मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३२

१३२. आमचे काका: यशवंता – सौ. लिलाबाई बाबूराव काळे

माझे वडील गणपतराव यांना मोठे काका, आणि चुलते यशवंतराव यांना धाकटे काका म्हणत असू. आमचे एकत्र कुटुंब होते, माझे मोठे चुलते दादा हे बेचाळीसच्या चळवळीतच ऑपरेशनमध्ये वारले. त्यांची तीन मुले, नानी (चुलती), आई (आजी) असे १०-१२ माणसांचे मोठे एकत्र कुटुंब होते. पूर्वी आमच्या घरची फार हलाखीची परिस्थिती होती, असे आई, नानी सांगत. पण माझे मोठे काका नोकरी सोडून व्यापारधंदा करू लागल्यापासून मला कळते असे घर चांगले चालले होते. धाकटे काकाही आमदार झाल्यावर मुंबईला साहेब झाले होते. त्यामुळे आम्ही मुले कराडात मोठ्या मजेत राहात असू. पण मोठे काका क्षयाने आजारी पडले व ते म्युनिसिपालटीचे प्रेसिडेंट असतानाच वारले. मी त्या वेळी दहा-बारा वर्षांची होते. मला थोडे कळत होते परंतु माझे तिन्ही लहान भाऊ सात-पाच -दोन वर्षांचे असतील. धाकटे काका, आई एकमेकांना धीर देऊन दु:ख सावरीत. आता धाकटे काका मुंबईला होते. कराडचा सारा प्रपंच त्यांचेवर पडला. मोठ्या काकांच्या पाठोपाठ माझी आईही दोन वर्षांत क्षयाने वारली. आम्ही अगदी पोरके झालो. आई(आजी) आणि धाकट्या काकांनी आमचा सांभाळ केला. आता धाकटे काकाच आम्हाला वडिलांचे ठिकाणी होते. ते कराडला आले की, आम्हा सर्व मुलांना पोटाशी धरून कुरवाळीत, आम्हाला प्रेमाने काय हवे ते देत. त्यांनी आमची आई-वडिलांची उणीव भरून काढली.

आमचे काका बावन्न साली मंत्री झाले. त्यांनी मला मुंबईलाच राहावयास नेले. माझा आनंद तर गगनात मावेना. तसे आम्ही पूर्वी सर्व मुले सुट्टीत मुंबईला जात असू. पण मरीन लाईनच्या फ्लॅटमध्ये गर्दीच व्हायची. आता विंटर रोडच्या बंगल्यात नाचायला, बागडायला मोठे आवार होते. उन्हाळी सुट्टीनंतर माझे भाऊ कराडला शाळेसाठी परत गेले. मला काकांनी मुंबईच्याच शाळेत घातले. ताई माझ्या शाळेचे सर्व काही करीत. मी इंग्रजी शाळेत जात असल्याने मला मोठी मजा वाटे. आता चोवीस तास काकांचे जवळ मी असे. सिनेमा बघायला मिळावा म्हणून काकांशी भांडत असे, मग काका दौ-यावर गेले की, मी तार्इंबरोबर सिनेमाला जात असे. एकदा ताई काकांसह आम्ही सर्वजण झाशीची राणी सिनेमा पाहावयास गेलो, त्यानंतर काका मला लाडाने ‘मनू’ म्हणू लागले. झाशीच्या राणीचे नाव लहानपणी ‘मनू’ होते हे मला सिनेमा पाहिल्यावर कळले. काका मला ‘मनू’ म्हणून हाक मारू लागले की, मोठी गंमत वाटायची. मी लाडाने त्यांना सतावीत असे. त्या वेळी मी तर अगदी सुखाच्या शिखरावर होते. दुस-या वर्षी माझ्या धाकट्या भावाला अशोकला बोर्डीला शाळेत घातले. काकांना मुलांवर लक्ष ठेवता येत नाही म्हणून माझ्या धाकट्या दोन्ही भावांना राजा, दादांना पुण्यात मॉडर्न हायस्कूलमध्ये घातले. एक चुलतभाऊ कॉलेजला होता. फक्त धाकटा चुलतभाऊ कराडला आईजवळ होता. काकांना मंत्री म्हणून काम होते, तरी आम्हा सा-या मुलाबाळांची त्यांना सारखी काळजी वाटत असे. तेच आमच्या मोठ्या एकत्र कुटुंबाचे पालनकर्ते होते.

माझे लग्न काकांनी खूप मोठ्या हौसेने घरासमोरच्या पटांगणात केले. काका मंत्री असल्याने तर लग्नाला एवढी मोठी गर्दी होती की, सारे मैदान गच्च भरले होते. काकांना जावई वकील आहे त्यापेक्षा तो स्वातंत्र्यसैनिक आहे, याचा मोठा अभिमान वाटे. माझ्या लग्नात काकांनी कुणाकडूनही आहेर घ्यावयाचा नाही हे आधीच जाहीर केले होते. तसे काका शेवटपर्यंत वागले. माझे सासर कराडातच होते तरी मी सासरी जाताना, ताई काका मला पोटाशी धरून इतके रडले की, माझेही अंत:करण कालवले, माझ्याही अश्रुधारा आटेनात, काकांना त्या वेळी मोठ्या काकांची आठवण झाली. त्यांनी हे लग्न पाहायला हवे होते असे ते म्हणाले. काकांनी केलेले आमच्या घरचे हे पहिलेच लग्न होते.

काकांना, मला खूप काही करावेसे वाटे. रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी सारे केले. परंतु माझे पतींचा स्वभाव थोडा मानीच होता. त्यांना काकांचेकडून संसाराला मदत घेणे आवडत नसे. त्यामुळे मी जे मिळवतो त्यातच मी संसार केला पाहिजे असे त्यांना वाटे. काकांना या गोष्टीचा एका बाजूने आनंद वाटे, तर दुस-या बाजूने मला एवढे त्यांनी लाडात वाढवले तसे मला चांगल्या परिस्थितीत राहता यावे म्हणून त्यांचे अंत:करण तुटत असे. यांनी नंतर काकांचे इच्छेविरूद्ध सरकारी नोकरी धरली म्हणून ते काकांशी तुटकच वागत. परंतु काका मी सांगली, औरंगाबाद, पुणे इथे असताना आणि ते मंत्री, मुख्यमंत्री होते तरी आपल्या सा-या व्यापात माझ्या घरी तासभर आल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. तशी मी बंगल्यावरही जाऊन त्यांना भेटत असे, पण मला घरात येऊन भेटल्याचा त्यांना फार आनंद होई.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org