मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३०

१३०. क-हाडचे क-हाडपण – मोहन कुलकर्णी

...ते दंगलीचे दिवस होते. क-हाडला कधी नव्हे ती दंगल उसळली आणि तिला तथाकथित पुढा-यांनी जातीय दंगलीचे स्वरूप दिले. हिन्दू-मुस्लीम समाज क-हाडमध्ये गेली अनेक दशके गुण्यागोविंदाने राहात आला आहे. अनेक हिंदू, मुस्लिमांच्या उत्सवात सहभागी होतात तर अनेक मुस्लीम बांधव क-हाडच्या आराध्यदैवताच्या वार्षिक यात्रेत आपला सहयोग देतात. एकीच्या या पार्श्वभूमीवर झालेली दंगल ही दोन्ही समाजातील काही समाजकंटकाची कृती होती. पण शासकीय पातळीवर मात्र ती जातीय नसल्याची ठाम भूमिका होती.

ना.यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या गावी उसळलेल्या दंगलीचे वृत्त समजले. ते मनातून अत्यंत अस्वस्थ होते. क-हाडला आले तेव्हा ही अस्वस्थता चेह-यावर स्पष्टपणे जाणवत होती. ते आले तेव्हा दंगल शमली होती पण दंगलीच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. वृत्तपत्रांतून दंगलीचे वृत्त-वार्तापत्रे येत होती. माझी एक पत्रकार म्हणून या सा-या घटनेकडे पाहण्याची दृष्टी सर्वांपेक्षा वेगळी होती. मी तेव्हा ‘तरूणभारत’ मधून दोन वार्तापत्रे लिहिली आणि ती वार्तापत्रे यशवंतराव चव्हाण यांनी वाचली होती.

क-हाडच्या ऐक्याचे स्वरूप सांगताना मी लिहिले होते, क-हाडला कृष्णा आणि कोयना नद्या दोन आहेत पण प्रीतिसंगम एकच आहे. गुरुवार पेठेत मनोरे दोन आहेत पण पाया एकच आहे. एकीचे दोन करण्याचा या नगरीचा स्वभाव नाही. इथल्या मातीने ऐक्यच शिकविले आहे. कृष्णा कोयनेचा प्रीतिसंगम हा अद्वैतांचा परमोच्च आदर्श या नगरीला आहे. हिंदु-मुस्लीम ऐक्यही या नगरीचे वैशिष्ट्य आहे वगैरे. ही वार्तापत्रे मोहल्यामोहल्यामधून वाचली गेली होती.

क-हाडला यशवंतराव आले ते मुख्यमंत्री वगैरे बरोबर असल्याने घाईत होते. पण मी समोर दिसताच थांबले. आसपासची मंडळी थबकली.

तुमची वार्तापत्रे वाचली. तुमच्या लेखातील मुद्यांचे ठळकपण माझ्या लक्षात आले.

कोणते?

क-हाडचे ‘क-हाडपण’ आपण तपशीलवार दिलेत ते बरे झाले. ते क-हाडपण जपावे ही तुमची भूमिका मला भावली. (भावली हा नेमका शब्द यशवंतरावजींचाच. आवडलीपेक्षा तो अधिक परिणामकारक आहे.)

इतरांपेक्षा मी वेगळ्या भूमिकेतून या घटनांकडे पाहिले आहे. सध्याच्या गरम परिस्थितीत...

मला तिथेच थांबवत ते म्हणाले, वृत्तपत्रांनी घटनांचे भांडवल करण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याकडे, अधिक सुधारण्याकडे आपल्या सामर्थ्याचा उपयोग करावा. ते राष्ट्रकार्य ठरेल. तुमची वार्तापत्रे मला त्या दिशेने जाणारी वाटतात.

त्या वार्तापत्रांचे मानधन आले नाही. पण यशवंतरावांनी माझ्या भूमिकेचे केलेले कौतुक त्या मानधनापेक्षा लाखपटीने मोलाचे वाटले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org