मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५१

१५१. मोठ्या मनाचा मानवप्रेमी अधिकारी  - बाबूराव शेटे

यशवंतराव हे नांव उच्चारल्याबरोबर अनेक आठवणी मनात दाटून येतात. यशवंतराव हे महाराष्ट्राचे, देशाचे राजकीय नेते. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांची इतिहासात नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचा आर्थिक, सामाजिक शैक्षणिक, कृषि, सहकार, उद्योग इत्यादी क्षेत्रातील विकासाला त्यांनी केवळ चालना दिली असं नव्हे तर त्या त्या क्षेत्रात विकासाची शिखरे निर्माण केली. या सर्व भौतिक विकासाविषयी महाराष्ट्रातील प्रत्येक थरातील माणूस यशवंतरावांचा कृतज्ञतेनं उल्लेख करताना आढळतो.

मुंबई शहर हे महाराष्ट्राची राजधानी. मंत्री, मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांचं मुंबईत वास्तव्य सुरू झाल्यानंतर देशावरून, कोकणातून मुंबईत जगण्यासाठी, हमालीसारखी कष्टाची कामे करून पोट भरण्यासाठी आलेल्या सामान्यांच्या, गरीबांच्या जीवनाला स्थिरता लाभावी, भांडवलदारी वर्गाकडून होणारी हजारो गरीबांची मनमानी पिळवणूक रोखली जावी, तशी ती रोखण्यासाठी कष्टक-यांना कायद्याचा आधार मिळावा यासाठी यशवंतरावांनी पुढाकार घेतला.

कायदेविषयक निर्णय केले. त्या संदर्भात आठवण आणि कृतज्ञता केवळ माझ्याच नव्हे तर हजारो कष्टक-यांच्या मनात निरंतरची राहाणार आहे.

यशवंतरावांनी, मुंबई शहरातील आणि महाराष्ट्रामध्ये अन्य शहरातील लक्षावधि असुरक्षित कामगारांना, कष्टक-यांना कायद्याचे संरक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. यशवंतरावांची ही फार मोठी देन आहे. या देणगीचा प्रारंभ मुंबईपासून झाला आणि नंतर ती उभ्या महाराष्ट्रात पोहोचली.

पूर्वी मुंबईत कष्ट करणा-या कामगारांच्या टोळ्या असावयाच्या. वीस-पंचवीस जणांची एक टोळी, पन्नासाची टोळी, शंभराची टोळी असे ते एकत्र येत असत. हे कामगार वखारीत, गोदीभागात, रेल्वे फलाटावर मालाची चढउतार करण्याची कामे करीत असत. हे कष्टकरी कामासाठी एकत्र आले तरी तसे ते विखुरलेले होते. त्यांची संघटना नव्हती की कोणी पुढारी नव्हता. मालाची चढउतार करण्याचे काम ठेकेदारामार्फत होत असे. ठेकेदार सांगेल त्यानुसार कष्टकरी कष्ट करीत असत. ही कामे अत्यंत कष्टाची असतात. कामगारांना त्यासाठी अक्षरश: घाम गाळावा लागतो. ठरविलेल्या वेळी कामे करावी लागत. ठेकेदार त्यासाठी भरपूर मजुरी वसूल करावयाचे परंतु या मजुरीच्या पैशातील फार थोडा हिस्सा कामगारांना प्रत्यक्षात दिला जात असे. कष्टक-यांना अर्धपोटी राहण्यावाचून गत्यंतर उरावयाचे नाही. कारण त्यांनी आपली दाद लावून घ्यावी यासाठी कायद्याचे संरक्षण नव्हते. १९६१-६२ सालापर्यंत मुंबई कामगारांची, हमालांची हीच स्थिती होती.

१९६१-६२ सालात, या सर्व कष्टक-यांना एकत्र करावे, त्यांची संघटना बांधावी आणि त्यांना आर्थिक न्याय मिळवून द्यावा असा विचार सुरू झाला. कामगारांना आपल्या हक्काची जाणीव झालेली होती. गिरणी कामगार असो किंवा अन्य कारखान्यातील कामगार असो त्यांना संरक्षण मिळावे यासाठी निरनिराळे कायदे अस्तित्वात आलेले होते. शिक्षणापासून सरकारी कर्मचा-र्यांपर्यंत सर्वजण कायद्याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी चळवळी उभारीत होते. अंगमेहनतीचे कठीण काम करणारा कष्टकरी समाज, हमाल मात्र अर्धपोटी जीवन जगत होते. त्यातूनच कायद्याचे संरक्षण मिळविले पाहिजे व त्यासाठी संघटित आवाज उठविला पाहिजे असे वातावरण निर्माण झाले.

विखुरलेल्या, शैक्षणिकदृष्ट्या अडाणी कष्टक-यांची संघटना बांधणे हे काम अवघड होते. परंतु हळूहळू त्याला मूर्तस्वरूप येत आहे असे दिसताच मी आणि श्री. आण्णा पाटील यशवंतरावांकडे गेलो आणि सविस्तर चर्चा केली. अर्धपोटी राहून घाम गाळणा-यांची हलाखी त्यांनी ऐकली आणि म्हणाले, ‘‘ठीक आहे, तुम्ही संघटना बांधा, माझे आशीर्वाद आहेत. या कामगारांसाठी, त्यांना संरक्षण मिळण्यासाठी, कायद्याची तरतूद करण्याची गरज आहे. आम्ही तसा कायदा करू.’’

यशवंतरावांचे विधायक आश्वासन मिळाले. आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती होता. गरीबांविषयीची त्यांची मनातील कणव आमच्या परिचयाची होती. संघटना बांधण्याचे काम आम्ही जिद्दीने सुरू केले. लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, नरेंद्र तिडके, राजारामबापू पाटील यांचा सल्ला घेतला. मदत मिळविली. त्यातूनच मुंबईतील असुरक्षित कामगारांची एक परिषद घेण्याचा विचार बळावला. परिषदेचे आयोजन केले आणि या परिषदेला स्वत: यशवंतरावांनी उपस्थित रहावे यासाठी त्यांची अनुमति मिळविली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org