मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५०

१५०. सावळी सतेज मूर्ती – चंद्रकांत मांढरे

ना. यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा व माझा अल्पसाच पण संस्मरणीय असा दृढ परीचय होता. ते माझ्या अनेक ग्रामीण चित्रपटांचे चाहते होते. कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी माझे चित्रपट पाहिलेले. ते स्वत: एकत्र शेतकरी कुटुंबातील असलेने त्यांना त्या चित्रपटांमधील विषय मनोमनी पटत असत. त्यांच्या अनेक भाषणातून त्यांनी बालवयात पाहिलेल्या माझ्या पहिल्या चित्रपटाचा, कै. बाबूराव पेंटर यांच्या ‘‘सावकारी पाश’’ याचा, उल्लेख असायचा - त्यामधील निरक्षर शेतक-याचे रंगविलेले सजीव चित्राचे वर्णन ते करावयाचे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना साहेबांनी माझ्या निसर्गचित्रांच्या प्रथम प्रदर्शनाचे उद्घाटन सांगली मार्केट यार्ड ना. वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये केले होते. ना. वसंतदादा व साहेब या दुग्धशर्करायुक्त योगात माझे चित्रकलेचे कौतुक झालेले होते. त्यानंतर पुढे प्रायव्हेट हायस्कूलच्या अमृत महोत्सव प्रसंगी तेच मुख्य पाहुणे व त्यांचेच हस्ते व शंकरराव किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत माझ्या चित्रकलेच्या प्रदर्शनाचे कोल्हापुरी उद्घाटन झाले. अगदी अलीकडे क-हाडमध्ये नामदेव शिंपी समाज परिषद प्रसंगी त्यांनी माझ्या चित्रांचे प्रदर्शनाचे क-हाडमध्येही उद्घाटन केले होते.

पण साहेबांचा जवळचा अनुभव आला तो आमच्या दिल्ली भेटीत - १९६५, ६६, ६७ साली चित्रपटांचे पुरस्कार स्वीकारणेसाठी मी लागोपाठ तीन वर्षे दिल्लीला गेलो व न चुकता प्रत्येक वेळी साहेबांना त्यांच्या निवासस्थानी भेटून आलो. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला साहेबांचे निवासस्थान आपलेच घर वाटत होते. तेथे औपचारिकपणा नव्हता. तेव्हा ते भारताचे संरक्षणमंत्री होते तरी ही आमचे साहेबच राहिले. कौतुकाने जवळ बसवून चहापानाचा आग्रह व सर्वांची आठवणीने चौकशी. खादी पेहेरावातील स्मितवदन, मनमोकळेपणाने संभाषण, जुन्या कोल्हापूरच्या अनेक आठवणी सांगणारे कथन. साहेबांची ती सावळी सतेज मूर्ती नेहमी लक्षात येते.

अनेक भेटीत त्यांनी ‘‘चंद्रकांत, तुमचे वय किती?’’ हे आवर्जून विचारायचे व मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असून प्रकृती उत्तम ठेवली याचे ते कौतुक करायचे. दुसरे, त्यांना मी सिनेमाक्षेत्र सांभाळून पेंटींग केव्हा व कसे करतो याचे कुतूहल वाटायचे. माणासाने पत्करलेल्या कामात वा एखाद्या छंदात नेहमी गुंतलेले असावे हे त्यांना आवडायचे.

आता खरे ते हवे होते....

माझ्या चित्रसंग्रहालयांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचा तो मायेचा हात पाठीवर फिरायला हवा होता...
पण दैवापुढे मनुष्य प्रयत्न अपुरेच!

त्यांच्या पवित्र स्मृतीस नम्र अभिवादन...

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org