मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२९

१२९. बहुजन समाजवादी लोकशाहीचे चाहते: यशवंतराव चव्हाण – बंडोपंत सरपोतदार

यशवंतरावांची प्रवृत्ती लोकशाहीची होती. संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा एक ज्येष्ठ नेते म्हणून, केंद्रामध्ये विविध मंत्रालयांचा कारभार हाकणारे धुरंधर मंत्री म्हणून त्यांची भूमिका लोकांना धरून व विशेषत: विरोधकांशी समन्वय सुसंवाद ठेवावा अशीच होती. इंदिरा गांधींची प्रवृत्ती आणि कार्यपद्धतीच अशी होती की त्यांना ख-या अर्थाने त्यांच्याशी संवाद साधता आला नाही.

यशवंतरावांचा आणि माझा निकटचा संबंध संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतच आला. त्या पूर्वीचा परिचय म्हणजे युवक चळवळीतील आणि काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून. पण ते क-हाडाचे आणि माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान त्यामुळे जवळीक साधली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मी समितीचा सरचिटणीस आणि पहिल्या वर्षी विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा नेता म्हणून सतत संबंध येत राहिला. अनेक वेळा विरोधी भूमिका असूनही आमच्यामध्ये कटुता कधीच आली नाही. उलट ते विरोधी पक्षाचे म्हणणे पूर्णपणे ऐकून, समजून घेऊन ते शांतपणे उत्तरे देत. त्यामुळे विचारविनिमय होऊ लागला, आणि आमचा एकमेकांवरील विश्वास वाढत गेला. संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतरावांनी आणला असा बोभाटा आहे. कित्येक वेळी यशवंतरावांच्या भाषणामुळेही तो वाढीला लागला असावा. एकवेळ विधान परिषदेमध्ये भाषण करताना त्यांनी सांगितले की, ‘‘वाटाघाटी करून आम्ही आपले उद्दिष्ट मिळविले, समितीला ते करता आले नाही.’’ वास्तविक त्यांचे हे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नव्हते. कारण समितीला पंडित नेहरूंनी वाटाघाटीला कधी बोलावलेच नाही. खरे म्हणजे उदारमतवादी आणि लोकशाहीचे चाहते म्हणून त्यांनी समितीच्या नेत्यांशी वाटाघाटी करायला हव्या होत्या असे माझे मत आहे.

परिषदेतील यशवंतरावांच्या या भाषणाचा जो रिपोर्ट वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला त्या अनुषंगाने विधानसभेमध्ये आचार्य अत्र्यांनी तोफ डागली तेव्हा यशवंतरावांनी आपल्या भाषणातील तो भागच वाचून दाखविला. त्यामध्ये समितीच्या कामाचा उल्लेख न करता त्यांनी यशाचे माप लोकांच्या पदरात टाकले.

समाजवादातील मूलतत्त्व समतेचे आहे. त्यात सर्व प्रकारची समानता आर्थिक सामाजिक, शैक्षणिक अंतर्भूत आहे. आपल्या देशात तर सामाजिक समतेला विशेष महत्त्व आहे. जातीय उच्च-नीचतेच्या कल्पनांनी आपला समाज आता पोखरलेला आहे. यशवंतराव ब्राह्मणेतर पक्षाकडे न वळता राष्ट्रीय चळवळीमध्ये आले आणि त्यांनी बहुजन समाजासाठी, त्यांच्या विकासासाठी लढले. त्यांच्या शोषणाविरूद्ध लढले. त्यांना समाजवादच अभिप्रेत होता. बहुजन समाजाला शोषणमुक्त करायचे असेल तर शासकीय सत्तेबरोबर त्यांच्या ठिकाणी आर्थिक सामर्थ्यही असावयास पाहिजे. त्याबरोबरच हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण, सहकारी साखर कारखाने, बँका, अन्य सहकारी उत्पादन कारखाने यांना उत्तेजन दिले. कारखाने, बँका, जिल्हा परिषदांच्याद्वारा ग्रामीण नेतृत्व निर्माण करण्यासाठी परोपरीचे प्रयत्न केले. सर्व थरांतील माणूस वर आला पाहिजे. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची विचारधारणा होती. परंतु आपल्या हातात सत्ता असल्याशिवाय हे जमणार नाही अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. सत्तेशिवाय जनहित साधता येणारच नाही असा त्यांचा ग्रह होऊन बसला होता. त्यांच्या या आग्रहामुळेच त्यांच्या भूमिकेमध्ये कमजोरी आली असे माझे मत आहे. नाहीपेक्षा इंदिरा गांधींच्या काँग्रेसविरूद्ध एकदा खंबीरपणे उभे राहिल्यावर पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला नसता. सत्ता हस्तगत करण्यासाठी ज्या समाजाचे आपण भले करू पाहतो त्याला जागृत करून पुढे न्यावे लागते. वेळी संघर्षही करावा लागतो. हे त्यांच्या ध्यानात कसे आले नाही हे कळत नाही. काही काळ सत्तेबाहेर राहून पुन्हा सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी नव्हता असे कित्येक वेळा वाटल्यावाचून राहात नाही.

शोषित जनतेच्या संघटना प्रभावी बनल्या पाहिजेत असे त्यांना वाटत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी आम्ही विरोधी लोकांनी कम्युनिस्टांच्या बरोबर एकजूट करून मुंबईमध्ये कापड उद्योगातील श्रमिकांची एक युनियन स्थापन केली. ती युनियनला प्रतिस्पर्धी अशी होती. आम्ही एक दोन दिवसात लाख दीड लाख कामगारांना युनियनचे सभासद करून घेतले. हे यशवंतरावांना कळले तेव्हा त्यांनी खाजगीरीत्या आमचे अभिनंदन केले होते. ही गोष्ट माझ्या चांगली स्मरणात आहे. त्यांच्या आंतरिक चांगुलपणाचा, सौजन्यशीलतेचा आणि गुणग्राहकतेचा हा पुरावाच होता. त्यांचे मन सुसंस्कृत होते. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी त्यांच्यावर कितीही तोंडसुख घेतले तरी अत्र्यांच्या वाङ्मयाबद्दल त्यांना आदर वाटे. तो कमी झाला नाही. हायकोर्टाच्या साक्षीतही त्यांनी तसे एक वेळ सांगितले होते. या गोष्टीचा उल्लेख आचार्य अत्रे यांनी विधानसभेतील एका भाषणाचे वेळी केलेला आहे. त्यांचे आणि माझे संबंध जिव्हाळ्याचे होते. माझ्या कुटुंबियांबद्दलही त्यांना आपुलकीची भावना होती. कधी भेटले तर माझी पत्नी ताराबाई हिच्याबद्दल विचारपूस केल्याशिवाय राहात नसत. त्यामुळे आमच्या स्नेहाला आपलेपणाची किनार लाभली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org