मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३१

१३१. आमचा यशवंता – भगिनी राधाक्का

आमचा यशवंता लहानपणी यशवंताला खेळण्याचा खूप नाद होता. आम्ही दोघेही शाळेला बरोबर जात असू. शाळेत न जाता सोनहि-याच्या काठी वाळूत यशवंता आपली पाटी पुरून ठेवीत असे. खुणेसाठी तो मला तिथे बसवायचा. नंतर इतर पोरांबरोबर खेळायला जायचा. परत आल्यावर पुरलेली पाटी बाहेर काढीत असे. दोघं मिळून घरी परत येत असू. कधी कधी मलाही शाळेत जाऊ द्यायचा नाही व स्वत: आपणही जायचा नाही !

यशवंता घरात सर्वांपेक्षा लहान म्हणून त्याचे लाडही फार झाले व वडिलांचा मारही त्याने भरपूर खाल्ला आहे. आईने कधी फाजील लाड पुरवले नाहीत. लहानपणी अभ्यासापेक्षा मित्रांबरोबर खेळण्यातच तो अधिक वेळ घालवी. आमच्या मामाच्या घराशेजारी रामोश्यांची, मुसलमानांची वस्ती होती. त्या मुलांत तो विटी-दांडू खेळायचा. सोनहि-यात डुंबत राहायचा.

आम्ही विट्याला राहात होतो, तेव्हा आमचे वडील तिथल्या जज्जांच्या घरी दूध घालण्यासाठी जात. त्यांनी आमच्या वडिलांना बेलिफाची नोकरी दिली. त्या वेळेस विट्याच्या जज्ज साहेबांची बदली कराडला झाली, म्हणून त्यांनी आमच्या वडिलांना कराडमध्ये नोकरीला घेतले. त्यामुळे आम्ही सर्वजण कराडला आलो. शुक्रवार पेठेत डुबलांच्या घरात एक खोली भाड्याने घेऊन आम्ही राहात होतो. डुबलांची आई फार प्रेमळ होती.

नंतर तो चिकाटीने अभ्यास करू लागला. त्यानेच सांगितलेला एक प्रसंग सांगते. टिळक हायस्कूलमध्ये एकदा गुरूजींनी प्रत्येक विद्यार्थ्याला उभे करून तुम्ही कोण होणार? असे विचारले. तेव्हा, टिळक, सावरकर, आगरकर अशी त्यांनी नावे घेतली. यशवंताला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला ‘‘मी यशवंतराव चव्हाण’’ होणार. यामुळे सगळी मुले हसली, पण मास्तरांनी त्याचे कौतुक केले.

यशवंताला प्रथम अटक करून नेले तेव्हा आईला फार दु:ख झाले. ती सहा महिने रडत होती. तो काही काळ भूमिगत होता. तेव्हा त्याचे नुकतेच लग्न झाले होते. घरात नवी बायको आहे म्हणून तरी तो घरी येईल यासाठी घरावर पहारा होता. त्या वेळी घराची झडती घेतली. तुरूंगातही त्याने अभ्यास चालू ठेवला. दोन परीक्षा अशाच दिल्या.

त्या वेळेस यशवंता भूमिगत होता. त्याला पकडून देणा-यास एक हजार रू. सरकारने इनाम लावले होते. यशवंताला तर आईला भेटल्याशिवाय राहवत नसे. त्या वेळेस आई माझ्याकडेच राहायला आली होती. तेव्हा यशवंता आईला भेटण्यासाठी येई. डोक्यावर लाल उंच टोपी व घोळ गुडघ्याच्या खालपर्यंत काळाभोर कोट असा पोषाख करी. आमच्या आजूबाजूच्या मुसलमानांच्या व बाकीच्या लोकांना यशवंता रात्री घरी येतो हे माहीत होते. गरिबी असूनही कोणीच पैशाच्या लोभाने ह्या कानाची गोष्ट त्या कानाला कळू दिली नाही.

यशवंताला लवकर पकडता यावे म्हणून नानींना (सौ.वेणूतार्इंना) नव्या नवरीला अटक केली. आईला पण नेली. माझं तेव्हा लग्न झालं होतं, त्यांना फलटणच्या तुरूंगात टाकले. त्या वेळी माझे बंधू गणपतराव अत्यवस्थ होते. त्यातच त्यांचा अंत झाला.

नानी कमालीच्या प्रेमळ होत्या. त्यांच्याबद्दलच्या आठवणी काढीत बसावेसे वाटते. मी व त्या हरिद्वारला देवदर्शनासाठी गेलो तेव्हा बोटीतून लक्ष्मण झूला पार करून आलो, तेव्हा नानींनी अगदी घरात केल्यासारखा गरम गरम ताजा चहा मला करून दिला. सर्वांना समाधान वाटले. त्यांच्यात गर्व नावालाही नव्हता.
यशवंताला नानींचा फार मोठा आधार होता. त्या स्वत: यशवंतरावांचे पथ्यपाणी औषध, कुठल्या कार्यक्रमास कुठले कपडे घालायचे सर्व काही नोकरचाकर असताना स्वत: पाहात असत.

त्यांच्या अकाली जाण्याने यशवंताला अतोनात दु:ख झाले. त्याची प्रकृती ढासळली. औषधपाणी वेळेवर होईनासे झाले. सर्व काही स्वत:स पाहावे लागे. नोकर असले तरी हरवलेल्या मायेच्या माणसाची सर त्यांना कशी येणार? नानीची आठवण येताच अगर एखाद्याने काढताच त्याच्या डोळ्यात पाणी येई.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org