करू लागलो तर मला अधिकाधिक अस्वस्थ वाटू लागले. उजव्या बाजूस मूत्राशयाच्या जागी कळा येऊ लागल्या. सकाळची वेळ असूनही खूप घाम येऊ लागला. आम्ही तसेच बस स्टँडपर्यंत चालत गेलो. गो.म.पवार, सप्रे बरोबर होते. बसला वेळ असल्याने बाकावर बसलो. कळा वाढल्या आणि असह्य होऊ लागल्या. तेव्हा आम्ही शेजारी दिसणा-या हॉस्पिटलमध्ये गेलो. थोड्या वेळात डॉक्टर, कराडमधील स्नेही त्वरेने आले. डॉक्टरांनी ‘समर कॉलिक’ असे निदान केले. उपचार सुरू केले. झोपेचे इंजेक्शन दिले. त्रास थोडा कमी झाला, पण स्वस्थता नव्हती. झोप नीट लागत नव्हती. थोडी ग्लानी असेल. तोच माझे मित्र सांगत आले की यशवंतराव हॉस्पिटलकडे येत आहेत. त्यांना कुणीतरी मी आजारी झाल्याची बातमी दिली होती आणि ते समाचाराला आले होते! मी एकदम सावध झालो. यशवंतरावांना जिने चढायचा त्रास होतो हे मला आठवले आणि मीच एक जिना उतरून खाली आलो. ‘अरे तुम्ही कशाला खाली आलात? पेशंटला पाहायला आलो तर पेशंटच भेटायला खाली आला.’ असे मंद हसत म्हणाले. माझ्या आजाराची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. हा त्रास मूत्राशयातील खड्याचा आहे असे सांगितले. आणखीही माहिती दिली, ‘‘मलाही हा खडा आहे, मोठा आहे पण नीट बसलेला आहे. डॉक्टरांचे म्हणणे असे की, जोपर्यंत फार त्रास होत नाही तोपर्यंत शस्त्रक्रियेचा विचार करण्याचे कारण नाही. पथ्यपाणी मात्र थोडेफार असावे.’’ असे त्यांनी सांगितले. काळजी घेण्याची सूचना करून ते सावकाश निघून गेले. माणसे जोडण्याची त्यांची ही कला माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आली आणि माझ्या मनातले त्यांच्याबद्दलचे अगत्य वाढले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org