मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४५

१४५. एकदाच भेटलेली माणसं – श्री. शरश्चंद्र वासुदेव चिरमुले

११ मे १९८४ या तारखेला इंदूर-मुक्कामी माझी यशवंतराव चव्हाणांबरोबर एकमेव आणि अखेरची भेट झाली. राजकारणी पुरुषांना आवश्यक उपचार म्हणून (किंवा हौस म्हणूनही) धारण करावी लागणारी कवचकुंडले मोठी अभेद्य असतात. (सद्य:स्थितीत ही कवचकुंडले अलंकारिक अर्थाने राहिली नसून वाच्यार्थाने चिलखतासारखी आवश्यक होत चालली आहेत.) जवळिकीचे हत्यार वापरून एखाद्या दृढ परिचितालाही त्या कवचकुंडलांचा भेद करता येत नाही. यशवंतरावांसारख्या जन्मजात सौम्य प्रकृतीच्या आणि हृद्य सभ्यतेच्या व्यक्तिमत्त्वावर ही कवचकुंडले असली तरी ती चमकदार किंवा उग्र होत नसत.

यशवंतराव इंदूरला भेटले तेव्हा राजकारणाच्या ऐन आखाड्यात जवळजवळ नव्हतेच. पण आठव्या अर्थआयोगाचे अध्यक्ष होते. त्या दर्जानुसार सरकारी इतमामाप्रमाणे इंदूरच्या ‘‘सर्किट हाऊस’’ राहिले होते. त्यांची भेट हा निव्वळ योगायोग होता. पं. कुमार गंधर्वाच्या षष्ठ्यब्दी-समारंभाला हजर राहून मी त्यांच्याकडेच देवासला मुक्काम किंचित लांबवला होता. अकरा मैलांवरील इंदूरच्या काही मंडळींनी यशवंतराव चव्हाणांना मुख्य पाहुणे म्हणून निमंत्रित करुन, कुमार गंधर्वांचा सत्कार आणि दुसरा एक समारंभ अशी दोन कार्यक्रमांची योजना केली होती. कुमार गंधर्वांवरील लोभामुळे क-हाडचा एक कार्यक्रम रहित करून यशवंतराव इंदूरला आले होते.

नियोजित समारंभाआधी ‘‘सर्किट हाऊस’’ वर अगदी घरगुती वातावरणात यशवंतरावांबरोबर निमंत्रितांना चहापान होते व समारंभानंतर वसंत पोतदारांकडे जेवणाचा विश्रब्ध कार्यक्रम होता. कुमार गंधर्वांच्या सूचनेनूसार मी व श्रीराम पुजारी यांनी सपत्नीक कार्यक्रमाला हजर रहायचे होते. पोतदारांनी आमंत्रण अर्थातच दिले होते.

संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही सात-आठ मंडळी ‘‘सर्किट हाऊस’’वर चहापानाला जमलो. पाच मिनिटात यशवंतरावजी आले. ते बसल्यावर इतरांसारखाच माझाही यशवंतरावांशी परिचय करून दिला.

‘‘मी तुम्हाला नावाने ओळखतो’’ यशवंतराव मला म्हणाले, ‘‘तुमचं काही लेखन मी वाचलं आहे.’’ बोलणे औपचारिक नव्हते. त्यांनी आशय सांगून एका ताज्या कथेचा उल्लेख केला. मी त्यामुळे सुखावलो हे खरेच.

आता यशवंतरावांना आपली आणखी एक ओळख द्यावी असा मला मोह झाला. त्यांच्याकडून काही मिळवायचे तर मुळीच नव्हते.

‘‘यशवंतरावजी, मी आपल्याला दुसरी एक ओळख देतो.’’ मी म्हणालो, ‘‘मी आबा शेणोलीकरांचा दुसरा मुलगा.’’

ते शब्द ऐकताच यशवंतराव मिनिटभर माझ्याकडे पहात राहिले! त्यांच्या मुद्रेवरचे भाव हळूहळू विश्रब्ध झाले. कवचकुंडले किंचित बाजूला झाली.

‘‘आबा शेणोलीकरना कोण विसरेल?’’ यशवंतराव उद्गारले. हे बोलणेही औपचारिक नव्हते. यशवंतराव क-हाडच्या ‘‘टिळक हायस्कूल’’ मध्ये शिकत असता माझे (जनक) वडील त्यांचे शिक्षक होते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नेमका आणि यथार्थ तपशील यशवंतरावांनी ‘‘कृष्णाकाठ’’ या आत्मकथेत दिला आहे हे मला त्या वेळी माहीत नव्हते! त्यानंतर काही महिन्यांनी मी ‘‘कृष्णाकाठ’’ हे पुस्तक वाचले.

मग दोन जुने क-हाडकर रहिवाशी खूप वर्षांनी भेटल्यावर, पेठा, माणसे, वस्ती, असे संदर्भ घेऊन बोलू लागतात, त्याप्रमाणे यशवंतराव माफक प्रमाणात पण या सुरात बोलू लागले.

‘‘बापू कुठं असतो? तो मला फार वर्षांत भेटला नाही.’’ यशवंतरावजींनी विचारले. बापू हे माझे धाकटे काका आणि त्यांचे वर्गमित्र. पण तेही आबांप्रमाणेच नि:संग, यशवंतरावांसारख्या मित्राच्या स्थानाचा काही फायदा करून घ्यावा असे चुकूनही त्यांच्या मनात आले नाही. डोंबिवली ते फोर्ट व परत असा प्रवास ते लोकलमधून तीस वर्षे विनातक्रार करीत राहिले. निवृत्तीनंतर कारणाशिवाय ते डोंबिवली सोडीत नाहीत, असे मी बापूंचे वर्तमान सांगितले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org