मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२७

१२७.  आत्मनिर्झर हास्याचा धनी – म. सु. कारेकर

माझ्या शालेय जीवनात मास्टर विनायक ही चित्रपटसृष्टीतील मान्यवर व्यक्ती माझे शिक्षक होते. शाळेत आले की ते प्रफुल्लित होत. एक आगळे हास्य त्यांच्या चेह-यावर पसरे. आत्मनिर्झराचे दर्शनाचा लाभ होई.

कुमार वयाच्या त्या काळात स्वातंत्र्य चळवळ सर्व क्षेत्र व्यापून राहिली होती. ग्रामीण भागातील जनता महात्मा गांधींच्या मागे ठामपणे उभी राहिली होती तर आमचा शहारातील पुढारलेला वर्ग बुद्धिकौटिल्यवृत्तीने त्यांच्यापासून दूर होता. नवशिक्षित वर्ग त्यांच्यातच सामील होत होता. ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी त्याला अपवाद नव्हते.

अशा या काळात माझ्या आतेभावाचे चुलते श्री.पंडितराव न.भद्रे, निवृत्त न्यायाधिकारी यांनी कायद्याची परीक्षा देऊन कराडला वकिली सुरू केली होती. त्यांच्याकडे समव्यावसायिकाचे जे कोंडाळे जमे त्यात भारताचे उपपंतप्रधान श्री.यशवंतराव चव्हाण हे होते. गरिबी, ग्रामीण सरकार यामुळे बैठकीत ते फारसे पुढे पुढे नसत. पण त्यांच्या चेह-यावरील हास्याने मला त्यांच्याकडे आकृष्ट केले आणि तो धागा कायमचा जोडलेला राहिला.

त्या वेळी शालेय जीवनकाळात हिंदुसभावादी नंतर महाविद्यालयात जाताच साम्यवादी विचारसरणीत सर्वजण गुरफटलेले असत. आणि गद्धेपंचविशी संपताच मंडळी संसाराला लागत. किंवा काँग्रेसमध्ये सामील होऊन राजकारणी होत. याशिवाय भाई मानवेन्द्रनाथ यांच्या ‘रॅडिकल डेमॉव्रॅâटिक’ पक्षाचे प्रलोभन बुद्धिमंतांना असे. माजी आमदार आत्माराम पाटील यांची संगत त्यामुळे मला जास्त आवडे. यशवंतरावही या मंडळीत असत.

चर्चा बैठकीत तसे ते फार अबोल असत पण अफाट वाचन, विचारांची व्यवहाराशी सांगड, संदर्भाचा झटकन वापर, अतिशय मोजके बोलणे यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत नसे. स्वत:चा संसार, का केवळ बुद्धिमंतानी बुद्धिबळावर सत्ता गाजवावयाची का पुढारलेल्या समाजाची गुलामगिरी इतर समाजाने स्वीकारावयाची, का महात्मा गांधींचे सर्व समाजाला जागे करा, कार्यप्रवण करा, हा कार्यक्रम अंगीकारावयाचा याचा निर्णय घ्यावयाचा तो काळ होता. स्वत:ला संपूर्ण ओळखून ज्यांनी निर्णय घेतले तेच भावी काळात यशस्वी झाले आहेत.

यशवंतरावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या मागे ग्रामीण भागातील समाज नव्हता. तसेच शहरातील वर्गही नव्हता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्य करीत असताना बी.ए., एल.एल.बी.पदवी असणा-या या तरूणाचा होणारा तेजोभंग माझ्यासारख्या माहितगारांना उमजत होता. पण ते विचलित होत नव्हते. पक्ष सांगेल त्या पदाचा स्वीकार करून ते आपली सारी बुद्धी, शक्ती त्या कामासाठी वापरीत.

ती एक उमेदवारी होती. प्रशिक्षित तरूणाला उमेदवारी सहन होत नसते. यशवंतरावांनी ते हलाहल पिण्यास प्रारंभ केला होता.

काँग्रेस पक्षातून जेधे-मोरे-जाधव-वाघ ही मंडळी बाहेर पडून शेतकरी-कामकरी पक्षाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाऊसाहेब हिरे ही एक प्रबल शक्ती बनली. त्या काळांत यशवंतरावांना पार्लमेंटरी सेक्रेटरीपदावरून नगर विकास खात्याचे उपमंत्रीपद मिळाले होते. त्या वेळी ते कोल्हापूरला ना.हिरे यांच्याबरोबर रेल्वेने आले. पण सारा समाज हिरेंच्याबरोबर समोरच्या कोरगावकर तेल गिरणी प्रांगणात गेला आणि ती गर्दी कमी झाल्यावर मला यशवंतराव दिसले. मी जवळ जाताच ते त्यांच्या खास पद्धतीने हसले आणि मग त्यांना उपेक्षिले याचे कोणतेही वैषम्य न दाखवता गप्पागोष्टी करीत आम्ही कोरेगावकरांकडे गेलो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org