मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ११४

११४ - टिळकांनंतरचा थोर मराठी – श्री. रमेश भोगटे

श्री.स.का.पाटील बॉम्बे हॉस्पिटलात अत्यवस्थ होते. आम्ही काहीजण श्री.ए.आर.सुळेंसह आळीपाळीने तेथे बसत होतो. रात्री ८ नंतर मी घरी परतत असे. पाच सहा दिवस पाटीलजी अत्यवस्थ होते. भेटीला आलेल्या माणसांना ओळखू शकत नव्हते. एका रात्री मला यशवंतरावजी चव्हाण यांचा फोन आला, ‘‘अहमदनगरला श्री.अण्णासाहेब शिंदे यांच्या मुलीचे लग्न आहे. मी उद्या पहाटे विमानाने तेथे जाऊन येतो. परवा सकाळी आठ वाजण्यापूर्वी तू ‘रिव्हिएरा’ मध्ये ये, आपण तेथूनच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊ.’’

आणि मी तसा गेलो. दिवाणखान्यात मी वृत्तपत्र वाचीत बसलो असतानाच लगबगीने ते आत आले. माझ्या खांद्यावर हात टाकून जिना उतरलो. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. महेश्वर ठाकूर तेथेच होते. यशवंतरावजींना घेऊन ते व मी आत गेलो आणि पाटीलजींची ती दशा पाहून यशवंतरावजींना गहिवरून आले. पाच-सात मिनिटे त्यांनी त्या अवस्थेतच इकडे तिकडे फिरून पाटीलजींना न्याहाळले आणि नजरेनेच त्यांनी मला बाहेर निघण्यास सांगितले. दाराबाहेर येताच गहिवरलेले यशवंतरावजी आपला हुंदका आवरू शकले नाहीत. ‘‘महाराष्ट्राचा सिंह आज असा अगतिक होऊन पडावा हे आमचे दुर्दैव होय.’’ अशा शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि दाराबाहेर जमलेल्यांना नमस्ते करून ते माझ्या खांद्यावर हात टाकून निघाले.

मी आज यशवंतरावजींवर लिहिताना एक प्रसंग एवढ्यासाठीच येथे नमूद केला आहे की, यशवंतराव आणि अप्पासाहेब पाटील यांच्यात खूप शत्रुत्व होते, एकमेकांकडे ते पाहतही नव्हते असे म्हणणा-यांना यशवंतराव किती हळव्या मनाचे होते आणि वयाने आपल्यापेक्षा वडील असणा-यांना आणि खरोखरच तेवढे नेतृत्वगुण अंगी असणा-यांना एका मराठी माणसाबद्दल त्यांना केवढा आदर वाटत होता. त्याचे दर्शन सर्वसाधारण मराठी माणसाला होण्यासाठी.

यशवंतरावजी मोठे झाले ते अशा गुणपूजक वृत्तीमुळे. लोकमान्य टिळकांनंतर लुळ्या पडलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसला खरे नेतृत्व दिले ते यशवंतरावजींनी आणि आज बहुजन समाज ज्या दिमाखाने महाराष्ट्रीय राजकारणात वावरत आहे तोही यशवंतरावजींच्या दूरदृष्टीमुळे. १९५३ साली मी माझे ‘‘नवसंदेश’’ हे साप्ताहिक सुरू केले तेव्हा यशवंतरावजी चव्हाण हे मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात होते. माझी आणि त्यांची ओळख तशी जुनी. १९४२ च्या चळवळीत मला अठरा महिन्यांची शिक्षा झाली आणि १९४४ च्या मार्चमध्ये मी तुरुंगातून सुटलो तेव्हा मुंबईतील जुन्या काँग्रेस हाऊसच्या बाजूला आचार्य अत्रे यांनी आपल्या अत्रे प्रिंटींग प्रेसच्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली होती. मी ‘‘नवयुग’’ साप्ताहिकात प्रुफ रीडर म्हणून कामास लागलो होतो आणि पत्री सरकारबाबत नारायण पुराणिक हे मजकूर लिहित असत. मलाही पत्री सरकारबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटत होती. फलटणचे त्या काळचे राजेसाहेब श्रीमान मालोजीराव नाईक निंबाळकर यांच्याशी माझ्या एका मित्राने माझी ओळख करून दिली होती आणि त्या जोरावर मी श्रीमंतांना पत्र लिहून फलटणला गेलो होतो. यशवंतरावजींची सासुरवाडी फलटणलाच होती. ज्या दिवशी मी फलटणला गेलो त्या दिवशी त्यांचा मुक्काम फलटणलाच असल्याचे श्रीमंतांकडून समजले. राजेसाहेबांनी त्यांची व माझी भेट घडवून आणली आणि आमचे त्या वेळी जे मेतकूट जमले ते यशवंतरावजींचे देहावसान होईतो कायम होते. मुंबईत पुढे ते बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमले गेले. त्यावेळी ते मरीन ड्राईव्हवरील जैन मंडळाच्या इमारतीत राहायचे. पगार जेमतेम दीडशे रूपये असावा. यशवंतरावजींची आर्थिक बाजू त्या काळात मुंबईतील खोक्याचे एक व्यापारी कै.बाबुराव गोडसे हे सांभाळायचे आणि हे पैसे पोहोचविण्याचे काम अधून मधून माझ्याकडे असायचे. साहजिकच यशवंतरावजींशी माझे संबंध जिव्हाळ्याचे झाले आणि त्यांच्या दिवसेंदिवस शुक्लेंदुवत वाढत जाणा-या कार्यकर्तृत्वाची आणि बुद्धिमत्तेची चुणूक मला जवळून न्याहाळता आली. पुढे यशवंतरावजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, भारताचे संरक्षणमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, गृहमंत्री झाले आणि अखेर चरणसिंग राजवटीत भारताचे उपपंतप्रधानही झाले. यशवंतराव मोठे होत होते, परंतु आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्याना मात्र ते शेवटपर्यंत विसरले नव्हते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org