मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४७

१४७.  सद्गुणी माणूस – डॉ. दि. ग. केळकर

यशवंतराव दिल्लीत गेल्याचे वर्तमान कानी पडलं आणि क्षणभर मन विचलीत झालं. आपल्या घरातील जवळचं माणूस गेल्यानंतरची बातमी ऐकल्यानंतरची मन:स्थिती आणि यशवंतराव गेल्याची बातमी ऐकल्यानंतरची माझी मन:स्थिती यात मला तरी काही फरक वाटला नाही. यशवंतरावांचा अन् माझा संबंध मुंबईत सचिवालयात आला. कोणीतरी मोठ्या माणसाने माझी ओळख करून दिली असावी इतकंच स्मरतं. त्या वेळी त्यांनी पुण्यात आल्यावर माझे संग्रहालय बघावं अशी मी त्यांना विनंती केली होती. यशवंतराव पहिल्यांदा १९६० पूर्वी माझेकडे आले होते. तसं पाहिलं तर हे संग्रहालय लहानही होतं. दुपारी ४चे सुमारास मंडईजवळील टिळकांचे पुतळ्याजवळून मी चाललो होतो. समोरून यशवंतरावांची गाडी येत होती. गर्दी असल्यामुळे गाडी हळूहळू जात होती. मी त्यांना अगोदर खूप लांबून पाहिलं व मी जसा गाडीच्या जवळ गेलो तशी त्यांनी गाडी उभी केली. माझ्या हातात नुकत्याच विकत घेतलेल्या औषधाच्या बाटल्या होत्या. सहज यशवंतरावांनी मला विचारलं, ‘‘ही औषधं कोणासाठी घेऊन चाललात?’’ मी म्हटलं, ‘‘माझ्या आईसाठी. ती सध्या अंथरूणाला खिळली आहे. तुम्हाला जर पाच मिनिटं वेळ असेल तर तुम्ही माझेकडे जाऊन येऊ शकाल.’’ जितक्या सहजपणे मी त्यांना विचारलं तितक्याच सहजतेने ते मला म्हणाले, ‘मग मी येतोच’. आणि मिनिटा-दीड मिनिटात ते माझ्या घरातही आले. जिथे माझी आई अंथरूणाला खिळून पडली होती तिथे मी त्यांना घेऊन गेलो. त्या खोलीत जमिनीवरील गादीवर आई निजलेली होती. त्या खोलीत दोन खुर्च्या होत्या. तीन-चार पाट भिंतीला टेकून ठेवलेले होते. मी सहजच खुर्ची ओढून त्यांना बसण्यासाठी ठेवू लागलो. मी खुर्ची आणतो आहे इतक्यातच ते स्वत: भिंतीवरील टेकलेला पाट घेऊन आईच्या शेजारी दोन हातावर बसलेले मला दिसले! हे मुख्यमंत्री आहेत हे क्षणभर त्या वेळी मी विसरलो! कदाचित तेही विसरले असावेत! आईशी थोडंसं बोलल्यावर आम्ही परत निघालो. मी घरी राहिलो आणि ते गाडीतून निघूनही गेले.

मला जर कुणी विचारलं की, ‘‘तुमचं यशवंतरावांच्याबद्दल खासगी मत काय आहे हो?’’ तर मी त्यांना सांगीन, ‘‘हा मोठ्या पदावर असलेला माणूस म्हणून जग त्यांना मानत आहे पण मी त्यांना फार मोठ्या हृदयाचा माणूस म्हणून मानतो.’’ शोधून न दिसणारी शालीनता व माणुसकी त्यांच्यात ओतप्रोत होती. दुसरा प्रसंग जो मला आठवतो आहे तो - एकदा ते मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर पडत असताना झालेली भेट. तेव्हा देखील ते असेच दोन मिनिटे माझ्यासाठी थांबले. तसेच डावलून पुढे गेले नाहीत! १९६२ साली त्यांना मी पुन्हा एकदा संग्रहालय दाखविण्यासाठी आणले होते. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा होता. त्या वेळी त्यांनी २५ वर्षाच्या कराराने सरकारकडे संग्रहालय घेतले. तिसरा मोठा प्रसंग, दिल्लीतील सचिवालयातील भेट. त्या वेळी दिल्लीच्या मंत्रीमंडळात ते संरक्षणमंत्री होते. त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात सह्याद्रीने हिमालय वाचविल्याचे चित्र हिंदुस्थानच्या सगळ्या लोकांच्या डोळ्यापुढे होते. त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. त्या वेळी त्यांच्या पत्नी सौ. वेणूताई आजारी होत्या. त्यांनी स्वत: मला घरात नेऊन त्यांच्या पत्नीची ओळख करून दिली. दिल्लीतील एवढा मोठा मंत्री माझ्यासारख्या सामान्य माणसाची बूज ठेवतो खरंच हे आश्चर्य आहे. ह्या सगळ्याच्या मागे त्यांच्यातील असलेली माणूसकी मला दिसते.

एकदा सौ. वेणूताई सकाळी ९-१०चे सुमारास श्री. डोंगरे (त्या वेळचे यशवंतरावांचे खाजगी सचिव) यांना घेऊन अचानक संग्रहालय पाहण्यासाठी आल्या. मी दिल्लीला गेलो होतो. घरात माझी बायको व मुलगी होती. माझ्या मुलीने घाईघाईने जाऊन मोठा हार आणण्याची सोय केली. माझ्या पत्नीने त्यांना संग्रहालय पाहून झाल्यावर २ मिनिटे थांबण्याची विनंती केली. डोंगरे सहजपणे म्हणाले, ‘‘केळकरांचा माणूस हार आणण्यासाठी गेला आहे तो आत्ता येईल.’’ त्यावर वेणूताई म्हणाल्या की, ‘‘मी मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून आले नाही.’’ संग्रहालयाची प्रशंसा केली आणि तडक त्या मोटारीकडे गेल्या. त्यांची गाडी निघाली आणि मागील दाराने हार आला. अशा कितीतरी लहानमोठ्या गोष्टी मला आठवतात. माझ्या आईला जेव्हा यशवंतराव भेटावयास आले होते त्या वेळेस माझ्या पुतण्याने त्यांचा फोटो काढला होता. पण दुर्दैवाने आज मला तो सापडत नाही.

यशवंतरावांसारखी सद्गुणी माणसं आपल्या देशात होती व आजही आहेत आणि त्यांच्या ह्या सद्गुणामुळेच हा आमचा देश मोठा होत आहे. सद्गुणांच्या जोरावरच त्यांना स्वर्गात उत्तम स्थान मिळाले असेलही. आमच्या जमिनीवरील लोकांच्या प्रार्थनेमुळे नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावरच त्यांना शांति लाभणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org