मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३६

१३६. आमचे मोठे भाऊ – सौ. शरदिनी मोहिते

पुण्यनगरीत साने गुरुजी रस्त्यावरील जवाहर या वास्तूत २० जानेवारी १९८४ रोजी सकाळी विविध क्षेत्रातल्या गण्यमान्य लोकांचा आनंदोत्सुक मेळा जमला होता. समाज शिक्षण मालेच्या ४००व्या पुस्तकपुष्पाचा (आदिमाया आदिशक्ति- कृ. भा. बाबर) प्रकाशन सोहळा संपन्न होत होता. या सोहळ्यात अध्यक्ष म्हणून सहभाग घेण्यासाठी मुद्दाम दिल्लीहून आलेले होते महाराष्ट्र शारदेचे लाडके कर्तबगार सुपुत्र श्री. यशवंतराव चव्हाण. आणि अपेक्षा होती त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव दादा पाटील यांच्या आगमनाची. दादा कधी उशीर न करणारे, पण उशीर झाला; मालादेखील वेळेवर कार्यक्रम सुरू करणारी... कार्यक्रम वेळेवर सुरू होणार की नाही? ..दादा आल्याशिवाय कार्यक्रम सुरू करणं शक्य नव्हतं. प्रकाशन त्यांच्याच हस्ते होणार होतं. प्रश्न पडला होता. जमलेले लोक शांत होते. कितीही वेळ थांबायला तयार होते. कारण दादा आणि साहेब या अतिरथींना एकमेकांशेजारी शोभिवंतपणे बसलेलं पाहणं हा एक सोहळा होता. मनावर कोरला जाणार होता...खुद्द साहेबही दादा आल्याशिवाय कार्यक्रम सुरू करायला तयार नव्हते. पाच पाच मिनिटांनी ते मला विचारत होते ‘‘दादांचा काही फोन आला का? निरोप आला का? केव्हा येतायत?’’ नाईलाजानं मला पुन:पुन्हा तेच तेच उत्तर द्यावं लागत होतं — ‘काहीच कळत नाही अजून’... वाट पाहणं जेव्हा मर्यादेपुढं जायला लागलं तेव्हा मग कार्यक्रमाचा एक भाग सुरू करण्यात आला. मालेनं आयोजलेला विविध क्षेत्रातल्या काही कर्तबगार स्त्री-पुरुषांचा सत्कार सुरू करण्यात आला. हा सत्कार सोहळा चालू असतानाच दादा आले. या आगमनाला योग्य अशीच गजबज उठली. सर्वांनाच आनंद झाला. पण खरी खुशी उमटली ती यशवंतराव साहेबांच्या मुद्रेवर!

दादा उगीच उशीर करणारे नाहीतच. त्यांच्याबद्दल कोणाला रागही नव्हता. तरी त्यांनी जेव्हा खुलासा केला की, इथपर्यंत आलेलं विमान खराब हवामानामुळं उतरवता आलं नाही, मुंबईला परत जावं लागलं म्हणून उशीर झाला तेव्हा तो खुलासा ऐकून सर्वांनीच सुस्कारा सोडला. साहेब त्यानंतरच ख-या मोकळेपणानं कार्यक्रमात सहभागी होऊ शकले.

मुख्य कार्यक्रमानंतर भोजनाचे वेळी मला हाक मारून ते म्हणाले, ‘‘गंमत बघ.. कशी गंमत चालली आहे बघ!’’ ते दाखवत होते तिकडे मी पाहिलं तर ख-या अर्थाने जनतेचे नेते असलेल्या दादांना त्यांच्या चाहत्यांचा आणि त्याचप्रमाणं आपलं काम करून घेण्यासाठी आलेल्या लोकांचा अक्षरश: गराडा पडलेला होता ! ह्या लोकांना हे कळत नव्हतं, की जिला आपण भेटतो आहोत त्या व्यक्तीला सुखानं चार घास खाऊ द्यावे. दादांना प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यायची सवय. त्यामुळे गराडा किंचित देखील कमी होत नव्हता. दादांचं खाण्याकडे काय लक्ष असणार? सवयीनं चार घास खाणं चालू राहिलं होतं खरं! हा सगळा देखावा पाहताना साहेब खुदूखुदू हसत होते. ज्यानं वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे असा एखादा राजा सध्या राजा असलेल्या आपल्या मुलाकडे पाहील, अशा प्रकारची नजर या गमतीकडे पाहण्यात होती... मी त्यावेळी साहेबांना विचारलं, ‘‘दादा, तुम्ही आणि आम्ही तिघी बहिणी यांचा एक कौटुंबिक फोटो काढू या का?’’ तर ही कल्पना त्यांना आवडली. फोटो निघाले... जवाहर मध्ये त्यांनी ऐसपैस सवड काढून दिलेली ही भेट खरोखरच अविस्मरणीय होती.

यावेळी एक गोष्ट लक्षात येते ती ही की मी जरी वरती ‘साहेब’ असा उल्लेख केला, तरी प्रत्यक्षात मी त्यांना कोणत्याही संबोधनानं कधीही हाक मारली नाही. नेहमी जवळ जाऊन नमस्कार करून काय विचारायचं ते विचारलं. आता मात्र सोयीसाठी साहेब म्हणते. नाहीतर आठवण सांगणार कशी? साहेब मला मी शिकत असताना गमतीदार हाक मारायचे. ‘‘पाव्हणं’’ म्हणायचे ! मला आठवतं की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा जोर प्रचंड होता. जवाहरलाल नेहरू म्हणतात म्हणून द्विभाषिकच कसं चांगलं आहे हे पटवून देण्याचा चव्हाण साहेबांचा प्रयत्न कोणालाही आवडत नव्हता. त्यावेळी एकदा शनिवारवाडा ते काँग्रेस हाऊस यांच्या दरम्यान त्यांच्याविरुद्ध उग्र निदर्शनं झाली. निदर्शनं काही प्रमाणात खालच्या पातळीवर येऊन हिडीसही झाली होती. या वेळी त्यांच्याच घरातल्या आम्हा सर्वांच्या मनावर विलक्षण ताण पडला होता. साहजिकच त्याच मुक्कामात या प्रसंगानंतर ते जेव्हा आमच्या घरी आले, तेव्हा माझा चेहरा गंभीर आणि लांबडा. तर त्याची जाण लगेच होऊन जिना चढता चढताच ते हसत हसत म्हणाले, ‘‘काय पाव्हणं, जेवायला वाढणार ना?’’ मनावरचा ताण चटकन् ढिला पडून मी खुदकन् हसले तेव्हा त्यांना हायसं वाटलं...

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org