मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९२-१

ठरल्याप्रमाणे दुसरे दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डिव्हिजनल कमिशनर यार्दी व मी सुभेदारी गेस्ट हाऊसवर गेलो व मुख्यमंत्र्यांसह अजिंठा रस्त्याने फुलंब्री पोलीस ठाण्याकडे निघालो. फुलंब्री पोलीस ठाण्यात आपणास काय पाहावयास मिळेल अशी विचारणा यशवंतरावांनी केली. ‘‘पोलीस ठाणे बंद करत मंडळी घरोघर झोपावयास गेली नसली म्हणजे मिळवली. पोलिस ठाण्यात पोलिस झोपलेले सापडण्याची शक्यता जास्त आहे.’’ मी म्हणालो. आम्ही फुलंब्रीला पोहोचलो त्या वेळी पोलिस ठाण्यातील पोलिस नुकतेच उठले होते व पोलिस ठाणे अतिशय गलिच्छ स्थितीत होते. आम्हाला पाहून पोलिसांची धावपळ झाली. पोलिस ठाण्यातील रोकड रक्कम व महत्त्वाची रजिस्टर्स तपासून आम्ही औरंगाबादला परतलो. परत येताना ‘‘मराठवाड्यात अशी परिस्थिती का आहे ?’’ असा प्रश्न यशवंतरावांनी केला. मी त्यांना सांगितले की, ‘‘रझाकार चळवळीपासून जी राजकीय अस्थिरता मराठवाड्यात होती, तिचा हा परिणाम असावा.’’ यावर उपाय काय असा दुसरा प्रश्न त्यांनी केल्यावर मी त्यांना सांगितले की, ‘‘मराठवाड्यातील पोलिस अधिका-यांना जुन्या मुंबई राज्यातील पोलिस ठाण्यात कामकाज कसे चालते ते पाहण्याची संधी मिळाली तर इथले पोलिस अधिकारी फार थोड्या अवधीत कामाची पद्धत आत्मसात करतील. कारण ही मंडळी मूळची हुशार आहेत.’’

यावर यशवंतराव म्हणाले, ‘‘प्रधान, नव्या द्विभाषिक राज्याचे अनेक प्रश्न माझ्यासमोर आहेत. हा प्रश्न तुम्ही जर कोणत्याही प्रकारे बिकट न करता हाताळलात तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रयोग करून पाहण्यास मी तयार आहे. पण माझ्यापुढील प्रश्नांमध्ये आणखी एकाची भर मला नको.’’

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार हा प्रश्न यशस्वीपणे मी सोडवू शकलो, पण हे कसे काय केले हे सविस्तरपणे सांगण्याचे हे स्थळ नव्हे. पोलिस अधिका-यावर दडपण आणण्याकरिता खोटे आरोप केले जातात. असाच एक प्रकार मी औरंगाबादला असताना झाला. या प्रकरणी तपास करून खरा प्रकार यशवंतरावांना कळल्यावर त्यांनी त्यांच्या कार्यकर्ताला दोन शब्द सुनावण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे या मुख्यमंत्राला सत्याची चीड आहे व योग्य त-हेने काम केल्यास आपणास पूर्ण संरक्षण मिळेल, अशी सर्व पोलिस कर्मचा-यांची खात्री झाली.

त्याचे असे झाले:- एका सकाळी मला मुंबईहून यशवंतरावांचा टेलिफोन आला, ‘‘अमुक एका आमदाराची तक्रार आहे की, त्यांनी एका बाईचा हात धरून विनयभंग केल्याची खोटी तक्रार घेऊन त्यांच्याविरुद्ध त्यांच्या गावच्या फौजदाराने खोटा गुन्हा नोंदविला आहे. हा फौजदार सदरहू आमदाराच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या सल्ल्याने चालत आहे, तरी खरा प्रकार काय आहे ते कळवावे.’’

या बाबतीत वेळ न गमविता माझ्या रीडर इन्स्पेक्टरबरोबर मी त्या पोलीस ठाण्यास गेलो. हे पोलिस ठाणे औरंगाबादहून शंभर सव्वाशे मैल लांब होते. आम्ही पोलिस ठाण्यात पोहोचलो तेव्हा कार्यालयाच्या मुख्य खोलीत एक सुस्वरूप तरूण स्त्री व तिचा नवरा बसले होते व आतल्या खोलीत सब-इन्स्पेक्टर गावातील दोन-तीन प्रतिष्ठित इसमांबरोबर काही वाटाघाटी करत होते.

हा प्रकार काय आहे, याविषयी चौकशी करताना कळले की, सुमारे तीन-चार दिवसांपूर्वी आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी सदरहू आमदार दारू पिऊन (त्या वेळेस मराठवाड्यातील जिल्ह्यास दारूबंदी कायदा लागू झाला नव्हता) आठवडे बाजारात हिंडत असता त्यांनी ह्या बाईला पाहिले. तिचा हात धरून ते तिला आपल्या घराकडे घेऊन जाऊ लागले. ही तरूण स्त्री त्या आमदाराची मैत्रीण होती. त्यांचा जुना प्रेमसंबंध होता. परंतु भर बाजारात हात धरल्याने त्या बाईने बोंबाबोंब केली. नवरा फिर्याद करण्यास तयार नसताना तिने त्याला फिर्याद करण्यास भाग पाडले. फौजदाराला आमदाराचे व बाईचे प्रेमसंबंध माहीत असल्याने व सदरहू आमदार राज्यकर्ता पक्षातील एक प्रमुख आमदार असल्याने तो आमदाराविरूद्ध फिर्याद घेण्यास नाखूष होता. त्यावेळी त्या बाईने रडून रडून ओरडून सगळे पोलिस ठाणे डोक्यावर घेतले होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org