मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४४

सातचे सुमारास तोंड धुऊन श्री.यशवंतरावजी बाहेर आले. हंसतमुखाने त्यांनी आमचे स्वागत केले; उशीराबद्दल दिलगिरी व्यक्त केली; दाढीचे सामान समोरच्या टेबलावर ठेवले, व स्वत:च्या तोंडाला साबण लावीत ते म्हणाले, ‘‘करा सुरुवात!’’ क्षणभर आम्हीच थोडे ओशाळलो. परंतु अंगात गंजिफ्रॉक व खाली धोतर अशा वेषात दाढीचा ब्रश चेह-यावरून फिरवीत

श्री. यशवंतरावजी फिरून म्हणाले ‘‘करा सुरूवात! मी ऐकतो आहे!’’

प्रा. ऊर्ध्वरेषेनी मुलाखत वाचनास प्रारंभ केला. इकडे दाढी करता करता श्री. यशवंतरावजी एक चित्राने शब्दन् शब्द बारकाईने ऐकत होते. मधूनच एखाद्या शब्दाची दुरुस्ती सुचवीत होते.

सुमारे वीस-पंचवीस मिनिटात प्रा. ऊर्ध्वरेषेंचे मुलाखत वाचन संपले. मान वर करून त्यांनी श्री. यशवंतरावजींकडे पाहिले. एखाद्या गवयाने सुंदर तान घेताच रसिक प्रेक्षकांनी हात उंचावून त्याला दाद द्यावी, तसा आपला मोकळा असलेला डावा हात वर फेकीत श्री. यशवंतरावजी म्हणाले, ‘‘उत्तम! उत्तम! फारच उत्तम!’’ नंतर माझेकडे वळून ते मिष्किलपणे हसत म्हणाले, ‘‘मुकुंदराव! तुम्ही आम्हीतर विरोधक, परंतु मला जे म्हणावयाचे होते, ते माझ्यापेक्षाही अधिक परिणामकारक शब्दात तुम्ही मांडले आहे. त्याबद्दल मी तुम्हाला मन:पूर्वक धन्यवाद देतो!’’ क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, ‘‘आता माझ्यासाठी कृपा करून आणखी एक गोष्ट करा! ही मुलाखत इतकी उत्तम लिहिली गेली आहे की तिच्याएक दहा हजार प्रती मला छापून दिल्यात तर माझ्या मतदारसंघात त्या वाटण्याची मी व्यवस्था करेन! माझी भूमिका मतदारांना सजण्यास या मुलाखतीची मोठी मदत होईल!’’

तशी व्यवस्था मी यथाकाल केली. ती निवडणूक अगदी निसटत्या बहुमताने श्री. यशवंतरावांनी जिंकली.

तीनहून अधिक तपांच्या माझ्या संपादकीय जीवनात कौतुक वा शाबासकीचे अनेक छोटमोठे प्रसंग मी अनुभवले. पण ‘‘राजकीय’’ विरोधक असणा-या श्री. यशवंतरावजींनी निखळ स्नेहभावनेने, आणि अत्यंत प्रामाणिकपणे दिलेल्या या शाबासकीचे स्मरण आजही माझ्या स्मरणात ताजे आहे.

पुढे आणखी एका सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त दिल्लीत श्री. भा. कृ. केळकर व मी यांनी त्यांची चारपाच तासांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. दुपारी जेवणासाठी अत्यंत आग्रहाने त्यांनी आम्हाला आपल्या घरीच ठेवून घेतले. जेवणातील गोड पदार्थाकडे मी त्यांचे लक्ष वेधले व प्रश्नचिन्हांकित नजरेने त्यांचेकडे पाहिले तेव्हा ते हसतहसत म्हणाले, ‘‘रोज असे गोड नसते! पण आज वेणूतार्इंचा वाढदिवस आहे ना?’’

अशीच आणखी काही वर्षे गेली. आता ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये नव्हते. दरम्यान सौ. वेणूतार्इंचेही अनपेक्षित निधन झाले होते. तथापि दिल्ली भेटीत श्री. यशवंतरावजींची उभ्या उभ्या तरी गाठ घ्यावयाची या माझ्या अनेक वर्षांच्या परिपाठास अनुसरून मी त्यांचे घरी फोन केला.

मी विचारले, " Can I speak to Shri. Yashwantraoji" दुस-या टोकावरून उत्तर आले, ‘‘मी यशवंतरावच बोलतो आहे!’’

आता ते मंत्री नसल्याने घरी नोकरवर्ग नव्हता. फोन त्यांनी स्वत:च घेतला होता.

ठरल्याप्रमाणे मी १ रेसकोर्स, बंगल्यावर त्यांचे भेटीस गेलो. आमच्या बोलण्यात स्वाभाविकच सौ. वेणूतार्इंचा उल्लेख आला. बोलता बोलता श्री.यशवंतरावांचा गळा दाटून आला. डोळ्यात जमलेल्या अश्रूंना ते महत्प्रयासाने मागे हटवू पाहात होते. त्यांच्या डोळ्यातील नेहमीचे तेज कोठच्या कोठे लुप्त झाले होते. त्यांच्या चेह-यावर गेल्या तीस वर्षांत मी कधीही न पाहिलेला विलक्षण भकासपणा आला होता.!

दिल्लीहून मी पुण्यास परतलो तेव्हा मित्रमंडळींनी श्री. यशवंतरावजींची खुशाली मला विचारली. मी म्हणालो, ‘‘वेणूताई तर गेल्याच! पण जाताना त्यांनी यशवंतरावांनाही आपणाबरोबर नेलेले आहे. मागे राहिले आहेत ते यशवंतराव नव्हेतच!’’

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org