मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३९

१३९. महाराष्ट्राचे शिल्पकार – तुळशीदास जाधव

यशवंतराव म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे यशवंतराव असे समीकरण भारताच्या इतिहासात भारतीय इतिहासकाराला नमूद करावेच लागेल. महाराष्ट्राच्या राजकीय व आर्थिक तसेच सामाजिक जीवनात बदल घडविण्यात श्री. यशवंतराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना स्वत:ला दैन्य, दारिद्र्य आणि दु:ख यांचे चटके कसे असतात; दारिद्र्याचे, पिळवणुकीचे आणि प्रसंगानुसार अपमानाचे जिणे कसे असते याचा कटू अनुभव त्यांच्याही वाट्यास आला आहे. गांधीजींच्या आध्यात्मिक अहिंसावादी तत्त्वाची कास धरून ते राजकारणाच्या आखाड्यात उतरले असले तरी त्यात पुरोगामी विचारांचे, जागतिक कीर्तीचे पुढारी दे. भ. एन्. एम्. रॉय यांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास आणि प्रत्यक्ष अनुभव याची त्यात भर पडली आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सरदार होऊन व या देशाच्या आणि समाजाच्या उत्कर्षासाठी कारागृहातील खडतर नि माणुसकीशून्य अशा वागणुकीला तोंड देऊन त्यावर विजय मिळविला आहे. ते खंदे वीर होते. विचारांची थोडक्यात परिणामकारक मांडणीही त्यांनी चांगलीच कमाविली होती. लोकसंग्रहाचे तर त्यांना वरदानच होते असे म्हणावे लागते. सभेत, असेंब्लीत, पार्लमेंटमध्ये व शिबिरात त्यांचे मोजक्या शब्दात, विषयानुरोधाने पण तितकेच वेळेच भान ठेवून होत असलेले अचूक अन् प्रभावी वक्तृत्व ऐकण्यास श्रोतृगण उत्सुक असे. समाजातील सध्या मानली जात असलेली जीवनमूल्ये एखाद्या कार्यकत्यांच्या वैयक्तिक जीवनात असण्याचा त्यांचा अनाग्रही स्वभाव असल्यामुळे जवळच्या कार्यकर्त्याबद्दल ते जिद्दीने अनुकूलता दाखवीत. एवढेच नव्हे तर त्यास आग्रही पाठिंबा देत. वैयक्तिक जीवन व राजकीय जीवन यांची सांगड घालण्याचा ते आग्रह धरीत नसत. कोमल मनाच्या अस्तित्वाबरोबर कठोर मनाचा धगधगीत जीवन्तपणा त्यांच्यात काही कमी नव्हता. महाराष्ट्रातील गरीब, श्रमजीवी, शेतकरी, कामगारांना ते आपलेसे वाटत. मोठ्या शेतक-यांना, व्यापा-यांना, मध्यमवर्गीयांनासुद्धा त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटून ते हवेहवेसे वाटत. कामाचा डोंगर रात्रंदिवस उरकत असताना प्रकृतीवर ते चांगलाच ताबा ठेवून असत. चर्चेने, सामोपचाराने, विचारांच्या देवघेवीने व सर्वांना बरोबर नेल्यानेच लोकशाही चांगली निरोगी राहते, अशी त्यांची विचारधारणा असल्यामुळे कुठेही आणि केव्हाही , इतरांचे विचार ऐकून घेण्यास ते तयार असत. नापसंत विचारास, कृतीस त्यांची विरोध करण्याची, विरोध दर्शविण्याची, रीत बेमालूम असे. समोरचा भिडू परस्पर घायाळ करण्याचे असे कौशल्य फारच थोड्यांना साधत असते.

१९४६सालापासून सतत महाराष्ट्रात पार्लमेंटरी सेक्रेटरी, डेप्युटी मिनिस्टर, मिनिस्टर, चीप मिनिस्टर असे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांचे कार्यवलय वाढत जाऊन भारत सरकारच्या निरनिराळ्या महत्त्वाच्या खात्यात आणीबाणीचे वेळी महत्त्वाची कामगिरी बजावून ते भारतात भारताचे आर्थिक भाग्य घडविण्याचे जागी विराजमान होऊन त्यांनी देशहित केले.

‘‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी चालविलेले राज्य’’ असा ख-या लोकशाहीचा सिद्धान्त यशवंतरावांनी आपला जीवनपाया मानल्यामुळे ते सतत वरील तीन गोष्टी लक्षात ठेवून वागत. त्यासाठी कराव्या लागणा-या त्यागाला आणि कष्टाला ते जुमानीत नसत, पण त्याचबरोबर लोकांनाही, लोकांच्या समूहालाही, आपल्याबरोबर नेण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात ते कसूर करीत नसत आणि विशेष हे की, आतापर्यंत त्यांच्या अशा प्रयत्नास यशही आले होते.

देशाच्या भाग्यविधात्या आणि सर्व थरात सर्वांच्या अंत:करणात मायेचे ठाण मांडून बसलेल्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या ‘‘नव्या भारत’’ घडविण्याच्या कामात ते चांगलेच साथीदार होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा मी सेक्रेटरी असताना सर्व महाराष्ट्रभर फिरलो.

यशवंतरावांच्या पुण्याच्या सभेत त्यांच्या सभेवर दगडांचा वर्षाव झाला होता. माझ्या महाड, कोल्हापूर आदी शहरातील मोठमोठ्या सभांवरही दगडांचा, काठ्यांचा वर्षाव झाला. सर्व महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा त्या वेळी बहर होता. गांधी टोपी घालून फिरणे, सभा करणे अत्यंत कठीण झाले होते. अशा वेळी यशवंतरावांनी लोकांना नावे न ठेवता, ‘‘प्रसंगी लोक फुलांचे हार घालतील, प्रसंगी तेच लोक जोडा-चप्पलाच्या माळाही चढवतील. तेव्हा ते दोन्हीही समसमान मानून त्यांच्यात त्यांच्यासाठी काम करणे हे ख-या राजकीय पुढा-याचे काम आहे.’’ अशी त्यांची विचारवन्त भूमिका होती. कधी-कधी, ‘‘लोकांना समाधान वाटेल असे केले पाहिजे.’’ असेही ते म्हणत. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात मुख्यत: श्रीमती इंदिरा गांधी यांचा हात आहे असे ना. चव्हाणांनीच आपल्या भाषणात सांगितले होते हे जरी खरे असले तरी ना. चव्हाणांचे श्रम आणि यशही काही कमी नाही! एवढेच नव्हे तर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या कार्यातील पूर्वपीठिका तयार करण्याचे कौशल्यपूर्ण कार्य ना. यशवंतरावांनीच केले होते. हे आजवरचे गुपित आम्ही त्या वेळच्या निकटवर्तीयांखेरीज इतर कोणालाही फारसे माहीत असणे शक्य नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org