मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १२१

१२१.  लोकशाहीची पायाभरणी – यदुनाथ थत्ते

आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांपैकी एक प्रमुख शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे होते. लोकशाही सिद्धान्त आणि व्यवहार यांचे त्यांचे आकलन फार समंजसपणाचे होते. परस्पर विश्वास आणि आदर हा लोकशाही जीवनाचा पाया आहे, ही गोष्ट त्यांना चांगलीच माहीत होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि त्यानंतर त्यांचे नेतृत्व कसाला लागले.

संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळताच त्यांनी लोकशाहीच्या एका संकेताचा मार्मिक उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘सरकारी नोकरांना मला हे सांगायचे आहे की तुम्ही ‘हो’ म्हणायला शिका आणि राजकीय नेत्यांना मला सांगायचे आहे की तुम्ही ‘नाही’ म्हणायची हिंमत दाखवा.’’

नोकरशाही अडंगे, लाल फिती कारभार यामुळे लोकशाहीला दिरंगाईचा रोग जडतो आणि लोकानुनयाच्या भिडेस्तव राजकीय नेते नियमबाह्य गोष्टी करून घेण्यासाठी दबाव आणतात. त्यामुळे लोकशाहीला लाचलुचपत, भ्रष्टाचार, वशिलेबाजी व सग्यासोय-यांचे हित यांचा रोग जडतो. या दोन  रोगांमुळे लोकशाही हास्यास्पद ठरते.

राजकीय पक्षांनी सर्व संमत अशा आचारसंहितेचे पालन केले तर लोकशाही निवडणुकांना निर्मळ रूप येईल, या कल्पनेने शंकरराव देव व प्रा.धनंजयराव गाडगीळ यांच्या पुढाकाराने भाटघरला जी आचारसंहिता संमत करण्यात आली त्याच्यावर सही करणारात यशवंतराव चव्हाणही होते.

महाराष्ट्राने अभिक्रम दाखवून देशाला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून निकोप अशा लोकशाही परंपरा महाराष्ट्राच्या विधिमंडळात घालून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मतभेद असूनही सुजनता राखता येते याचा धडा त्यांनी घालून दिला.

एकदा पत्रकारांच्या गप्पागोष्टींच्या वेळी त्यांना एका पत्रकाराने त्यांच्या यशस्वी कारभाराचे रहस्य विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘एकतर हजारो लोकांशी माझे जिव्हाळ्याचे घरगुती संबंध आहेत. प्रचंड सभास्थानीसुद्धा मी आवर्जून त्यांची अगदी कौटुंबिकसुद्धा चौकशी करतो. त्यामुळे आपलेपणाचे हे वर्तुळ सतत विस्तारत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही प्रस्ताव समोर आला की, प्रशासनाचे मत जसे मी अजमावतो त्याचप्रमाणे प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणा-या वसंतदादांसारख्या माणसाकडून लोकांच्या संभाव्य प्रतिक्रियाही जाणून घेतो आणि मगच काय तो निर्णय घेतो.’’

यशवंतरावांच्या भोवती नेहमी लोकांचा गराडा पडलेला असे आणि यशवंतराव सर्वाचे सस्मित स्वागत करत. पण यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित वाचन होत नसे आणि याची खंत त्यांच्या बोलण्यात व्यक्त होई. आपले ज्ञान अद्ययावत असावे असा त्यांचा प्रयत्न असे. त्यातून त्यांना विरंगुळाही लाभे.

लोकशाही हे केवळ व्यवहारतंत्र नसून ती एक संस्कृतीही आहे असे ते मानीत. त्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले त्यांनी टाकली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना हे त्यापैकी एक कार्य.

अन्य विचारांच्या लोकांच्या सत्कार्याचा गौरव करण्याचा दिलदारपणा त्यांच्यात होता.

दोन तीन उदाहरणे याबाबत देण्यासारखी आहेत. हडपसरला महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि साने गुरूजी रुग्णालयाची ट्रस्टिशिप सिद्धान्तावर पंचवीस वर्षापूर्वी स्थापना झाली तेव्हा त्या तरूणांना शाबासकी देण्यासाठी यशवंतराव समक्ष आले होते.

राष्ट्रसेवादलाच्या कलापथकाचे ते चहाते होते. महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त दिल्लीकरांना महाराष्ट्राचे सांस्कृतिक कलात्मक दर्शन घडविण्याची कामगिरी त्यांनी अत्यंत विश्वासाने सेवादलावर सोपवली आणि प्रधानमंत्री पं.जवाहरलाल नेहरूनांही त्यांनी त्या कार्यक्रमाला हजर ठेवले. पुढे भारतदर्शन कार्यक्रमालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org