मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १४२

१४२.  रयत शिक्षण संस्थेचे  अध्यक्ष मा.चव्हाण साहेब – श्री. आप्पासाहेब भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील हे हयात असताना सन १९५८-५९ मध्ये रयत शिक्षण संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे ठरले. त्या वेळी या सुवर्णमहोत्सव समितीचे अध्यक्ष त्या वेळचे ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव शिंदे हे होते आणि उपाध्यक्ष त्या वेळच्या द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार यशवंतरावजी चव्हाणसाहेब हे होते. त्यांनी या सुवर्णमहोत्सवात शासनाच्या वतीने रु. २,००,०००/-(रु. दोन लाख) देणगी दिली होती. यावरून मा. चव्हाणसाहेब यांच्या मनामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कार्याविषयी व कर्मवीर अण्णांच्या विषयी किती आस्था होती हे दिसून येते.

संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णा यांचे निधन ता. ९ मे १९५९ रोजी झाले. त्या वेळी मा. चव्हाणसाहेब आजारी होते व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पन्हाळ्यास विश्रांती घेत होते. तरीदेखील कर्मवीर अण्णांच्या अंत्यसंस्काराला ते सातारा येथे हजर राहिले व त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिलासा दिला.

कर्मवीर अण्णांच्या निधनानंतर संस्थेच्या कार्यात एकदम पोकळी निर्माण झाली. कारण संस्थेतील प्रत्येक गोष्ट अण्णा स्वत: निर्णय घेऊन करीत असत. तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते व कार्यकुशलताही अफाट होती. यामुळे अण्णांच्या निधनानंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांना व सेवकांना दिलासा देऊन संस्थेचे कार्य नेटाने चालविण्यास योग्य ते मार्गदर्शन करणारी संस्थेच्या अध्यक्षपदी एखादी महान व्यक्ती असावी असा विचार संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये चालू झाला. त्या वेळी विचारविनिमय होऊन मा. चव्हाणसाहेब यांचे नाव अग्रक्रमाने पुढे आले. तथापि त्यांच्या कानावर ही बाब घालून त्यांचा होकार मिळविणे अगत्याचे होते. त्यासाठी संस्थेची काही मंडळी त्यांना भेटण्यास गेली. त्यामध्ये मी होतोच. त्यांना कल्पना देताच, त्यांनी ताबडतोब अनुमती दिली.

सन १९६० मध्ये नेर्ले ता. वाळवा जि. सांगली येथील संस्थेच्या हायस्कूलचे ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय’’ असे नामकरण मा. चव्हाणसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘मुंबई राज्याचा मुख्यमंत्री झाल्यावर मला जे समाधान झाले होते, त्यापेक्षा अधिक समाधान मला रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झाल्याने होत आहे.’’

मा. चव्हाणसाहेब हे संस्थेचे अध्यक्ष झाल्यावर ते नियमाने दरवर्षी ९ मे रोजी कर्मवीर अण्णांच्या पुण्यतिथीचे वेळी सातारा येथे हजर राहात. याच दिवशी संस्थेच्या जनरल बॉडीची बैठक होत असे. या बैठकीस ते उपस्थित राहात. या बैठकीत संस्थेच्या गतवर्षाचा आढावा घेतला जाई, नवीन वर्षाच्या कामाची आखणी होई आणि या वेळी मा. चव्हाणसाहेब हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत. तसेच कार्यकर्त्यांमध्ये काही समस्या निर्माण झाली असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन व वाटाघाटी करून त्या समस्या दूर करीत.

मा.चव्हाणसाहेब १९६० पासून संस्थेचे अध्यक्ष होते. परंतु त्यांनी ‘‘अमूक नोकराची बदली करा अगर अमूक नोकरास नेमून घ्या’’ असे कधीही म्हटले नाही ! संस्थेच्या प्रशासनात त्यांनी कोणत्याही स्वरूपात हस्तक्षेप केला नाही. इतके ते काटेकोरपणे पथ्य पाळीत.

मा.चव्हाणसाहेब हे संस्थेचे अध्यक्ष झाल्याने अप्रत्यक्षरीत्या संस्थेचे अनेक फायदे झाले. संस्थेची सर्व कामे सुकर होण्यास फारच मदत झाली. तसेच जनतेतील राजकीय लहान मोठे कार्यकर्ते संस्थेच्या कार्यात अधिक जोमाने मदत करू लागले. संस्थेचे सेवक व कार्यकर्ते यांनाही काम करण्यास अधिक उत्साह मिळून संस्थेच्या कार्याचा उठाव एकसारखा होत राहिला. अशा रीतीने कर्मवीर अण्णांच्या निधनानंतर संस्थेच्या कार्यात जी पोकळी निर्माण झाली होती ती त्यांनी संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारून काही अंशाने का होईना भरून काढली यात मुळीच संदेह नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org