मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५६-१

एकदा सोहन लाल, एम. पी. यांनी एक कार्यक्रम केला होता. कार्यक्रमासाठी अत्यंत वेचक, निवडक प्रेक्षक, श्रोते यांना त्यांनी बोलावलेले होते. पहिल्यांदा यामिनी कृष्णमूर्ती यांचा कार्यक्रम होता. त्या नंतर मध्यंतर. तो झाल्यावर माझे गाणे ठेवले होते. यशवंतरावांना पहाटे ४ वाजता विमानाने दौ-यावर जायचे होते. पण त्यांना माझे रंगलेले गाणे संपूर्ण ऐकायचे होते. तेव्हा त्यांनी आपल्या सेक्रेटरीला सांगितले, ‘आपण सकाळी १० वाजता निघू या’... चारी कोप-यात ठेवलेल्या समयांच्या मंद प्रकाशाने उजळलेल्या त्या हॉलमधील ती मैफल चांगलीच रंगली.
माझ्याही आणि त्यांच्याही कायम ध्यानात राहिली.

एकदा मी दिल्लीला गेलो होतो. मी साहेबांना फोन करून विचारले, ‘‘काय करताय?’’

तर ते म्हणाले, ‘‘कामं चालली आहेत.’’

‘‘गाणं ऐकायचं का?’’

‘‘नको! आज वेळ नाही!’’ त्यांचे ताडकन् उत्तर आले. ते पुढे म्हणाले, ‘‘भीमसेनचे गाणे ही जाता जाता ऐकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी तीन चार तासांची सवड हवी.’’

यशवंतराव आणि वेणूताई या दोघांनाही गाण्याची आवड होती. साहेबांना वेळ नसला, की वेणूताई यायच्या. साहेब दिल्लीला आणि वेणूताई मुंबईत असा काही काळ गेला. या काळात त्या एकट्याच यायच्या. त्यांनी संतवाणी कितीतरी वेळा ऐकली.

वेणूताई गेल्यानंतर एकदा साहेबांची आणि माझी भेट झाली. त्या वेळी त्यांनी संतवाणी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या बाबतीत बिदागीचा किंवा माझ्या सवडीचा प्रश्नच नव्हता. मी त्यांना विचारले, ‘‘केव्हा ऐकता?’’

तेव्हा असे ठरले की, वेणूतार्इंच्या पहिल्या पुण्यतिथीला कराडला, ‘विरंगुळ्या’ वर हा कार्यक्रम करायचा. त्याप्रमाणे मी माझ्या साथीदारांना घेऊन गेलो. यशवंतराव तेव्हा काहीसे खचलेले होते. तब्येत ठीक नव्हती. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, ‘‘माझी तब्येत ठीक नाही. खाली बसायला त्रास होतो. मी खुर्चीवर बसून ऐकतो.’’ त्याप्रमाणे त्यांनी माझ्यासमोर खुर्चीवर बसून संतवाणी पहिल्यांदा ऐकली.

आमचे जिव्हाळ्याचे संबंध, आम्ही बोलायला लागलो की त्यांनी नेहमीच आपला सरकारी ताफा दूर ठेवलेला असायचा. केव्हाही भेटले की, मिठी मारून जिव्हाळ्याच्या गोष्टी बोलायचे. वडीलधा-या जबाबादार माणसाप्रमाणे सांगायचे, ‘‘दारू पिणं कमी कर म्हणून. त्याच वेळी सगळी व्यवस्था इथे बरी केली आहे ना?’’ म्हणून चौकशी करायचे.

आम्हाला एकमेकांबद्दल प्रेमादर वाटायचा. साहजिकच मला नेहमी वाटायचे की, त्यांनी आपल्या घरी यावे. त्याप्रमाणे मी त्यांना नेहमी ‘माझ्या घरी केव्हा येता?’ म्हणून विचारायचा. ते मला म्हणायचे, ‘तुझं स्वतंत्र घर होईल तेव्हाच येईन.’ आणि योग आला. मी माझे घर बांधल्यानंतर ते माझ्याकडे आले. तुम्हाला काय खायला करू म्हणून विचारले तर फोडणीचे पोहे मला फार आवडतात म्हणाले. पोहे केले. आंब्याचे दिवस होते. तेव्हा पोहे आणि आंबे मोठ्या आवडीने खाऊन, गप्पागोष्टी करून ते गेले.

त्यानंतर थोड्याच दिवसांनी ते अगदी आकस्मिकपणे इहलोक सोडून गेले. या गोष्टीचा जिव्हाळ्याचा माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून फार मोठा धक्का बसला. इतका मोठा रसिक श्रेष्ठ गेल्यावर आम्हा कलाकारांच्या जीवनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून तरी केव्हा येणार?

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org