मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९४-१

ते समाजवादी विचारांचे होते. पंडितजींचे समिश्र अर्थव्यवस्थेचे स्वप्न त्यांनी महाराष्ट्रात साकार केले. सहकारातून समाजवाद फोफावला व उद्योगधंदे खेडोपाडी गेले ते यशवंतरावांमुळेच.

यशवंतरावांना वाचनाचा आणि सखोल अभ्यासाचा नाद होता. कठीण, दुर्मिळ पुस्तके ते प्रवासात सुद्धा भराभर वाचत आणि आत्मसात करीत. समाजवादाचा त्यांच्या तरूण मनावर बराच पगडा होता. हे अगोदर म्हटलेच आहे. पण ते तेवढेच उदारमतवादी होते. त्यांच्या सुसंस्कृत मनाला धर्मवेडाचा अगर जातीयवादाचा व त्यातून जन्मास येणा-या हेव्यादाव्यांचा कधीच स्पर्श झाला नाही. ते पूर्णतया देशाभिमानी होते. म्हणून संकुचित ब्राह्मण -ब्राह्मणेत्तर वादात त्यांची भूमिका स्पष्ट, निर्भीड व उदारमतवादी होती. सत्यशोधक चळवळीबद्दलचे त्यांचे विचार सुप्रसिद्धच आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, गोखले, केळकर ह्या पुढा-यांबद्दल त्यांना नितांत आदर होता. श्री.लक्ष्मणशास्त्री जोशी, गोगटे ह्यांसारखे अनेक विद्वान त्यांच्या खाजगी जीवनात मित्र व चाहते होते. त्यांच्यासारखा निर्भय दूरदृष्टीचा व संमजस नेता त्यावेळी जर महाराष्ट्रात नसता, तर महाराष्ट्रातले जीवन जातीयवादाने दूषित झाले असते. जातीद्वेषाच्या रोगाची भयंकर कीड लागून महाराष्ट्राचा ‘‘मद्रास’’ झाला असता. ते समंजस तर होतेच, पण खास करून संभाषण चतुर व उत्तम वक्ते होते, म्हणूनच त्यांची ती सौजन्यमूर्ती माणसे जोडत असे, तोडत नसे. त्यांच्या आत्मदर्शनात व शहरात ह्याबाबत शोचनीय कटुता आहे तेवढी तेव्हा नव्हती. ‘‘माणसे हेरून त्यांना आपलीशी करून ठेवण्याची यशवंतरावांची हातोटी होती.’’ असे प्रसिद्ध पत्रकार श्री.त्र्यं.वि.पर्वते आपल्या स्वानुभवावरून लिहितात. त्यांनी यशवंतरावांची तुलना दुस-या एका महान व्यक्तीबरोबर केली आहे. (न.चिं.केळकर आणि तुलना दुस-या एका महान व्यक्तीबरोबर केली आहे.) साहित्यसम्राट न.चिं. केळकर आणि यशवंतराव चव्हाण ह्या दोघांमधील साम्य दाखवताना ते म्हणतात, ‘‘माझ्या मनासमोर तात्यासाहेब केळकरांची मूर्ती उभी राहाते. द्वेष न करता वागणे, होईल तितके आपल्या शक्तीप्रमाणे दुस-याच्या उपयोगी पडणे हे गुण केळकर व चव्हाण यांमध्ये मला सारखेच दिसून येतात. काव्य, शास्त्र विनोद, साहित्यप्रेम हे गुण देखील दोघांमध्ये सारखेच दिसून येतात.’’

कुठल्या कुठल्या क्षेत्रांत त्यांना रस होता म्हणून सांगावे? पत्रकारांचे ते खरेखुरे हितचिंतक, सन्मित्र व सल्लागार होते. लोकसत्तेचे प्रसिद्ध संपादक श्री.माधव गडकरी म्हणतात, ‘‘राजकारणात जर पत्रकारांना कोणी खरीखुरी मदत केली असेल तर ती यशवंतरावांनी.’’ निर्भीड पत्रकारांना त्यांनी संरक्षण दिले. विचार व लेखन स्वातंत्र्याचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्यामध्ये सहिष्णुता हा फार मोठा गुण होता आणि त्यांचे पडसाद त्यांच्या अनेक क्षेत्रांतील वास्तव्यात उमटत.

यशवंतरावांचा मूळचा पिंड एका उपजत व नैसर्गिक हळव्या रसिकाचा, उत्तम सखोल अभ्यासूचा, नियतीवर नितांत विश्वास असणा-या एका संवेदनशील मानवाचा होता. पुष्कळांना कदाचित माहीत नसेल, पण श्री.व्ही.एस.पागे एक गुपित फोडून सांगतात की यशवंतराव एक भावनाप्रधान कवी पण होते. त्यांनी आपले सारे आयुष्य राजकारणात वेचले नसते तर ते आज एक विख्यात समाजवादी, विचारवंत, लेखक, कवी, वा अग्रगण्य समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध झाले असते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org