मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४९

१४९. .बुद्धीवादी यशवंतराव – प्रा. माधव द. तबीब

१९४१ ची गोष्ट. दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन कराड येथे भरले होते. कवि साधुदास संमेलनाचे अध्यक्ष होते. यशवंतराव तेव्हा स्वागत समितीत होते. त्यांचे या संमेलनप्रसंगीचे स्वागतपर भाषण एक साहित्याचा उत्तम नमुना ठरेल. त्यांचे भाषण कराड-क-हाटक या गीताचा इतिहास, भूगोल या भोवती गुंफलेले होते. जनमानसात हे भाषण गाजले.

मला यशवंतरावांची गाठ घ्यावयाची होती. पण ती दुस-या संदर्भात. मी त्या वेळी फग्र्युसन महाविद्यालयात इन्टर सायन्सच्या वर्गात शिकत होतो. मी कॉलेजच्या वसतिगृहात राहात होतो. शेजारच्या खोलीत श्री. गोवर्धनदास पारीख राहात असत. शेजारपणाचे रूपांतर ओळखीत झाले. पुढे परिचय वाढला. श्री. पारीख वेलणकर बंगल्यात अभ्यास मंडळ (Study Circle) चालवीत असत. या मंडळाचे रूपांतर पुढे रेनायसन्स क्लब मध्ये झाले. या क्लबचा मी सभासद होतो. प्रसिद्ध विचारवंत लक्ष्मण शास्त्री जोशी, सेवानिवृत्त सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बॅ. व्ही. एम. तारकुंडे, लोकसत्तेचे माजी संपादक ह. रा. महाजनी, डॉ.कर्णिक, कामगार नेते बाबुराव कर्णिक वगैरे मान्यवर मंडळी या क्लबचे सभासद होती. येथे मार्क्सवाद हेगेलचे डायलेक्टीक्स, लेनीनवाद, रॉयवाद वगैरे विचारधारांचं चर्चेतून दर्शन होत असे.

१९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. हिटलरची फॅसिस्ट सेना पोलंडमध्ये शिरली. ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटिश पंतप्रधान चेंबरलेननी युद्धाची घोषणा केली. हे युद्ध साम्राज्यशाही युद्ध की लोकशाही युद्ध यावर चर्चा-विचारमंथन सुरू झाले. रॉयसाहेबांनी हे युद्ध साम्राज्यशाही युद्ध नसून लोकयुद्ध आहे व आपण या युद्धात फॅसिझमविरोधी शक्तींना मदत करून लोकशाही वाचवली पाहिजे हे रॉयसाहेबांनी गणित मांडले. इंडिपेंडंट इंडियामध्ये आकडे देऊन हिंदुस्थान इंग्लंडचा धनको होऊ लागला आहे व युद्धअखेर आर्थिकदृष्ट्या वसाहती स्वतंत्र होतील व यातून राजकीय स्वातंत्र्य मिळेल हा सिद्धांत त्यांनी मांडला. १९४० जून मध्ये फ्रान्स पडला. १९४१ मध्ये हिटलरच्या फौजा रशियात घुसल्या. रशिया हे एकमेव त्या वेळचे समाजवादी राष्ट्र. आमच्यासारख्या रेनायसन्स क्लबच्या सभासदांना हे लोकयुद्धच आहे ही खात्री पटली.

यशवंतराव हे जुने रॉयीस्ट. त्यांचेशी युद्धाच्या स्वरूपाविषयी चर्चा करावी म्हणून साहित्य संमेलनप्रसंगी मी त्यांना भेटलो. आम्ही त्यांच्या घरी गेलो. ते तेव्हा देशपांडे वाड्यात राहात असत. दोन दिवस त्यांनी घरी ठेवून घेतले. विठामातेच्या हातची जोंधळ्याची भाकरी - ती ही हातावरची, थापलेली नव्हे - आम्ही पोटभर खाल्ली.

यशवंतराव त्या वेळी लॉ कॉलेजमध्ये शिकत होते. घरची गरिबी, आर्थिक मदत नाही. त्यांच्या विठामातेचा मायेचा हात हेच प्रेरणास्थान. खोलीचे भाडे देण्यासाठी पैसा नाही. पुण्यात डास भरपूर, रात्रभर चावायचे. त्यातून ते अभ्यास कसा करणार?

यशवंतराव हे खरे बुद्धिवादी. विरुद्ध पक्षाचा मुद्दा पटो वा ना पटो ते समजून घेत. मुद्याचे खंडन वा मंडण घणाघाती आघाताने पण नम्रपणे करत. आपला मुद्दा तार्किक सुसंगतेने मांडत. दुस-या विचारांना किंमत देणारे यशवंतराव पुढे उत्तम संसदीय वाक्पटू झाले हे सांगणे नलगे.

आमचे त्यावेळचे एक ग्रामीण नेतृत्व म्हणजे आत्माराम बापू पाटील. त्यांनी त्यांना मच्छरदाणी आणून दिली. शैक्षणिक वर्ष संपत आले. खोली सोडून द्यावयाची तर मालकाचे भाडे कोठून देणार? सर्व मित्रांनी एके दिवशी रात्री २ वाजता त्यांचे सामान - सामान ते काय ट्रंक व वळकटी हळूच काढली व खोलीतील एक मोडके तोडके कुलूप लावून पसार झालो.

पण मालकाचे भाडे द्यावयाचे ही रुखरुख मागे राहिली. शेवटी आम्ही मित्रांनी पैसे गोळा करून भाडे चुकते केले. यशवंतरावांना खूप आनंद झाला.

यशवंतराव मला मनमिळावू, बुद्धिवादी, स्वाभिमानी व उदारमतवादी दिसले.

देशापुढील आर्थिक, सामाजिक व राजकीय समस्यांचे उकलन करावयास यशवंतराव आज हवे होते असे मन मला सांगते.

आजही ४५ वर्षापूर्वीची ही स्मृती ताजी वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org