मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण २४

२४. माझे मित्र यशवंतराव – संभाजीराव थोरात

माझे आजोबा जुन्या पिढीतले असले तरी त्यांना राष्ट्रीय काँग्रेसबद्दल प्रेम होते. त्या काळच्या चार इयत्तापर्यंतचे शिक्षण, परंतु व्यवहारज्ञान मोठे. होमरूल चळवळीचे ते प्रथम सभासद होते. नंतर काँग्रेस पक्षाचेही सभासद होते. शेती त्यांचा आवडता व्यवसाय.

राजर्षी शाहू महाराजांच्या सत्यशोधक विचारांचे ते अनुयायी होते. क-हाडच्या गोरक्षणात गांधींची सभा त्यांनी ऐकली होती. मिठाच्या सत्याग्रहातील मिठाच्या पुड्या विकताना जमलेले लोक, त्यांचे कुतूहल व पोलिसांची धावपळ, धरपकड त्यांनी पाहिली होती. अशा परंपरेत मी वाढलो. त्या वेळी यशवंतराव विद्यार्थी अवस्थेत खेडोपाडी फिरून लोकजागृतीचे कार्य करीत होते. त्या वेळी आमच्या आजोबांनाही ते भेटत असत. यशवंतराव, बी.ए.ला. असताना ते खेड्यामधून प्रभावीपणे भाषणे करून काँग्रेस पक्षाचे विचार लोकांपुढे मांडत असत. अशा कालखंडात आम्ही त्यांना प्रथम पाहिले.

आम्ही त्यांच्या सान्निध्यात गेली चाळीस वर्षे काढली आहेत. आमचा त्यांचा राजकीय दृष्ट्या जीवनभर संबंध आला, व तो टिकून राहिला.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची व नेत्यांची अवस्था बिकट झाली होती. संपूर्ण जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने, तर काँग्रेस श्रेष्ठी चळवळीच्या विरोधात, अशा बिकट अवस्थेत यशवंतराव महाराष्ट्राचे नेतृत्व एकमेव करीत होते. महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील थोर नेते व यशवंतराव यांच्या विचारात वारंवार वैचारिक भिन्नता येत असे. दिल्लीहून पक्षश्रेष्ठीकडून नवेनवे धरसोडीचे, अव्यवहार्य पर्याय जाहीर होत असत.

खेडोपाडी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याना पक्षाची ठाम भूमिका मांडता येत नसे, त्या वेळी जनमतास तोंड देणे अवघड झाले होते. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संभ्रमात पडला होता. अशा वेळी आम्ही काँग्रेस पक्षाच्या मित्रमंडळींनी आपल्या पक्षाची भूमिका काय असावी व काय असू नये यासाठी ठामपणाची भूमिका घेण्यासाठी माझे मित्र पांडुरंग पुजारी व व्यंकटराव माने
यांच्या विचाराने उंब्रज येथे तालुक्यातील कार्यकर्त्याची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीची बातमी यशवंतराव चव्हाण यांना आमच्या राजकीय हितशत्रूंनी विकृत करून कळविली.

‘‘संभाजीराव यांनी तुमच्या विरोधात फळी उभी करून, तुमच्या नेतृत्वाला शह देण्याचा त्यांचा विचार आहे वगैरे.’’ खरे म्हणजे तसे काही नव्हते. परंतु त्या वेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या धोरणाची व जनमताच्या धोरणातील विसंगतीने यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिक शक्तीचा धागा क्षीण झाला होता. अशा बेचैन मन:स्थितीत क-हाडला येऊन त्यांनी आम्हास बोलावून घेतले. पूर्वग्रहदूषीत मनाने त्यांनी आमच्यावर उंब्रज मीटिंगबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. आमचे मन समजावून घेण्याच्या मन:स्थितीतच ते नव्हते. ते क्रूद्ध होऊन म्हणाले, ‘‘तुम्ही मंडळी माझे राजकीय जीवन संपविण्यास निघालात काय? वास्तविक गुंतागुंतीच्या राजकीय प्रश्नाच्या काळात माझे मानसिक ताण वाढत असल्यामुळे मी माझ्या जन्मभूमीकडे धाव घेतो आणि मित्रांच्या सल्ल्याने, गाठीभेटीने माझे मानसिक सामथ्र्य आणि विचारशक्ती पुन्हा ताजीतवानी अशी निश्चित भूमिकेवर ठाम राहून त्यांच्या आशीर्वादाने मी मिळवितो. माझा जो मालक, मतदार, यांच्या माझ्यावरील प्रेमाची शिदोरी घेऊनच मी माझा राजकीय प्रवाह सुरू ठेवला आहे असे असताना तुम्ही मित्रांनी मला हे नवे आव्हान दिले आहे असे मी मानतो.’’

मी माझ्या मित्राच्या वतीने यशवंतरावांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अनेक परीने बैठकीचा उद्देश सांगण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यांची समजूत न होता, बोलण्याने बोलणे वाढले आणि दोघांची आव्हाने-प्रतिआव्हाने झाली. तिथे जमलेली सर्व मंडळी हवालदील झाली. यशवंतरावांनी ती गोष्ट फारच मनास लावून घेतली. तिथे जमलेल्या सर्व मंडळींना असे होऊ नये असे मनापासून वाटले.

मी आणि माझी मित्रमंडळी, जड अंत:करणाने यशवंतरावांच्या शुक्रवारातील जुन्या घरातून बाहेर पडलो. पाच-दहा मिनिटांचा अवधी गेला असेल नसेल तोच मागाहून यशवंतराव यांनी बोलावल्याचा निरोप परत आला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org