मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२२

१२२.  सह्याद्रीचा सिंहकडा – प्रा. सदाशिव माळी

गेली तीस वर्षे महाराष्ट्राचे कुशल नेतृत्व यशवंतरावांनी केले. या मराठमोळ्या मातीतून शेकडो लहान मोठे कार्यकर्ते त्यांनी घडविले. या नापीक महाराष्ट्रातील शेतक-यांना ऊस पिकवायला त्यांनी उद्युक्त केले. या दगडांच्या देशात शुभ्र दाणेदार साखरेचे अनेक कारखाने उभारायला शेतक-यांना सहकार्य केले. महाराष्ट्राच्या सामान्य माणसांपर्यंत नियोजनाचे पाट नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पाटबंधारे, रस्ते, दळणवळण, वाहतूक, शिक्षण, सहकार कृषी संदर्भात महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भांडवलदारी नेतृत्वाच्या जागी मराठमोळ्या नेतृत्वाची त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रमुखपदी प्रतिष्ठापना केली. सा-या जातिजमातींमध्ये सामाजिक सौहार्द निर्माण होण्यासाठी त्यांनी उपाययोजना केली. मराठी साहित्यिक, पत्रकार, ग्रंथलेखक यांची त्यांनी सन्मानाने बूज राखून त्यांना महाराष्ट्र कल्याणाकडे वळविले.

यशवंतराव चव्हाण हे चतुरस्त्र व बहुश्रुत नेते होते. पार्लमेंटरी सेक्रेटरी, पुरवठा मंत्री म्हणून त्यांचे वैशिष्ट्य महाराष्ट्राला विशेषेकरून दिसले नाही. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांच्या गुणांची कल्पना महाराष्ट्राला आली. पूर्वाश्रमीचे सातारचे ताठर पहिलवानी मन त्यांनी झुगारून दिले व एक आर्जवी, लोकांच्या हृदयात हळुवारपणे घुसणारा, लोकभावनांना हळुवारपणे कुरवाळून लोकांत आत्मविश्वास, स्वाभिमान, जिद्द निर्माण करणारा मधुर वाणीचा लोकप्रिय नेता या नात्याने त्यांनी नवे रूप धारण केले. या मोहमायी रूपाने व्यक्तिश: त्यांना व उभ्या महाराष्ट्रालाही लाभ मिळाला. उत्तम वक्तृत्व, भाषेवर प्रभुत्व, लाघवी भाषा, आवश्यक तो सभाधीटपणा, कौशल्यपूर्ण समर्थन, विरोधकांबद्दल योग्य तो मान देण्याचे धोरण, असंतोष पेटू न देता त्यातून सामंजस्य निर्माण करणारी नीती, नेत्यावर असीम निष्ठा, सहका-यांवर मनापासून प्रेम व विश्वास, या गुणसमुच्चयाने यशवंतरावांनी पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण या बलाढ्य नेत्यांनाही आपलेसे केले होते. मोरारजीभाई देसाई यांच्या ताठर वृत्तीच्या तुलनेत हे नेतृत्व लोकभिमुख, संयमी व चतुर वाटत होते. म्हणूनच नेहरूंनी हिमालयाच्या साहाय्यासाठी या सह्याद्रीची भारताच्या संरक्षणमंत्रिपदी नेमणूक केली होती. नेहरूंनंतर कोण या प्रश्नावर यशवंतराव अशी सदिच्छा जयप्रकाश नारायण यांनी व्यक्त केली होती. यशवंतरावांचे नेहरू घराण्यावरील प्रेमही त्यांना खूपसे देऊन गेले. त्यामुळे यशवंतरावांना महाराष्ट्राच्या नेतृत्वाबरोबरच भारताच्या राजधानीत भक्कम पाय रोवता आले.

यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात काही पथ्ये आवर्जून पाळली. त्याचा त्यांच्या नेतृत्वाला व व्यक्तिविकासाला खूप फायदा मिळाला. अर्थात त्यासाठी त्यांना खूप सोसावे लागले. भारताचे त्यावेळचे सर्वोच्च नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांनी अखंड निष्ठा ठेवली. ही निष्ठा व्यक्तिगत पातळीवरचीही होती व देशपातळीवरचीही होती. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड रणधुमाळीत विरोधकांप्रमाणे काही काँग्रेस कार्यकर्ते नेहरूंच्या संयुक्त महाराष्ट्राबद्दलच्या डळमळीत धोरणाबद्दल नापसंती व्यक्त करीत होते. देव-देवगिरीकर, भाऊसाहेब हिरे, काकासाहेब गाडगीळ यांना नेहरूंचे स.का.पाटील धार्जिणे किंवा द्विभाषिक धोरण मान्य नव्हते. त्यामुळे या नेत्यांचे प्रसंगी नेहरूंशी खटकेही उडाले. पण यशवंतरावांनी मनाला मुरड घालून आपली नेहरूनिष्ठा सोडली नाही. महाराष्ट्राने दिल्लीशी जमवून घेतले पाहिजे ही यशवंतरावांची राजकीय नीती होती. महाराष्ट्राने देशाच्या राजकीय प्रवाहातच राहिले पाहिजे, राष्ट्रीय प्रवाहापासून आपली नाळ, तुटता कामा नये, हे त्यांचे तत्त्वज्ञान होते.

त्या दृष्टिकोणातूनच त्यांनी फलटणच्या ऐतिहासिक भाषणात ‘‘देशापेक्षा मला नेहरू मोठे वाटतात. ’’ असे सांगितले. या विधानाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्रात यशवंतरावांची सर्वत्र निर्भत्सना करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राचे शत्रू म्हणून त्यांची संभावणा करण्यात येऊ लागली. ‘सूर्याजी पिसाळ’ असा त्यांचा ठिकठिकाणी उल्लेख करण्यात येऊ लागला. आचार्य अत्रे यांनी तर एकदा म्हटले, ‘‘चव्हाण या नावातील ‘च’ काढून टाकला तर शेवटी वहाण फक्त शिल्लक राहते. पण हे घणघणाती वार यशवंतरावांनी सहन केले. या काळात पुणे शहरातील भांबुर्ड्याच्या एका सभेत त्यांना जोड्यांची माळ घालण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेच्या सदस्या दांगट बाई यांनी केला ! ते जात तिथे त्यांच्या मोटारीवर जोड्यांची माळ घालण्यात येई. पण यशवंतराव रणांगणातून पळून गेले नाहीत की त्यांनी नेहरूनिष्ठा सोडली नाही ! हे हलाहल त्यांनी पचविले. त्यामुळे नेहरूंचा त्यांच्यावरील विश्वास वाढला. यशवंतरावांचे मुख्यमंत्रीपद नेहरूंनी कायम केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org