मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५५

५५.  यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यशास्त्र – प्राचार्य मधुकर अष्टीकर

यशवंतराव चव्हाणांनी पोरकेपणाचे चटके अनुभवले. बालवयातच शिक्षणासाठी माया दूर सारून त्यांना एकाकी राहावे लागले. दूरच्या वस्तीत अनोळखी विश्वात. हा वनवास भकासवाणा असतो, पण त्यातूनच घडते दर्शन समाजाचे आणि जीवनाचे. वाटू लागले मग की नको नको ह्या यातना मानवाच्या नशिबी! वाटते व्हावे युगांतर आणि मानवाचे मतांतर, त्याच्यातल्या दुहीची बीजे भर्जित होऊन, आणि जातिपातींची व उच्चनीचतेची जाळी जळमटी खाक होऊन जावी. पण त्यासाठी हवे असते विचारांचे आणि आचारांचे घडणात्मक स्वातंत्र्य. जावे लागते त्यासाठी शरीराचे आणि मनाचेही पारतंत्र्य. बहुजनाला पोरके, दुर्बल आणि आधिव्याधिग्रस्त ठेवणारी सत्ता आपली म्हणविता येणार नाही, मग ती जन्माने आणि जातीने आपलीच असली काय आणि नसली काय. दारिद्र्य, दैन्य आणि वैफल्य माथी मारणारे शासन सदा परकीयच ठरणार. म्हणून सत्तेचा वापर योग्य व्हायला हवा. त्यासाठी सत्ता योग्य हाती जायला हवी. मग क्वचित ती आपल्या हाती घ्यावी लागली तरी हरकत नसावी आणि ह्याच भूमिकेतून यशवंतरावांनी सत्तेसाठी निवडणुका लढविल्या आणि जिंकल्याही. ‘‘सत्तेपासून दूर राहावे’’ हा विनोबांचा संकल्प यशवंतरावांनी नम्रपणे अव्हेरिला तो ह्याचसाठी. समष्टीच्या सकलांग स्वातंर्तासाठी त्यांनी ‘‘राजकारण’’ स्वीकारले. ‘‘पहिले ते राजकारण’’ हा रामदासी मंत्र त्यांना मानवला.

यशवंतराव चव्हाण सदैव साहित्यिकांशी संधान साधून असत. पण म्हणून ते साहित्यिकांच्या उगीचच आहारीही जात नसत. त्यांनी हैदराबादच्या मराठी साहित्य संमेलनात सरळच सांगून टाकले होते की, ‘‘कधी साहित्यिक राजकारण्यांना मार्गदर्शन करतात तर कधी राजकारणी साहित्यिकांना मार्गदर्शन करतात, असे हे सर्वत्र चालत आलेले आहे.’’ साहित्याचा समाजजीवनाशी आणि विशेषेकरून राष्ट्रीय जीवनाशी अविनाभाव संबंध असल्याचे अत्यंत मौलिक सूत्र यशवंतरावांनी नि:संदिग्धपणे अनेकदा मांडलेले आहे. त्यांनी साहित्यिकांना सांगितलंय की, ‘‘केवळ शब्दलालित्य म्हणजे साहित्य ही साहित्याची व्याख्या घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा काळ संपलेला आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय आणि जीवनामध्ये असलेले श्लेष आणि काव्य यांच्याशी अधिक जवळीक केल्याशिवाय साहित्यात फारशी मोलाची भर कुणी घालू शकेल असे मला वाटत नाही.’’ राष्ट्रीय जीवनाशी साहित्यिकाचे अतूट नाते सांधताना ते म्हणतात, ‘‘भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जे विविधत्व आहे त्याच्याशी आपण संपर्क जोडला पाहिजे, आणि त्याच्यातून अनुस्यूत असलेल्या एका भारतीयत्वाचा आपण अनुभव घेतला पाहिजे. हा अनुभव आमच्या साहित्याद्वारे लोकांपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे.’’ राजकीय स्थित्यंतरांच्या प्रेरणा अनेकदा साहित्यातून निर्माण होतात हे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीने दाखवून दिल्याचे ते नेहमी म्हणत.

‘‘साहित्य हे एक सामर्थ्य आहे कारण ते विचार देणारे आहे. बंदुकीच्या गोळीने प्राप्त होत नाही हे सामर्थ्य. विचारातून येते, संस्कारातून येते आणि हे काम साहित्यामार्फत घडते.’’ म्हणून यशवंतराव साहित्याचे मोल शस्त्रास्त्रापेक्षाही जास्त मानीत असत.

भारताचे सामर्थ्य, एकरूपता व अखंडता राहावी ह्याची यशवंतरावांना सतत चिंता आणि तळमळ असे. भाषा, संस्कृती, जात वा धर्म या पायी भारतात फुटिरता आणि विभक्ततेची भावना बळावू नये म्हणून ते अहर्निश झटत असत. ह्या कळकळीच्या ऊर्मीपोटी ते साहित्यिकांना हेच आवाहन करीत की, भारताच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी आणि बलवत्तेसाठी साहित्याचे प्रभावी माध्यम अखंड वापरा. ते म्हणत, ‘‘साहित्यिकाचा अनुभव देशव्यापक झाला पाहिजे. आमचे काही दूराभिमान असतील ते आम्ही सोडले पाहिजेत. आमचे जे काही आग्रह असतील ते आम्ही बाजूला ठेवले पहिजेत आणि इतरांचे प्रश्न समजावून घेतले पहिजेत. हे काम साहित्यिकांनी केले पाहिजे आणि त्यातून राजकारण्यांना प्रेरणा दिली पाहिजे.’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org