मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९३-१

जेव्हा जेव्हा सामाजिक हिताचा निर्णय घ्यायचा असेल किंवा सामाजिक मोल असलेला एखादा उपक्रम हाती घ्यायचा असेल तेव्हा तेव्हा यशवंतराव नेहमी सनदी अधिका-यांनाच नव्हे तर तंत्रज्ञ-विशेषज्ञांपेक्षांही फार दूरचा विचार करीत असत. शासनव्यवस्थेला राजकारणाचा रंग येऊ देण्यापेक्षा ही व्यवस्था शुद्ध आणि निखळ व्यवसाय म्हणून राबविणारे जे काही मोजके राजकारणी होऊन गेलेत त्या दुर्मिळ पठडीतील यशवंतराव हे एक प्रखर राजकारणी होते. कोयना प्रकल्पाचा आराखडा तयार होत असतानाच्या काळातील गोष्ट आहे, त्या प्रकल्पाच्या बाबतीत यशवंतरावांची दृष्टी इंजिनियर्सपेक्षाही फार वेगळं चित्र पाहात होती, कारण त्यांना नजिकच्या भविष्यापेक्षाही, दूरच्या भविष्याची काळजी होती. या प्रकल्पाचे फायदे उद्याच्या पिढीला कसे मिळतील या गोष्टीचा ध्यास त्यांना लागलेला होता.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा जो सोहळा संपन्न झाला तो विविध भावनांचा एक संमिश्र आनंद सोहळा होता. भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व स्वीकारून नवीन राज्यांची जडणघडण करण्यापूर्वी या प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर फार मोठी साधकबाधक चर्चा सुरू होती. या तत्त्वाचा अनेक मान्यवरांनी अतिशय हिरिरीने पुरस्कार केला होता. परंतु यशवंतरावांनी या संदर्भात फारसा गाजावाजा केला नाही किंवा जाहीर गवगवाही केला नाही. कारण त्यांचा स्वाभाविक कल एकसंधतेकडे होता. एकसंधतेवर त्यांची श्रद्धा होती. परंतु लोकांना काय हवं आहे हे जेव्हा सुस्पष्ट झाले तेव्हा मात्र त्यांनी या प्रश्नाबद्दलची आपली वैयक्तिक मते आणि विचार पूर्णतया बाजूला सारले. कर्तव्यभावनेने ते लोकेच्छेला सामोरे गेले आणि ती लोकेच्छा पूर्ण शक्तीनिशी आणि समर्पणाच्या भावनेतून त्यांनी सफळ संपूर्ण केली.

नव्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे सर्व लोकांनी उत्स्फूर्त आणि शानदार स्वागत केले. रोषणाई पताका थोड्याफार प्रमाणात दारूकाम झाले. परंतु हा समारंभ म्हणजे जणू एखाद्या सणाचा सोहळा असल्याने हे सर्व काही प्रसंगोचितच झाले. या सर्व आनंदसोहळ्यात एक गोष्ट माझ्या मनात कायमची कोरली गेली आहे. ती म्हणजे सर्वधर्मप्रार्थना. हिंदू, मुस्लिम, खिश्चन, शीख, जैन, ज्यू आदी सर्व जातिधर्माच्या लोकांनी महाराष्ट्रनिर्मितीचा आनंद सर्वधर्म प्रार्थना म्हणून व्यक्त केला या प्रार्थना सोहळ्यात कमालीचे पावित्र्य होते, मन:पूर्वकता होती, आश्वासन होते आणि मानवी जीवनास उन्नत करणारी जी समान मूल्ये असतात, ज्या समान श्रद्धा असतात तयांचा या सोहळ्यात स्वाभाविक आविष्कार झाला होता. जणू सर्व धर्मांतील ही नीतिमूल्ये नव्याने उदयास येणा-या राज्यात सुरक्षित आहेत, अबाधित आहेत असे अभिवचन या प्रार्थनेतून पुढील पिढ्यांना दिले जात होते. हा भावपूर्ण समारंभ म्हणजे राज्यातील सर्व जातिधर्मांच्या लोकांनी मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांच्या ठायी असलेली न्यायनिष्ठा आणि नि:पक्षपातीपणा याबद्दल व्यक्त केलेला विश्वासच होता. यशवंतराव या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष प्रशासनकार्यात आणतील याबद्दल व्यक्त केलेला विश्वासच होता. यशवंतराव या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष प्रशासनकार्यात आणतील याबद्दल असलेला दृढविश्वासच जणू या प्रार्थनेतून व्यक्त झाला होता.

१९६१ मध्ये पानशेत धरण फुटले. ही घटनाच अशी काही जीवघेणी होती की अगदी कर्तव्यकठोर माणसाच्या डोळ्यांतही पाणी यावे. या घटनेने यशवंतराव सुद्धा अनावर व्यथित झाले. पानशेतच्या आकांताने त्यांच्याही हृदयाचा बांध फुटला. पानशेत धरणातील पाणलोटाने पुण्याचे, ऐतिहासिक सौंदर्यच पूर्ण विद्रुप करून टाकले होते. महाराष्ट्राची अस्मिता आणि आनंद याचे माहेर असलेले हे शहर पूर्ण उद्ध्वस्त झाले होते. सर्वत्र भितीचे सावट पसरले होते. सा-या शहराला एक प्रकारे स्मशानकळा आली होती. यशवंतराव अस्वस्थतेने शहरातील रस्ता रस्ता अथकपणे फिरत होते. जेवण नाही. तहान नाही की विश्रांती नाही. संकटग्रस्तांचे जातीने सांत्वन करीत होते. त्यांच्या करूण कहाण्या ऐकत होते. त्यांच्याशी समरस होऊन त्यांचे दु:ख हलके करीत होते. घरातील वडिलधा-या माणसासारखा धीर देत होते आणि संकटाला सामोरे जाण्यासाठी, पुन्हा सावरण्यासाठी, त्यांना चेतना देत वणवण फिरत होते. हे भावनिक व्यवहार सुरू असतानाच दुसरीकडे कर्तव्यकठोर होऊन तात्काळ विमोचन कार्याबद्दल ते सूचनाही देत होते आणि नंतरच्या काळात करावयाच्या पुनर्वसन कार्यासाठी शासनयंत्रणेला युद्धपातळीवर राबवीत होते. म्हणूनच पानशेतची घटना दोन गोष्टींमुळे चिरंतन स्मरणात राहील. एक म्हणजे या घटनेमुळे अनुभवायला आलेला अपरिमित विश्वास आणि दुसरी म्हणजे या अस्मानी सुलतानीच्या वेळी प्रत्ययास आलेली स्वाभाविक आणि आत्यंतिक मानवता.

यशवंतरावांना सर्जनशील लोकांचा सहवास नेहमीच प्रिय असे. कलावंत, कलाकार आणि प्रतिभावंत यांच्या ठायी असलेल्या गुणांची ते नेहमीच कदर करीत असत. समाजातील या मंडळींच्या सुखासाठी ते नेहमी झटत असत. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत असत. ते राजकारणी होते, कुशल प्रशासक होते, प्रज्ञावंत होते, देशभक्त होते. लोकशाहीवर त्यांची अटळ श्रद्धा होती आणि त्यांच्या वृत्ती धर्मातीत होत्या. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व या आणि अशा अनेक गुणांनी संपन्न होते. यशवंतरावांचे बाह्यरूप वेगळे होते तरीही अंत:करणाने ते अतिशय प्रेमळ होते, भावनाशील होते. विशेष म्हणजे त्यांच्याजवळ तरल विनोदबुद्धी होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org