मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ८२-१

यशवंतरावांनी आपल्या भारत देशाचे एक सुंदर व संपन्न असे स्वप्न उराशी बाळगले होते. आर्थिक व राजकीय दृष्ट्या स्थैर्य लाभलेला ज्यामध्ये सामाजिक विषमतेला मुळीच थारा नाही, स्वराज्याचे व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यात समर्थ असलेला व जेथे सर्व क्षेत्रातील जनतेच्या प्रगती व विकासात सतत वाव मिळेल अशा भारताचे स्वप्न ते बघत होते. त्यांच्या स्वप्नातील भारताचा भविष्य काळ उज्ज्वल होता. त्यांच्या मनातील लोकशाही भारताचा समाजवादी व शांतताप्रिय राष्ट्र म्हणून सुलौकिक होता. जागतिक शांततेचे कार्य भारत करू शकेल व त्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती.

ग्रामीण भागाच्या आधुनिकीकरणाचे महत्त्व त्यांना पटले होते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृषिऔद्योगिक समाज स्थापन करण्यासाठी झटणारे यशवंतराव कदाचित एकमेव राजकीय नेते असावेत. त्यांनी सहकारी चळवळीची महाराष्ट्रामध्ये मुहूर्तमेढ रोवली व हीच चळवळ आज संपूर्ण देशभर भूषणावह ठरली आहे. सर्वत्र राबविली जात आहे. या सहकारातून समाजवाद निर्माण होईल अशी त्यांची धारणा होती. ह्याशिवाय यशवंतराव यांनी लोकशाहीचे विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषद, बँकेचे राष्ट्रीयीकरण व संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याच्या कामी त्यांनी घेतलेला पुढाकार, यावरून त्यांच्या दूरदर्शीपणाची कल्पना येते.

यशवंतराव हे अतिशय मुरब्बी व कुशल प्रशासक होते. त्यांनी ज्या ज्या म्हणून जबाबदारींच्या जागी काम केले त्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. स्वातंत्र्य सैनिक, पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री, मुख्यमंत्री, विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री व उप—पंतप्रधान अशी त्यांची चढत्या क्रमाने वाटचाल झाली व त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या बुध्दिमत्तेचा व लोकप्रियतेचा प्रत्यय आणून दिला. ते कोणत्याही पदावर असोत त्यांची इच्छा अशी होती की, गरिबातल्या गरीब तळातील लोकांना विकासाची फळे चाखता यावीत. ते जेथे गेले ते आपल्या कतृत्वाने जनतेच्या मनात दृढ विश्वास व श्रध्दा निर्माण करण्यात यशस्वी झाले. त्यांच्या राजकीय व सामजिक सावधगिरीचा, त्यांच्या शांत संयमी व खंबीर नेतृत्वाचा लाभ केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी आदर, आत्मियता, प्रतिष्ठा होती.

भारत चीन युध्दानंतर १९६२ साली यशवंतराव चव्हाण केंद्रीय रक्षामंत्री म्हणून दिल्लीला आले. त्यांचा पिंड समाजसेवकाचा असल्यामुळे दिल्लीच्या महाराष्ट्रीय समाजाच्या शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीशी ते समरस झाले. एप्रिल १९६५ मध्ये ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष निवडले गेले. नूतन मराठी विद्यालयाच्या कार्यकारिणीचेही ते सभापती होते. त्यांच्या समर्थ नेतृत्वामुळे शाळेची प्रगतिपथावर सतत वाटचाल होत राहिली. ते स्वत: एक उत्कृष्ट लेखक तर होतेच पण साहित्य, संगीत, नाट्य ह्याची त्यांना अप्रतिम जाण होती. ह्या सर्व कलांना उत्तेजन देण्यासाठी महाराष्ट्र रंगायन हे प्रेक्षागृह उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या अशा बहुरंगी व्यक्तिमत्त्वाची उणीव आम्हांस नेहमीच भासेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org