मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १११

१११. गरिबांच्या कणवेचा महापूर – श्री. एस. के. कुलकर्णी

यशवंतराव हे प्रारंभापासून झुंजार मनाचे व्यक्तिमत्त्व होते. टिळक हायस्कूल, क-हाड ही त्यांची शाळा. त्या शाळेतल्या लिंबाच्या झाडावर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकावून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झेप घेतली आणि तुरूंगवास पत्करला. पुढे १९६७ मध्ये त्या लिंबाच्या झाडाबद्दल आपला जिव्हाळा प्रगट करताना श्री.यशवंतराव म्हणाले, ‘‘ज्या झाडावर आम्ही बालपणी तिरंगा फडकवला ते झाड कृपा करून पाडले जाऊ नये अशी विनंती मी शाळाचालकांना केली आहे.’’ या एकाच घटनेतून कितीतरी गोष्टी सहजपणे जाणवतात. चळवळीबद्दल नितांत आदर, तीत बालवयात झेप घेणारे साहसी मन आणि पुढे ते सारे स्मरणात ठेवून त्या झाडावरही नितांत प्रेम करणारे कविमन. सारांश यशवंतराव हे एक विविध अंगी आणि विविध छटांनी नटलेले अजोड व्यक्तिमत्त्व आहे.

जवळजवळ १९२९-३० पासून स्वातंत्र्यलढ्यात आणि राजकारणात सक्रिय भाग घेऊन जवळजवळ पाच-साडेपाच दशके त्यांचे शरीर, मन आणि बुद्धी देशाच्या भल्यासाठी झगडत आली. इतका प्रदीर्घ काळ देशासाठी दिलेली फार थोडी माणसे आढळतील.

अशा असामान्य व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय झाला आणि अनेक प्रसंगी त्यांना जवळून पाहता आले ही माझ्या आयुष्यातील एक मोठी विलक्षण संधी, असेच मी मानीत आलो आहे. त्याची सुरूवात १९५२ मध्ये ते मुंबई राज्याचे समाजकल्याणमंत्री असताना लिहिलेल्या एका साध्या पत्रातून झाली. एका ग्रामपंचायतीचा प्रश्न त्या पत्रात मांडला होता. पुढे तो सुटण्यास कैक वर्षे लागली, पण त्यातून जुळलेले नाते गेली ३२ वर्षे अखंडपणे कायम राहिले. समाधान याचे आहे की, माझे वय, माझी पार्श्वभूमी असा कसलाच विचार न करता यशवंतरावांनी हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने माझ्यासारख्या भुईसपाट ढेकळाशी जवळीक केली.

पुढे एके दिवशी माझ्या शिक्षणाची त्यांनी आपुलकीने चौकशी केली. त्या वेळी ते द्विभाषिकाचे मुख्यमंत्री होते. साहेबांनी आपली चौकशी केली, या एका विचारासरशी सारे अंग मोहरून उठले. ती जाणीव आणि त्यांच्या शब्दातील तो आपुलकीचा ओलावा अवीट आहे, न संपणारा आहे. तीच आपल्या जीवनातील नियतीने बांधून दिलेली आपुलकीची शिदोरी, असे मी मानीत आलो आहे. पुढे प्रत्येक भेटीत आणि त्यांच्या जमेल त्या कार्यक्रमास जातीने उपस्थित राहून त्यांच्या शब्दांचा कानात आणि मनात साठा करून ठेवण्याचा उद्योग आणि चाळाच लागला. मग ती ६२ ची निवडणूक असो, ६७ ची निवडणूक असो, ७१ ची निवडणूक असो, त्यांच्या पाठोपाठ पुष्कळ सभांना हजर राहण्यासाठी धडपड केली आहे.

दिल्लीत गेल्यानंतर एक मुख्य कार्यक्रम म्हणून ‘‘१ रेसकोर्स रोड’’ या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायची हे ठरून गेलेले होते. हा सगळा प्रकार पाहिल्यावर पुष्कळांनी प्रश्न केला की, ‘‘आपला पक्ष कोणता? आपण काँग्रेसवाले काय?’’ त्यांना मी अनेकदा सांगितले की, ‘‘मला पक्ष असा नाही, पण साहेब ज्या पक्षात, त्या बाजूला मी ठामपणे उभा राहीन.’’ लोकांना माझ्या उत्तरातील कोडे कधीच समजले नाही. जीवनातील प्रारंभीची वर्षे वणवण भटकणा-या माझ्या कष्टांच्या झोळीत वर म्हटल्याप्रमाणे जी आपुलकीची भिक्षा आपण होऊन घातली गेली, तिचा मी ऋणाईत न राहू तर काय करू?

साहेबांबद्दल आपुलकीची अपूर्वाई वाढत जाण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील जुन्या-नव्यांचा अपूर्व संगम. त्यांचे कृष्णेवर प्रेम होते, त्यांचे कोयनेवर प्रेम होते, त्यांचे प्रितिसंगमावर प्रेम होते, त्यांचे सज्जनगडावर प्रेम होते, त्यांचे कृष्णाकाठच्या ज्वारीवर प्रेम होते, गोट्याच्या वांग्यावर प्रेम होते. कृष्णेतल्या होडीवर त्यांची भक्ती होती. हा जसा एका बाजूला अपूर्व प्रीतीचा सोहळा, तसा दुस-या बाजूला गरिबांच्या कणवेचा महापूर होता. शेकडो भाषणांतून, साध्यासिध्या शब्दांतून जणू लोकांशी चर्चा-संवाद करीत त्यांनी आपले आवडते समाजवादाचे सिद्धान्त अशिक्षित, भोळ्याभाबड्या जनतेला थोरल्या भावाच्या मायेने समजावून सांगितले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org