मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ७०-१

अलीकडे मी आमच्या भागात जे सागरेश्वर अभयारण्य उभे केले, ही केवळ अशक्यप्राय कोटीतील गोष्ट होय. ही म्हणजे अतिशयोक्ती नव्हे अगर सांगोवांगी कथा कल्पना नव्हे. प्रत्यक्षच आणि चक्क सागरेश्वर अभयारण्य उभे राहिले आहे. झाडतोडीमुळे झालेला एक उघडा बोडका डोंगर, त्यात चालू असलेल्या पन्नास साठ हातभट्ट्या, फरा-यांचे अड्डे, गुरे चारणारे, जळण तोडणारे तसेच केवळ विरोधासाठी विरोध करणारे यांचा आणि भाले, कु-हाडी, बंदुकीसकट सारा अती कडवट विरोध पचवून सागरेश्वर अभयारण्य आज चक्क उभे राहिले आहे. स्वप्नसृष्टी सत्यात अवतरली आहे. दरसाल हजारो पर्यटक त्याचा लाभ घेत आहेत. आनंदित होऊन घरी परतताहेत. हे अघटित घडले कसे ? केवळ साहेब माझ्या पाठीशी ठोसपणे उभे राहिले म्हणूनच ! सागरेश्वर अभयारण्यनिर्मितीचा इतिहास म्हणजे एक भला मोठा ग्रंथ तयार होईल.

कार्यकर्त्याचे सार्वजनिक काम, ते करण्याची त्यांची पद्धत, त्यामागील त्या कार्यकर्ताचा स्वार्थ, परमार्थ, हे जाणून घेण्याची ताकद साहेबांकडे होती. गुणी कार्यकर्ताला ते बरोबर हेरून काढीत. मग तो कोणत्या पक्षाचा आहे याचे सोयरसुतक त्यांना नसे. साहेबांचे विश्वासाला मी पूर्णपणे उतरलो होतो. अर्थात साहेबांनी मला आपण होऊन कधी सार्वजनिक काम सांगितले नाही. मात्र मी घेऊन गेलेले काम त्यांनी कधी नाकारले नाही.

साहेब मला एकदा म्हणाले, ‘‘तुम्ही कसले लेखक ? मी जर राजकारणात पडलो नसतो तर फार मोठा लेखक झालो असतो!’’ आणि त्यांनी ते ‘‘कृष्णाकाठ’’ या पुस्तकाने रसिक वाचकांना दाखवूनही दिले आहे. माझी एखादी कथा अगर लेख प्रकशित झाला की ते अवश्य वाचीत आणि आपल्यामागील कामांच्या अनंत व्यापातून सवड काढून ते मला त्या साहित्याबद्दल आपला मार्मिक अभिप्राय आवर्जून कळवीत. ‘‘भली खोड मोडली’’ म्हणून ‘‘किर्लोस्कर’’मध्ये मी एक कथा लिहिली होती. भिवानाना नावाचा एक गावगुंड एका गरीब शेतक-याचे काम एका पोलिसाचे सहकार्य घेऊन करतो. पोलिसही एक चांगले काम म्हणून कसलीही अभिलाषा न धरता सद्सद्विवेकबुद्धीने ते करून टाकतो. त्याचा गैरफायदा उठवून तो गुंड त्या शेतक-यापासून शंभर रुपये वसूल करतो. ही गोष्ट त्या पोलिसाला कळते. त्याला ते चांगलेच खटकते. वेगळ्या मार्गाने त्या गुंडाला ‘‘अटक’’ करून त्याच्याकडून तो तीनशे रुपये काढतो. त्याला पोलिसठाण्यात घेऊन जातो. फौजदाराचे कानावर खरी वस्तुस्थिती घालून ते तीनशे रुपये फौजदारांकडे देतो. फौजदार भिवानानाला हाग्यादम भरून ‘‘सोडून’’ देतो. ते तीनशे रुपये परत पोलिसाकडे देऊन सांगतो, ‘‘ह्यापैकी शंभर रुपये त्या गरीब शेतक-याचे परत कर आणि बाकीचे दोनशे तिथल्या शाळेला भिवानानाचे नावे देणगी देऊन टाक ’’ अशी ही कथा. त्या वेळी फार गाजलेली. तिचे इंग्रजी, हिंदी आणि गुजराथी भाषांतून भाषांतर झाले. साहेबांचे या कथेबद्दल पत्र आले. सुंदर कथा लिहिल्याबद्दल सुरुवातीला माझे अभिनंदन करून ते लिहितात. ‘‘तुमची कथा आदर्शवादी आहे पण वास्तववादी वाटत नाही’’ मी लिहिलेल्या ‘‘मुलाखतीच्या मैदानातून ’’ या पुस्तकाला त्यांची सुंदर आणि मार्मिक प्रस्तावना लाभली आहे.

अशा त-हेने सार्वजनिक कार्य आणि साहित्य यामध्ये त्यांचा माझा सूर चांगलाच जुळला होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org