मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५६

५६. रसिकश्रेष्ठ – पंडित भीमसेन जोशी

यशवंतरावांचा आणि माझा जिव्हाळा ही गोष्ट वर्णन करता येण्यासारखी नाही. वर्णनाच्या पलीकडची आहे. नाते मात्र सांगता येईल. ते एक श्रेष्ठ दर्जाचे रसिक आणि मी एक कलावंत. हे खरे नाते.

महाराष्ट्रात सरकारी संगीत महोत्सव सुरू केला तो यशवंतरावांनी. त्यांची आणि माझी ओळख आधी झाली होती, पण हा उत्सव सुरू झाल्यानंतर जास्ती चांगली ओळख झाली आणि ती वाढत गेली.

यशवंतराव मुख्यमंत्री झाले त्यानंतर आमची भेट वरचेवर होऊ लागली. कोणत्या ना कोणत्या विमानतळावर आमची नेहमी भेट होत असे. केव्हाही भेट झाली की, ते मला ‘‘काय गायक?’’ असे विचारीत मिठी मारत असत. खांद्यावर हात टाकून जवळ घेत, आणि खुशाली विचारत. घरातल्या वडीलधा-या माणसाने करावी तशी ख-या कळकळीने, अगत्याने चौकशी करत.

एकदा काय झाले, यशवंतराव तेव्हा संरक्षणमंत्री होते. कलकत्त्याहून गोहत्तीला चालले होते. डमडम विमानतळावर त्यांचे विमान सज्ज होते. मंत्र्याने रवाना होण्यापूर्वीचे सगळे सोपस्कार चालले होते. त्यांचं विमान उड्डाण करून जाईपर्यंत बाकीच्यांच्या जाण्याचा विचारही होणार नव्हता. मी त्यांच्यापासून ब-याच अंतरावर गर्दीत उभा राहून तंबाखू चोळत वाट पाहत होतो...एवढ्यात त्यांचे लक्ष माझ्याकडे गेलं. त्यांची नजर घारीसारखी असायची. एवढ्या गडबडीत आणि गर्दीतही त्यांची नजर माझ्याकडे गेली. लगेच सुमारे पाचसहाशे फुटांचं अंतर पायी चालत ते माझ्याकडे आले. नेहमीप्रमाणे प्रेमाने मिठी मारली, खुशाली विचारली आणि म्हणाले, ‘‘किती सुखी माणूस आहात तुम्ही? तुमचे तुम्ही स्वतंत्र आहात. नाही तर आमचे पाहा... तुम्ही सर्वांना मोठा आनंद देता.’’

तेव्हा मी म्हटले, ‘‘आमचे इलेक्शन एकदाच जन्माला येताना ‘वरून’ झालेले. तुमच्यासारखे पाच पाच वर्षांनी होत नाही.’’ यावर ते दिलखुलासपणे हसले.

ते रसिक होते. साहित्याची, इतर कलांची, गाण्याची त्यांना खूप आवड. कलाकारांबद्दल त्यांना मनापासून प्रेम वाटायचे. कलावंतांच्या कलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांची कुचंबणा होऊ नये, त्यांना कसलाही त्रास होऊ नये ही त्यांची तळमळ असायची. कोणाला कोणत्याही प्रकारे मदत हवी असली, तर नुसते ऐकून ते गप्प बसत नव्हते तर ते त्या प्रश्नात लक्ष घालायचे, पार टोकापर्यंत, मुळापर्यंत लक्ष घालून चौकशी करुन शक्य ती सर्व मदत करायचे. जिव्हाळ्याचा वडिलधारा माणूस म्हणून ते हवे होतेच, पण कलाकारांच्या दृष्टीने देखील ते अजून काही काळ तरी जगायला हवे होते...

यशवंतरावांना गाणे गाण्यासाठी गाणा-याला आणि ते ऐकण्यासाठी ऐकणा-याला कोणत्या प्रकारची मन:स्थिती लागते, वातावरण लागते, शिस्त लागते, याची चांगली जाणीव होती.

नागपूरला झालेल्या सरकारी संगीत महोत्सवाच्या वेळी केसरबार्इंसारखे थोर कलावंत आलेले होते. यशवंतरावांना कुठल्याही परिस्थितीत माझे संपूर्ण गाणे ऐकायचे होते. त्यापूर्वी महत्त्वाची कामे हातावेगळी करायची होती. त्यामुळे त्यांनी संयोजकांना सांगून ठेवले होते की, ‘‘मी येईपर्यंत भीमसेनचे गाणे सुरू करायचे नाही... मी येण्यापूर्वी इतर कलाकारांचे कार्यक्रम होऊ देत.’’ त्याप्रमाणे माझा कार्यक्रम नंतर करण्यासाठी राखून ठेवण्यात आला. आपली सर्व कामे आटोपून यशवंतराव आले तेव्हा प्रेक्षकांची काय स्थिती होती? कोणं चक्क झोपलेला, कोण लोळतोय, लोळता लोळता संगीत श्रवण करतोय...ही अस्ताव्यस्त स्थिती दाखवून मी त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्या या सवंगड्यांना उठवून शिस्तीत बसवा. नाहीतर मी गात नाही.’’ हे ऐकल्यावर स्वत: यशवंतरावांनी या लोकांना उठवून, त्यासाठी गरजेनुसार कोल्हापुरी खाक्याही दाखवून, सर्वांना शिस्तीत बसायला लावले आणि त्या नंतर माझे गाणे झाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org