मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण २१

२१. यशवंतराव माझे गुरू – भाई माधवराव बागल

सौ. वेणूताई अगोदर गेल्या. मागे राहण्यात आता अर्थ नाही असे समजून त्यांच्या पाठोपाठ साहेब निघून गेले.

त्यांनी आपल्या आत्मचरित्राचा पहिला भाग नुकताच लिहून पूर्ण केला होता. त्यानंतर ते मला इचलकरंजीत पालकमंर्त्याच्या घरातील एका लग्नसमारंभाच्या वेळी भेटले होते. ते मला म्हणाले, ‘‘माधवराव, माझ्या आत्मचरित्रात तुमच्याबद्दल मी पाच-दहा पाने लिहिली आहेत.’’ त्या वेळी मी त्यांना म्हटले, ‘‘यशवंतरावजी, तुमच्यात फार मोठा दोष आहे तो म्हणजे तुम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही.’’

यशवंतरावजींनी मला मोठं केलं. पंचवार्षिक योजनेचे मला सभासद केले. शिवाजी विद्यापीठाचा श्रीगणेशा माझ्या हातून घडविला. कोल्हापुरात आले की, ते मला शाहूपुरीतील माझ्या घरी भेटल्याशिवाय राहात नसत. शाहू मिलसमोर बसवलेल्या माझ्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी यशवंतराव व मुख्यमंत्री वसंतदादा आवर्जून आले होते. घरी पाय टाकताच माझ्या दिवंगत पत्नीच्या पेंटिंगला त्यांनी हार घातला आणि मी यशवंतरावांचे पाय माझ्या अश्रूंनी धुऊन काढले.

सातारा जिल्हा परिषदेने अध्यक्ष म्हणून त्या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तात्पुरते अध्यक्ष असलेले श्री. माधवरावजी अणे यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे परिषदेला कोल्हापूरच्या अ.जा.परिषदेतर्फे मला विशेष निमंत्रण देऊन बोलावून घेतले होते. त्यातल्या एका राजकीय ठरावाला मी एक उपसूचना मांडली-

राजकीय मागण्यांबरोबर आर्थिक स्वरूपाच्या मागण्याही त्यांनी सुचविल्या. मी आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्या सूचना मला तरी उपयुक्त वाटतील अशा होत्या. सावकाराने दामदुपटीपेक्षा कर्ज वसूल करू नये. नऊ टक्क्यांपेक्षा जादा व्याज आकारू नये. शेती कसणा-या कुळांना शेती कसण्याचा कायमचा हक्क द्यावा आणि या सर्व मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात असा त्या उपसूचनांचा आशय होता. परिषदेसाठी आलेले आमच्या जिल्ह्यातले आणि प्रांताचे नेतेही या उपसूचना पाहून एकदम गडबडून गेले. मला त्याबद्दल आज तर आश्चर्य वाटत आहे. पण तेव्हाही मला आश्चर्य वाटले होते. या उपसूचनांबाबत तांत्रिक अडचणी उभ्या केल्या. तेव्हा त्याला विरोध करण्याकरिता जी मंडळी उभी राहिली त्यांत मीही जाणूनबुजून उभा राहिलो. मला आश्चर्य वाटत होते की, शेतकरी समाजाचे हे जिव्हाळ्याचे
प्रश्न होते. त्यासंबंधाने जर ही परिषद काही बोलणार नसेल आणि काही करणार नसेल तर शेतकरी समाजाने स्वातंर्ताच्या चळवळीत जो भाग घेतला तो फुकट जाणार काय? शहरातल्या पांढरपेशा वर्गातील कार्यकर्त्याना व पुढा-यांना राजकीय स्वातंत्र्य प्रिय होते. पण त्यातून उद्भवणारे सामाजिक व आर्थिक प्रश्न त्यांना नको होते. असा अर्थ मी मनाशी काढला आणि माझे मन अतिशय कष्टी झाले.

आपल्या वक्तृत्वाने आपले विचार समजावण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ. अध्यक्षांनी सर्व उपसूचना नियमबाह्य म्हणून नामंजूर केल्या आणि विषय नियामक समितीचे काम संपले. एक गोष्ट लिहिण्याजोगी व तुम्ही घेण्याजोगी आहे. त्या वेळी यशवंतरावजी अर्थमंत्री असावेत. ते कराडच्या विश्रामगृहामध्ये सहकुटुंब उतरत. मी भेटायला नेहमीच तेथे जात होतो. एक म्हातारी फाटक्या लुगड्यात काही तरी गुंडाळून म्हातारपणामुळे कापत कापत यशवंतरावांच्या भेटीचा प्रयत्न करीत होती. पोलिसांनी तिला जवळ जाऊ दिलेले नाही. यशवंतरावजींनी हे पाहिले. त्यांनी तिला जवळ बोलावले व विचारले, ‘‘का आली होतीस बाई?’’

‘‘सर्व गाव यशवंताला नावाजतंय, तवा त्याला भेटून हा हार द्यावा म्हणून आलीया.’’ तिने फाटक्या लुगड्यातून तो हार बाहेर काढला व यशवंतरावजींना दिला. त्यांनी तो हार घेतला व तिच्या गळ्यात घालून तिच्या पाया पडले व सौ. वेणूतार्इंना तिला जेवू घालायला सांगितले.

अशा गोष्टी किती तरी मिळतील.

यशवंतरावजी माझ्याहून वयाने कितीतरी लहान पण मला मागे टाकून ते पुढे गेले.

त्यांचे दहन जवळून पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले. आता माझा शिक्षक मला पुन: पाहायला मिळणार नाही. म्हणून त्यांनी मला दिलेली सर्व पुस्तके मी जपून ठेवली आहेत.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org