मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण २०

२०. यशवंतराव उत्कृष्ट साहित्यिक  झाले असते – शांतारामबापू इनामदार

टिळक हायस्कूलमध्ये असताना ‘‘ग्रामसुधारणा योजना’’ या विषयावर आयत्या वेळी विषय देऊन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचे परीक्षक कै.तात्यासाहेब केळकर, श्री.ज.स.करंदीकर, श्री. भाटे हे होते. या वेळी श्री. यशवंतरावांनी १५ मिनिटे इतके मुद्देसूद भाषण केले की, त्यांची भाषणाची वेळ संपल्यानंतरही त्यांना १० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली. इतके परीक्षक त्यांच्या भाषणावर मोहित झाले होते. या वेळी मिळालेली सर्व बक्षिसांची रक्कम यशवंतरावांनी त्यांना जेलमध्ये झालेल्या दंडाची रक्कम म्हणून खर्च केली !

टिळकांचा जन्म स्वातंत्र्योत्तर काळात झाला असता तर ते गणिती शास्त्रज्ञ झाले असते, त्याप्रमाणे यशवंतरावांचा जन्म स्वातंत्र्योत्तर काळात झाला असता तर ते उत्कृष्ट साहित्यिक, कवी झाले असते. शालेय जीवनात कोठेही पुस्तक वही मिळाली की, यशवंतराव त्यावर कवितेच्या ओळी लिहीत. कराड गॅदरिंगच्या वेळी ‘‘शिवाजी मेळा’’ या मेळ्याची सर्व पदे यशवंतराव शाळेमध्ये मधल्या सुट्टीत रचून देत. श्री. परीट म्हणून एक मित्र ही पदे म्हणत. त्याला यशवंतराव विनोदाने संगीत डायरेक्टर म्हणत.

१९२७ ते १९५२ पर्यंत मी सतत त्यांच्यामागे सावलीप्रमाणे राहात असे. २४ तास एकत्र सहवास. मॅट्रिकपर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यानंतर ते पुढे राजाराम कॉलेजला गेले. रात्री दिवा लावून अभ्यास करण्याची ऐपत नव्हती. आगरकरांनी जसा म्युनिसिपालिटीच्या दिव्यावर अभ्यास केला तशीच त्यांची परिस्थिती एलएल.बी.ला झाली! पुण्याला असताना ते राहतेकरांच्या खानावळीत जेवावयास जात. नेहमी अनेक मंडळी बरोबर असावयाची. राहतेकरांना वाटे की, चव्हाण कोणीतरी सरदारच आहेत. नंतर त्यांना त्यांचे मोठेपण समजले.

शालेय व कॉलेज जीवनात शेवटच्या महिन्यात ते अभ्यास करीत. तेवढा वेळ त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा असे. इतर वेळी जनजागृतीच्या कामाचे आयोजन करण्यात ते नेहमी गुंतलेले असत.

१९३७ मध्ये आत्माराम पाटील यांना तिकीट मिळण्यासाठी यशवंतरावांनी सरदार वल्लभभार्इंमार्फत प्रयत्न केले. आत्मविश्वासाने तिकीट मिळवून प्रचंड बहुमताने त्यांना निवडून आणले. त्या वेळची एक गमतीदार हकीगत अशी: आम्ही पुण्याहून सातारा स्टँडवर आलो. कांदेकरांच्या खाजगी खानावळीत जेवलो. सातारा-कराड खाजगी गाड्या, तिकीट ५० पैसे. जेवणासाठी पैसे खर्च केल्याने पैसे घेऊन येतो तेथे थांबा म्हणून जे गेले ते परत आलेच नाहीत! हरिभाऊ लाड यांनी पैसे दिल्यावर मग आम्ही कराडला गेलो अशी आर्थिक स्थिती बिकट होती .
१९३२ साली २६ जानेवारी रोजी कराड नगरपालिकेवर तिरंगी झेंडा लावण्याबद्दल श्री. यशवंतराव यांना अटक झाली. त्या दिवशी सर्व ठिकाणी तिरंगी झेंडा लावण्याचा कार्यक्रम आम्ही यशवंतरावांचे नेतृत्वाखाली घेतला होता. त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी स्वत:च ती केस चालविली.

ते कोणासही घाबरत नसत. यशवंतराव जेथे गेले तेथून ते अयशस्वी परत आले आहेत असे कधीच झाले नाही. १९४२ साली भूमिगतांच्या स्त्रियांना अटक करण्यात आली. त्यामुळे सर्व भूमिगतांत असंतोष निर्माण झाला. लोक प्रक्षुब्ध झाले. आम्ही एकत्र जमलो होतो. चव्हाण अचानक मी येतो असे सांगून गेले. १५ मिनिटांत आलो नाही तर तुमचे मार्ग तुम्ही स्वीकारा असे सांगून गेले. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी श्री. देशमुख यांची भेट घेतली. त्यांना विचारले, ‘‘स्त्रियांनी आपले काय केले आहे? जर सरकारचे असे धोरण असेल तर आम्हालाही वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल.’’ त्याचा परिणाम होऊन सर्व स्त्रियांना सोडण्यात आले.
 
त्यांना अनेक क्षेत्रांत मित्र होते. तळागाळातल्यापासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक माणसे त्यांनी जोडली होती. सातारा-कराड येथील लोकांना तर ते त्यांची घरची नावे घेऊनच हाक मारायचे. प्रत्येक गावातील १० माणसांची नावे ते सहज सांगत, इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलाबाळांचीही नावानिशी ते चौकशी करीत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org