मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११७

११७. व्युत्पन्न व्यक्तिमत्त्वाचे यशवंतराव – दि. रा. घोरपडे

ना.यशवंतराव चव्हाण, तसे फारच आकस्मिकपणे गेले. वेणूताई गेल्या ! पुत्रवत् वाढवलेल्या डॉक्टर पुतण्याचे विक्रमचे अपघाती निधन झाले ! संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत, ज्यांनी सक्रिय हातभार लावला व ज्यांचे सहकारी म्हणून, संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले, त्या पंतप्रधान इंदिरा गांधीही गेल्या ! या सर्व दु:खद घटनांच्यामुळे, त्यांचे संवेदनाक्षम अंत:करण अतीव व्यथित झाले होते. वेणूतार्इंच्या जाण्याने, एकप्रकारे एकाकीपण फार मोठ्या प्रमाणात आले होते. कारण मुंबई सोडून, दिल्लीस जाण्याचा निर्णय त्यांनी पंडितजींनंतर, एकट्या वेणूतार्इंच्याच विचाराने घेतला होता. सखी सचिव असे अक्षरश: त्यांचे स्थान यशवंतरावांच्या जीवनात होते. त्यांनी राष्ट्रभक्ती, अभ्यासूवृत्ती, निष्ठा, व्यापकता, कर्तव्यदक्षता, शांत सोशिकता, परम सहिष्णुता या सर्व गुणांनी यशस्वी प्रशासक म्हणून, महाराष्ट्राप्रमाणे, दिल्लीत व परराष्ट्रांत प्रभाव पाडला होता. चीनने केलेल्या पराभवानंतर यशवंतरावांनी, खुबीने, योजनापूर्वक, कौशल्याने, भारताची संरक्षण सिद्धता, अद्ययावत, भक्कम व कार्यक्षम केली. त्याचा प्रत्यय १९६५ त व १९७१ त आपण अनुभवला. थोर परकीय व्यक्ती भेटत तेव्हा, ते यशवंतरावांचे बद्दल फार आशेने, गौरवाने बोलत. त्यांच्या चतुर, व्यवहारी, मुत्सद्दी स्वभावाबद्दल त्यांना धन्यवाद देत.

मुख्यमंत्री या नात्याने, त्यांनी प्रगतिशील महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला फार मोठी पायाशुद्ध गती व वेग प्राप्त करून दिला. सहकाराद्वारा उद्योग, कारखाने, कृषीउद्योग स्थापन करून, गरिबी हटवण्याचा कार्यक्रम त्यांनी गतिमान केला. महाराष्ट्रातील माणूस सर्वांगाने फुलावा म्हणून, सर्व सांस्कृतिक कार्याला संधी देऊन, प्रोत्साहनाचे कार्यक्रम आखले. गरिबांना शिक्षणाची द्वारे मुक्त केली. ती करताना जातीपेक्षा ‘‘आर्थिक मागासलेपणाचे’’ मौलिक तत्त्व त्यांनी प्रस्थापिले ! जातिनिरपेक्ष, वर्गहीन समाज (casteless classless ) स्थापण्याचे ध्येय त्यांनी कृतीत आणले. शिवछत्रपतींनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी राज्य व्यवहार कोश तयार करवून घेतला. यशवंतरावांनी मराठी भाषा व महाराष्ट्र संस्कृती वाढावी, प्रगत व्हावी, फुलावी म्हणून मराठी विश्वकोश मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ स्थापले ! हे कार्य फार मोलाचे व चिरंतनचे असे आहे. या मंडळीचे काम साकार झाल्याने, मराठी भाषेची उंची सा-या देशात वाढेल व मराठी राज्यभाषा म्हणून वापरली जाण्यास गती मिळेल ही त्यांची अपेक्षा होती. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात ते अधिक काळ राहिले असते तर त्यांनी विधायक दूरदृष्टीने महाराष्ट्र आणखीही सर्वांगानी बहरून टाकला असता, याची खात्री वाटते.

यशवंतराव हे काँग्रेस पक्षाचे नेते होते, संसदीय पक्षाचे नेते पं.नेहरू, लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी होते. शिवाय, तसेच ते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रनेते होते. त्यांचे नेतृत्व पत्करून त्यांनी निवडलेले सहकारी म्हणून, यशवंतराव मंत्रिमंडळात व पक्षात काम करीत होते. पक्षात वा मंत्रिमंडळात, आपली स्पष्ट मते ते मांडीत. लोकशाहीच्या संकेतास त्यांचे हे वागणे पूर्णपणे सुसंगतच होते याची जाण न ठेवता, ते आपल्या नेत्याविरूद्ध उघड बोलत नाहीत, बंड करीत नाहीत, अशी टीका करण्यात येई. तिचा हेतू वेगळा असला पाहिजे. लोकशाहीच्या संकेतानुसार नेत्यांची आज्ञा प्रमाण मानली पाहिजे असा प्रघात आहे. ते नैतिक कर्तव्य आहे. असे असता, ते लाचार आहेत, सत्तेमागे आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. एकीकडे महाराष्ट्राला राष्ट्रीय नेते विचारीत नाहीत, प्रतिनिधीत्व देत नाहीत असे बोलावे, त्याच बरोबर यशवंतराव दोन तपाहून अधिक काळ जबाबदारीच्या जागेवर दिल्लीत राहिले म्हणून उणेदुणे बोलावे, हे सर्व चमत्कारिक व दूषित विचारसरणीचे द्योतक आहे. मिरजेतील भाषणातच प्रथम यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘‘उद्या महाराष्ट्रनिष्ठा का राष्ट्रनिष्ठा असे पर्याय पुढे आले तर, मी.पं.नेहरूंचे मागे राहीन.’’ यात व्यक्त होणारी नेहरूनिष्ठा म्हणजेच राष्ट्रनिष्ठा आहे. राज्याच्या हितात व राष्ट्राच्या हितात, राष्ट्रहिताला अग्रक्रम व प्राधान्य देण्यात चूक कशी होते? याही बाबतीत, अपसमजाने, विपर्यस्त टीका करणे योग्य होणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org