मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११५

११५ - लहान वृत्तपत्रासंबंधी आस्था बाळगणारे यशवंतराव - श्री.विश्वनाथ वाबळे

वयाच्या १६ व्या वर्षापासून यशवंतरावांना वर्तमानपत्राचे वेड लागले होते. त्या काळात ‘‘केसरी’’, ‘‘ज्ञानप्रकाश’’ आणि ‘‘नवाकाळ’’ एवढीच वर्तमानपत्रे वाचून यशवंतरावजी राष्ट्रीय स्वातंत्र्याकडे आकर्षित झाले आणि पुढे आपल्या सा-या सार्वजनिक जीवनामध्ये यशवंतरावजींनी वर्तमानपत्रांशी आणि पत्रकारांशी सदैव प्रेमाचे संबंध ठेवले. वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधार असल्यामुळे पत्रकारांच्या टीकेने ते कधीही विचलित न होता त्या टीकेपासून बोध घेऊन ते आपला कारभार सुधारीत असत. यशवंतरावजींच्या आयुष्यातील कठीण काळामध्ये त्यांना वर्तमानपत्रांनी छेडले असता त्यांनी कधीही वर्तमानपत्रांबरोबर जाहीर वादविवाद केला नाही. परंतु ज्या वेळेला यशवंतरावांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा वृत्तपत्रांकडून प्रयत्न झाला त्या वेळी मात्र खंबीरपणे त्या टीकेची दखल घेऊन त्यांनी प्रत्युत्तर केले.

यशवंतराव चव्हाण अत्यंत संमजस, संयमी आणि समजुतदार राजकारणी असल्याची त्यांची ख्याती होती. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील मंडळींबरोबर समरस होण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. पत्रकारांबरोबर कसे बोलावे आणि कसे वागावे हे माहीत असल्यामुळे त्यांनी पत्रव्यवसायातील मंडळींचेही प्रेम संपादन केले. पण त्यामध्येही त्यांचा एक आगळा-वेगळा दृष्टिकोण मला दिसून आला. जवळच्या पत्रकारांपेक्षा विरोधी पत्रकारांशी ते अतिशय अधिक प्रेमाने वागताना दिसत होते. यासंबंधी एकदा मी त्यांना विचारले असता यशवंतरावजी म्हणाले, ‘‘आपल्याकडे येणारे गि-हाईक हे आपलेच असते पण दुस-याकडे जाणारी गि-हाईके खेचून घेण्यातच खरे कौशल्य दाखवता येते.’’

श्री.यशवंतरावांच्या मनातील कौशल्यपूर्ण विचार मला नेहमीच पटत असे. कारण यशवंतरावांनी त्यांच्यावर टीका करणा-या पत्रकारांना खूष ठेवण्याचा जेवढा प्रयत्न केला तेवढे समाधान मात्र त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणा-यांना दिले नाही.

तथापि, वैयक्तिक फायद्यातोट्यापेक्षा जेव्हा सामुदायिक प्रश्न उपस्थित होत असत तेव्हा यशवंतरावजी ताबडतोब पत्रव्यवसायाला मदत करण्यास धावून येत असत. १९७२ मध्ये ते अर्थमंत्री असताना पत्रव्यवसायावर पोस्टाने पाठविण्यात यावयाच्या अंकावरील तिकिटाच्या दरात वाढ झाल्यामुळे संकट ओढवले.त्यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचा मी अध्यक्ष असल्यामुळे हा अन्याय दूर करण्याकरिता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ठरावाप्रमाणे मी आणि श्री.नीलकंठ खाडिलकर (संपादक नवाकाळ) दिल्लीला जाऊन यशवंतरावजींनी भेटलो आणि क्षणाचाही विलंब न लावता यशवंतरावजींनी १५ हजारापेक्षा कमी खप असलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीची असलेली सवलत कायम ठेवण्याचे घोषित केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org